Saturday, June 23, 2018

संधीचे सोने करा


     निराशजनक परिस्थितीतही जी माणसे आशा सोडत नाहीत, ती माणसे त्यांच्या आयुष्यात कुठल्याही प्रकारचे यश मिळवू शकतात. निराशेच्या परिघातून बाहेर पडल्यावर यश तुमची वाट पाहात असल्याचे तुम्हाला दिसेल. म्हणूनच आपण कधीही निराश होऊ नये. एखाद्या मोठ्या कारणामुळे निराशा आली तरीही लगेच आपल्या उणिवा दूर करून पुढे जायला हवे. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपली आशा आणि ध्येय नेहमी समोर ठेवा. आशा आणि ध्येय समोर असल्यावर तुम्हाला कधीही निराशपणा येण्याचा प्रश्नच येत नाही. आपल्याला निराशेने घेरू नये, यासाठी अशा वातावरणातून बाहेर पडा. कारण तुमच्या भोवताली सर्वत्र निराशाच पसरलेली असेल तर तुम्ही काहीही काम करू शकत नाही, हे लक्षात ठेवा. या निराशेच्या अंधारात तुमच्यापर्यंत उजेडाचा एकही किरण पोहचू शकत नाही. त्यामुळे आशा आणि उत्साहाने भरलेल्या वातावरणात जा. असे मित्र जोडा,पुस्तके वाचा. जेणेकरून तुम्हाला निराशा घेरणार नाही. अशा प्रकारचा निर्णय तुमच्यासाठी फायद्याचा राहणार आहे.

     निराशवादी माणसे नेहमी रडतरावसारखे रडत असतात.विव्हळत असतात. त्यांना प्रत्येक संधी अवघड वाटते. याच्या उलट आशावादी लोकांचे असते. अशी माणसे दुसर्याला हुरुप देतात. अशी माणसे प्रत्येक अवघड गोष्टीतही संधीचा शोध घेत असतात. आपल्याला संधी मिळत असते.पण ती पकडायला यायला हवी. आपले प्रयत्न असतील तर संधीदेखील चालत तुमच्या दारापर्यंत येते. आपल्याकडल्या गुणांची,कौशल्याची जाणीव लोकांना करून देताही आली पाहिजे. त्यासाठी कोणत्याही माध्यमाचा वापर करता आला तर ती करायला हवी. कारण आपल्याकडे काय आहे आणि काय नाही, याची कल्पना समोरच्याला यायला हवी, अशा प्रकारचे वर्तन आपले असले पाहिजे.
अमेरिकेतला एक भिकारी कोट्यधीश होतो, त्याची एक कथा आहे. अमेरिकेच्या ब्रुकलिनमध्ये जन्माला आलेला टेड व्हिलियम त्याच्या वाईट सवयी आणि कमकुवत आर्थिक परिस्थितीमुळे अमेरिकेतल्या एका राज्यातल्या ऑहियोच्या रस्त्यावर भीक मागत होता. नशा करण्याच्या त्याच्या व्यसनामुळे त्याला कित्येकदा तुरुंगाचीदेखील हवा खायला लागली होती. तुरुंगातून सुटल्यावर तो रस्त्यावर एका कार्डावर माझा आवाज खूप छान आहे.‘ असे लिहून भीक मागायचा. रात्री पेट्रोल पंपाच्या पाठीमागे बनवलेल्या तंबूत झोपायचा.
     एके दिवशी नशिबाने कुठल्या तरी एका बातमीदाराची दृष्टी त्याच्यावर पडली. त्याने या टेड व्हिलियमची मुलाखत घेण्याचा विचार केला. आणि सहज गंमत म्हणून त्याचा शूट केलेला व्हिडिओ युट्यूबवर टाकला. व्हिडिओ येताच त्याची चर्चा सर्वत्र होऊ लागली. यानंतर न्यूयॉर्क शहरातल्या एका टीव्ही चॅनेलने त्याला त्यांच्या मॉर्निंग शोमध्ये इंटरव्यू घेण्यासाठी बोलावणे पाठवले. इथे त्याची निवड झाली. या शिवाय त्याने अनेक कंपन्यांच्या जाहिरातींसाठी आपला आवाज दिला. यामुळे तो अल्पावधीतच अमेरिकेतला लोकप्रिय लोकांमधला एक म्हणून ओळखला जाऊ लागला. टेड व्हिलियमचा गोल्डन वॉयस हा पुरस्कार देऊन गौरवही करण्यात आला.
      टेड व्हिलियमने आपल्या संघर्षाची आणि यशाची आत्मकथा सांगणारे पुस्तकदेखील लिहिले. त्यांच्या या यशाच्या कथेतून आपल्याला प्रेरणा घेता आली पाहिजे.आयुष्यात आपल्याला अनेक संधी मिळतात, त्यामुळे आपल्याला निराश होऊन कधीही प्रयत्न बंद करायचे नाहीत. एक लक्षात ठेवा, तुम्ही आशावादी झालात की, तुमच्या मनात असलेल्या सर्व प्रकारच्या निराशा आपोआप नाहीशा होतात.
अपयश आले म्हणून खचून जाऊ नका. प्रयत्न करत राहा. प्रयत्न करत राहिल्याने अशक्य ती गोष्ट शक्य होऊन जाते. आणि शेवटी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणी तरी सांगितली आहे, ती सांगतो आहे, निराश आनि हताश होऊन बसण्यापेक्षा किंवा एखादे आत्मघातकी पाऊल उचलण्यापेक्षा तुम्ही समाजसेवेला वाहून घेतलेले सर्वात चांगले. कारण त्यामुळे तुमचे जीवन सार्थकी लागते.

No comments:

Post a Comment