देशातल्या वाघांची संख्या दिवसेंदिवस
कमी होत चालल्याने सरकार आणि वन्यप्राणीप्रेमींसाठी हा एक चिंतेचा विषय ठरला आहे. कधी काळी लोकांमध्ये आपल्या डरकाळीने दहशत निर्माण करणारे
वाघ आज आपल्या अस्तित्त्वासाठी संघर्ष करताना दिसत आहेत. आज वाघांच्या
आठपैकी पाचच जाती उरल्या आहेत. वर्ल्ड वाइल्ड लाइफ नावाच्या संस्थेचा
अंदाज असा आहे की, 2022 पर्यंत वाघ जंगलातून लुप्त होतील.
वाढते शहरीकरण आणि जंगलाचे कमी होत असलेले आकारमान यामुळे वाघांचा अधिवास
हिरावून घेतला जात आहे. त्याचबरोबर मानवदेखील त्याच्याशी क्रूरपणे
वागताना दिसत आहे,त्यामुळे त्याचा परिणाम आपल्यासमोर दिसत आहे.
राष्ट्रीय वाघ सर्व्हेक्षण प्राधिकरणच्या
अहवालानुसार 2017 मध्ये 115 वाघांना आपला जीव गमवावा लागला आहे. यात 32 माद्या आणि 28 नर होते. यातल्या
उर्वरित वाघांची ओळख पटू शकलेली नाही. 2017 मध्ये वाघांच्या मृत्यूबाबत
मध्य प्रदेश आघाडीवर राहिला आहे. इथे 29 वाघांचा मृत्यू झाला आहे. यानंतर महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तराखंड
आणि आसाम या राज्यांचा समावेश होतो. 84 टक्के वाघांचा मृत्यू
या पाच राज्यांमध्येच झाला आहे. आकडेवारीनुसार 2016 मध्ये 120 वाघांचा मृत्यू झाला होता आणि ही संख्या
2006 नंतर सर्वाधिक होती. 2015 मध्ये
80 वाघांचा मृत्यू झाल्याची पुष्ठी मिळाली होती. याअगोदर म्हणजे 2014 मध्ये हीच संख्या 78 इतकी होती. आज जगात फक्त 3 हजार
890 वाघ शिल्लक राहिले आहेत. एकट्या भारतात जगातल्या
एकूण वाघांच्या संख्येंपैकी साठ टक्के वाघ होते. पण भारतातल्या
वाघांच्या संख्येत गेल्या काही वर्षांत फारच मोठी घट झाली आहे. एक काळ असा होता की, आपल्या देशात सुमारे एक लाख वाघ
होते. आज ही संख्या घटून फक्त 1500 इतकी
राहिली आहे. हे वाघदेखील आता भारतातल्या दोन प्रदेशांमध्येच उरले
आहेत.
वेग आणि ताकद यासाठी प्रसिद्ध असलेल्या
वाघांच्या संख्येत वेगाने होत असलेली घट आज चिंतेची गोष्ट असली तरी यामागची कारणे मात्र
अनेक आहेत. यातले पहिले कारण आहे ते आपल्या
वाढत्या लोकसंख्येचे आणि शहरीकरणाचे! या कारणामुळे जंगल क्षेत्र
झपाट्याने कमी होत असून या जंगलाचे स्थान सिमेंट काँक्रिटच्या जंगलाने घेतले आहे.
म्हणजेच जबरदस्तीने विकासाचा होत असलेला शिरकाव प्राण्यांच्या अस्तित्त्वाचा प्रश्न उपस्थित करत आहे. वनोन्मूलनच्या कारणामुळे वाघांच्या
अधिवासामध्ये घट येत आहे,त्यामुळे त्यांची संख्या कमी होत चालली
आहे. दुसरे कारण आहे, वाघांची तस्करी!
