Sunday, June 3, 2018

आठवीच्या पाठ्यपुस्तकाच्या निमित्ताने...


     राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्यावतीने राज्यातल्या पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम तयार करण्याचे काम केले जाते. यांच्यावतीने जी पाठ्यपुस्तके तयार केली जातात,त्या पाठ्यपुस्तकात आपल्या पाठाला संधी मिळावी,अशी प्रत्येक लेखकाची एक सुप्त इच्छा असते. तशी माझीही होती. गेली पंधरा-वीस वर्षे विविध विषयांवर मी लेखन करीत आहे. बालकथा, कथा यांचेही लेखन सुरूच आहे. महाराष्ट्रातल्या आघाडीच्या दैनिकांबरोबरच स्थानिक वृत्तपत्रे, मार्मिक, केसरी-छावा, मुलांचे मासिक आदी ठिकाणी माझे लेखन प्रसिद्ध होत असतानाच अचानक मला एप्रिल महिन्यात पाठ्यपुस्तक मंडळातून फोन आला. तुमच्या किशोर मे 2017 मधील अंकातील धाडसी कॅप्टन: राधिका मेनन यांच्यावरील शौर्यकथेची निवड नव्याने निर्मिल्या जाणार्या आठवी इयत्तेच्या बालभारती-मराठी पुस्तकासाठी निवड करण्यात आली आहे.

