Thursday, May 31, 2018

(बालकथा) हत्ती माझा सोबती


     जंगलाजवळ एक गाव होतं.त्या गावात साधारण दहा एक वर्षाची चिंगी तिच्या आई-वडिलांसोबत राहत होती. गावात शाळा नव्हती. त्यामुळे ती घरीच राहून आईला आणि घरातल्या लोकांना कामात मदत करत होती. तिच्या खेळकर आणि आनंदी स्वभावामुळं तिने सगळ्या गावाची मनं जिंकली होती.
     चिंगीचा सगळा रिकामा वेळ जवळच्या जंगलात जायचा. तिच्याजवळ एक छोट्ंस शेळीचं कोकरू होतं. ते तिच्या सारखं मागं मागं असायचं. जंगलातला सगळा वाकडा-तिकडा असो किंवा चढणी-उतरणीचा असो, तिने सगळा रस्ता पिंजून काढला होता. तिला जंगलातली खडानखडा माहिती होती. जंग़ल आणि तिथला सुंदर निसर्ग हीच तिची शाळा होती. ती वार्याचा अंदाज पाहून हवामानाचा मूड ओळखायची. तिने आजी- आजोबांकडून झाडं-रोपं, औषधी वनस्पती यांची माहिती जाणून घेतली होती. त्यांचा औषधी गुण तिथल्या जखमी जीव-जंतू, प्राणी-पक्ष्यांवर आजमवायची. जेव्हा केव्हा तिला एकादा जखमी प्राणी वगैरे दिसायचा, तेव्हा ती लगेच त्याला आपल्या घरी घेऊन यायची आणि त्याच्यावर उपचार करायची. तो पूर्ण बरा झाल्यावर त्याला परत पाठवायची. सगळे तिला डाक्टरीण बाई म्हणून चिडवायचे.