     आपल्या लिखाणाची निवड झाली आहे, हे कळल्यावर इतका आनंद झाला की, पुढे फोनवर माझ्याशी बोलणार्या मॅडम काय बोलताहेत,हे काही काळ कळायचे बंदच झाले! हा आनंद वेगळाच असतो. आपली एक इच्छा पूर्ण झाली,याचा एक आनंद मोठाच असतो. जंगल एक्सप्रेस आणि हसत जगावे ही दोन पुस्तके प्रसिद्ध झाल्यावर आणखी पुस्तके प्रसिद्ध करण्यावर मी आवर घातला. कारण नियमितपणे ब्लॉगलेखन सुरूच आहे. त्यामाध्यमातून आपण वाचकांसमोर जात आहोत. मग कशाला पुस्तकांच्या मागे लागायचं. आणि पुस्तके प्रसिद्ध करण्यापूर्वीची जी प्रक्रिया फारच कंटाळवाणी आहे. ज्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत,त्यांना याची चांगलीच कल्पना आहे. काही काही लेखकांची पुस्तके दहा-दहा वर्षांनी प्रसिद्ध झाल्याचा अनुभव ऐकल्यावर त्याकडे तसे दुर्लक्ष केले. अर्थात बाळंतबाईचे बाळंतपण कसं असतं, तसंच काहीसं लेखकाच्या पुस्तक निर्मितीचं आहे. त्यामुळे शेवटी पुस्तक निर्मितीला जे मोल आहे, ते मी नाकारत नाही.
सन 2011 पासून मी ब्लॉगलेखन करीत आहे. 2014-15 ही वर्षे सोडली तर ब्लॉगवर लेखन चालूच ठेवले आहे. आज या ब्लॉगवर 1200 च्यावर लेख,कथा,कविता वगैरे उपलब्ध आहेत. काही कथांचे अनुवादही केले आहेत. त्यांनाही वेळोवेळी प्रसिद्धी मिळाली आहे. लोकसत्तासाठी शेतशिवार पुरवणीला काही काळ लेखन केले.या लेखांचादेखील यात अंतर्भाव आहे. पण नेहमीचे लेखन करत असताना काही तरी हटके लिहिण्याचा विचार करत होतो. माझ्या मुलाची- अनिकेतची दहावी झाल्यानंतर त्याला पुढे कुठे पाठवायचे,याचा विचार चालू झाला, तेव्हा मी इंटरनेट व पुस्तके यांमध्ये वेगवेगळ्या कोर्सचा शोध घेऊ लागलो. यातून काही गोष्टी पुढे आल्या. एक म्हणजे- मुलांना ज्या विषयांत आवड आहे,ज्याकडे कल आहे, तिकडे त्याला पाठवा. पण त्यातून त्याला आपल्यापासून लांब राहणे जमते का? त्याला कोणत्या गोष्टीत इंटरेस्ट आहे. या गोष्टी जाणून घेताना काही अशा लोकांच्या कथा वाचायला मिळाल्या, ज्यांनी आपल्या आवडीचे क्षेत्र निवडून अक्षरश: आपल्या आयुष्याचे सोने केले. आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करायला मिळाल्याने मंडळी कामाचा आनंद तर उपभोगलाच पण त्याचबरोबर प्रचंड पैसाही कमवला.
      दुसरं म्हणजे काही वर्षे आपल्याला न आवडणार्या क्षेत्रात काम करून काहींनी त्या क्षेत्राला रामराम ठोकला आणि आपल्या आवडीच्या क्षेत्राचा स्वीकार केला. काहींना आपल्याला कशात इंटरेस्ट आहे हे कळायला काही महत्त्वाची वर्षे गेली.पण ज्यावेळेला कळले,तेव्हा मात्र त्यांनी आश्चर्यकारक प्रगती केली. काहींना समाजसेवा करण्यात रस होता. काहींनी स्वत:च्या कल्पनेतून छोट्या छोट्या नित्योपयोगी वस्तू बनवल्या.त्यातून ते पुढे आले. काहींना खेळात रस होता,मात्र घरातल्यांचा त्याला विरोध होता.मग घरच्यांना लपून छपून खेळाचा सराव केला. मोठ्या टुर्नामेंटमध्ये त्यांची निवड झाल्याचे घरच्यांना कळल्यावरच आपला मुलगा काय करतोय,याची त्यांना कल्पना आली. शेवटी घरच्यांना त्याचा स्वीकार करणे भाग पडले. काहींनी पर्यावरणासाठी स्वत:ला वाहून घेतलेले. यासाठी किती तरी किलोमीटर अंतर चालत जाऊन त्यांनी झाडांना पाणी घातले. जंगले वाचवण्यासाठी काहींनी लाकूडतस्करांशी दोन हात केले. अशा लोकांची अनेक संस्थांनी दखल तर घेतलीच पण शासनानेही त्यांची दखल घेऊन त्यांचा यथोचित गौरव केला,त्यांना प्रोत्साहन दिले. जगायला पैसा हा लागतोच,पण मन शांत असायला हवे असेल तर समाजसेवासुद्धा घडायला हवी. काहींनी धाडसी पावले उचलून जीवनात यश मिळवले. मग मला वाटले, शेवटी सतत प्रयत्न होत असतील आणि आवडीच्या क्षेत्राचा शोध चालला असेल तर त्याला यश हे नक्कीच मिळतं. मग अशा लोकांवरच का लिहू नये, असे वाटू लागले. बर्याच लोकांविषयी मराठीत माहिती उपलब्ध नाही. मग म्हटलं, हे काम आपण करावं. मग तिथून त्याच्या कामाला लागलो. आजवर पन्नास-साठ अशा विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उठवणार्या लोकांविषयी लिहिले आहे. इथून पुढेही लिहित राहणार आहे. नेहमीपेक्षा एक वेगळी वाट चोखाळल्यामुळे मला मराठी आठवीच्या पुस्तकात स्थान मिळाले, हे इथे मी आवर्जून उल्लेख करत आहे. वाचन आणि लेखन कायम ठेवले. त्यात सातत्य ठेवले.त्याचा लाभ मला झाला. अजून खूप लिहायचे आहे,विविध विषय हाताळायचे आहेत.पण काही घाई नाही. हळूहळू त्या इच्छाही पूर्ण होतील, असा मला विश्वास आहे.

No comments:

Post a Comment