चिंगी हाताची घडी घालून ऐटीत म्हणायची,“हो, मी तर आहेच!”
     एके दिवशी एक हत्तीचे पिल्लू त्यांच्या शेतात घुसले. कदाचित ते त्यांच्या झुंडीतून चुकले असावे. त्यामुळे तो घाबरला असावा. त्याने क्रोधाने संपूर्ण शेताचीच नासधूस चालवली होती. मोठ्या मुश्किलीने लोकांनी त्याला काबूत आणून एका मोठ्या झाडाच्या बुंध्याला बांधून घातले. चिंगीनेच सर्वात अगोदर हत्तीच्या पिलाच्या एका पायाला जखम झाल्याचे पाहिले. तिथून रक्त येत होतं.तिने लगेच जखमेवर औषध लावून मलमपट्टी केली.
आजोबा म्हणाले, “ शाबास पोरी! तू तर कमालच केलीस! या जखमेमुळेच तो एवढा हिंसक बनला होता.”
चिंगीने त्याचे नाव काळू ठेवले. चिंगी आणि काळू दोस्त बनले. ती त्याला ऊस,केळी, हिरवा लुसलुशीत चारा चारी.ती काळूच्या पाठीवर बसून जंगलाचा फेरफटका मारी. उंच फांद्यावर लगडलेली फळं,फुलं तोडी.
आता काळू पूर्ण बरा झाला होता. एके दिवशी आजोबा म्हणाले,“ काळूला आता परत पाठवायला हवं.”
चिंगी रडू लागली. तिने काळूला मिठी मारली आणि म्हणाली,“ मी काळूला कुठे जाऊ देणार नाही. हा माझा मित्र आहे.”
आई तिला समजावण्याच्या सुरात म्हणाली,“चिंगी बाळ! काळूलादेखील त्याच्या आईची आणि घरच्यांची आठवण येत असणार ना?”
चिंगी तयार झाली आणि वडिलांबरोबर त्याला सोडायला जंगलातही गेली.
दोन वर्षे उलटली. एके दिवशी चिंगीने पाहिले की, गावकरी कशाच्या तरी काळजीत आहेत. तिने आईला विचारले,“ आई!काय गं, इथे एवढी गर्दी का?”
आई म्हणाली, “ एका वाघाने काल रुपाकाकूंची म्हैस नेली.”
चिंगी म्हणाली,“ बिचारी काकू! तिची तर एकच म्हैस होती.”
तेवढ्यात शकिल चाचाने आपल्या बकर्या हरवल्याचे सांगितले.काही वेळ विचार केल्यावर चिंगीचे आजोबा म्हणाले, “ तीन दिवसांनी आपल्या कुलस्वामिनीची यात्रा आहे.दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करू. राहिली गोष्ट वाघाची, मी आजच वनाधिकार्यांना भेटतो आणि त्याचा बंदोबस्त करायला सांगतो. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आपापल्या घरासमोर होळी पेटवा आणि सावध राहा.”
आता लहान मुलांना एकट्याने बाहेर पडायला आणि खेळायला पायबंद घालण्यात आला. एकाद्या कामासाठी बाहेर पडायचे असेल तर लोक हातात काठ्या, कंदिल घेऊन एकत्रितरित्या जाऊ लागले.
गावातल्या कुलस्वामीनी देवीच्या यात्रेची तयारी जोरात सुरू झाली होती. चिंगीसुद्धा मोठ्या उत्साहात त्यात सहभाग घेत होती. गेल्यावेळेला तिने ज्या रंगीबेरंगी फुलांच्या माळा विणल्या होत्या, त्या देवीच्या अंगावर छान सजल्या होत्या.त्यामुळे तिचे कौतुकही झाले होते.पण या खेपेला आई तिला एकटीला जंगलात सोडणार नव्हती.
चिंगीने मात्र मनोमन जंगलात जायचेच, असा पक्का निश्चय केला होता. देवीच्या पूजेच्या एक दिवस अगोदर ती तिच्या कोकरासह सकाळी सकाळीच कुणालाही न सांगता जंगलाच्या दिशेने निघाली.
तर्हेतर्हेचा फुलांचा सुवास आणि निसर्ग सौंदर्यात ती हरवून गेली. तिला आपण किती धोक्यात आहोत,याचा अजिबात विसर पडला. अचानक पक्ष्यांच्या चिवचिवाटाने वातावरणात तणाव निर्माण झाला. ती लगेच सावध झाली. तिला वातावरणात वाघाचा गंध जाणवला. ती दक्ष झाली. आजूबाजूला असलेल्या झाडींमध्ये सावधपणे निरखू लागली.
     चिंगीने कोकराला उचलून आपल्या कवेत घेतले आणि फुलांची टोपली उचलून हळूहळू गावाच्या दिशेने चालू लागली. तेवढ्यात वाघ भयंकर अशी डरकाळी मारत तिच्या अंगावर झेपावला. अगोदरच सावध असलेली चिंगी विजेसारखी चपळाईने बाजूला झाली आणि त्याचा वार चुकला. पण तिच्या हातून फुलांची टोपली खाली पडली. शेळीचे पिल्लूदेखील लांब उडून पडले. आता वाघ आपल्या तीक्ष्ण नजरेने कोकराकडे पाहू लागला. आणि अचानक झाडींमधून काळू हत्ती बाहेर आला. झटक्यात तो वाघाच्या आणि चिंगीच्या मधे येऊन उभा राहिला. आता तो वाघाला पाहून, सोंड वर करून आणि मागे-पुढे होत वाघाला आव्हान देऊ लागला. वाघाने या खेपेला काळूवर झडप घालत आपली तीक्ष्ण नखे त्याच्या शरीरात रुतवली. वेदनेने व्याकूळ झालेल्या काळूने आपल्या सोंडेने वाघाला उचलून दूर फेकून दिले.
आता वाघालादेखील जखम झाली. त्याने आपला जीव वाचवण्यातच शहाणपणा आहे, हे ओळखले. आणि शेवटेचे काळूकडे रागाने पाहात आणि डरकाळी फोडत झाडी-झुडपांमध्ये दिसेनासा झाला.
चिंगी अगदी आनंदाने ओरडली, “काळू, माझ्या दोस्ता! तू आज कमालच केलीस. माझा जीव वाचवलास.”तिने आनंदाने त्याला मिठी मारली. 
     इकडे चिंगी कुठे गेली म्हणून गावाभर शोधाशोध सुरू होती. ते जंगलाच्या दिशेनेच येत होते. तेवढ्यात वाघाची डरकाळी आणि हत्तीचा चित्कार ऐकून धावतच घटनास्थळी धावले. चिंगीला काळूसोबत सुरक्षित पाहून सर्वांचाच जीव भांड्यात पडला. सगळ्यांनी चिंगीच्या धाडसाचे कौतुक केले. तिचे आजोबा म्हणाले,“ चिंगी, तू तर आमची मान अभिमानाने उंचावलीस.”
सगळे काळूलाही घेऊन गावात आले.काळूच्या जखमांवर चिंगीने झाडपाल्यांचे औषध लावले. सगळ्यांनी काळूला भरपेट केळी,ऊस इत्यादी खायला घातले. काही वेळाने काळू पुन्हा परत जंगलात निघून गेला.
दुसर्यादिवशी लोक मोठ्या उत्साहात देवीच्या यात्रेत सहभागी झाले. चिंगीने जंगलातून आणलेल्या फुलांच्या छान माळा बनवल्या.त्या देवीला अर्पण केल्या.
     तेवढ्यात त्यांना एक आनंदाची वार्ता ऐकायला मिळाली. वन विभागाच्या कर्मचार्यांनी वाघाला पकडून त्याची वन्य जीव संरक्षण केंद्राकडे रवानगी केली होती. आता चिंगी आणि गावकर्यांचे जीवन निसर्गाच्या सानिध्यात अगदी आनंदात जाऊ लागले. चिंगी आता रोज फळं-फुलं तोडण्यासाठी जंगलात जाते. काळू तिला रोज जंगलात भेटतो. त्याच्याशी मनसोक्त खेळते. सगळे म्हणतात, मैत्री असावी तर चिंगी आणि काळूसारखी!

No comments:

Post a Comment