वाघांच्या साम्राज्यात म्हणजेच व्याघ्र प्रकल्पांमध्ये डिझिटल कॅमेर्यांची घुसखोरी आणि पर्यटनाला दिलेली मुक्त सवलत यामुळे तस्कर सहजरित्या वाघांपर्यंत
पोहचत आहेत. चीनमध्ये काही देशी औषधे आणि शक्तीवर्धक पेये बनवण्यासाठी
वाघांच्या शरिराच्या विविध अंगांचा मोठ्या प्रमाणात वापर करत असल्याच्या बातम्या आपल्याला
वाचायला मिलत आहेत.त्यामुळे वाघांच्या तस्करीत वाढ होताना दिसत
आहे. आणखी काही देशांचे लोक विविध प्रकारच्या लालसेने या वाघांच्या
शिकारीत आणि तस्करीत गुंतले आहेत. शिकार केल्यानंतर वाघांचे विविध
भाग चीनमध्ये पाठवले जातात.
जाणकारांनी आशियामध्ये वाघांच्या संख्येच्या
वाढीसाठी 42 वनक्षेत्रे पोषक असल्याचे मत व्यक्त केले आहे.
काही देशांमध्ये मात्र अशा वनक्षेत्रांच्या परिस्थितीमध्ये सुधारणा करण्यात
न आल्याने वाघांची वंशवृद्धी होऊ शकत नाही. या क्षेत्रांमध्ये
भूमाफियांची वक्रदृष्टीदेखील कारणीभूत आहे. शिवाय वाघांच्या आजारांमुळेही
धोका वाढत आहे. शास्त्रीय अध्ययन आपल्याला सांगते की,
अभयारण्यांच्या आजूबाजूला राहत असलेली कुत्री असे संक्रमक आजार पसरवत
आहेत, जे वाघांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहेत. त्याचबरोबर विजेचा धोका, त्यांच्या त्यांच्यातली लढाई,
रेल्वे आणि रस्ते अपघात यांमध्येही वाघ मारले जात आहेत. शिवाय त्यांना विष घालून मारले जात असल्याच्या घटनादेखील उघडकीस आल्या आहेत.
आणखी एका गोष्टीकडे लक्ष वेधण्याची आवश्यकता आहे, ती म्हणजे वाघांच्या मृत्यूचे प्रमाण मानववस्तीत घुसल्याने आणि शिकार्यांच्या होत असलेल्या शिकारीमुळे वाढले आहे. जंग़लात पाण्याची
कमतरता असल्याने वाघांना मानववस्तीत येणे भाग पडले आहे. वाघांची
डोकी पाण्याच्या भांड्यांमध्ये अडकल्याच्या अनेक घटना आपल्याला पाहायला आणि ऐकायला
मिळाल्या आहेत.
आपल्याला आणखी एक गोष्ट विसरून चालणार
नाही, ती म्हणजे वाघांचे पर्यावरणाच्यादृष्टीने खूप मोठे महत्त्व
आहे. पर्यावरणीय पिरामिड म्हणजेच अन्नसाखळीत वाघ सर्वात मोठा
उपभोक्ता आहे. वाघ वाचला तरच आपण बचावणार आहोत. आज वाघ संरक्षण देशाचीच नव्हे तर संपूर्ण जगाचीच एक मोठी समस्या बनली आहे.
संरक्षणाच्या अभावामुळे वाघांकडून मिळणार्या लाभापासून
आपल्याला वंचित राहावे लागत आहे. भारतात भारतीय वन्यजीवन बोर्डाच्यावतीने
1972 मध्ये सिंहाच्या जागी वाघाला भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून स्थान
देण्यात आले. यानंतर सरकारने वाघांची कमी होत असलेली संख्या पाहता
1973 मध्ये वाघ वाचवा धोरण राबवले होते. त्यामुळे
निवडलेल्या व्याघ्र प्रकल्प क्षेत्रांना विशिष्ट दर्जा दिला गेला आणि तिथे विशेषण संरक्षणाचा
प्रयत्न केला गेला. या योजनेला आता नॅशनल टायगर अथॉरिटी
(राष्ट्रीय वाघ प्राधिकरण) बनवले गेले.
वाघांची दखल घेण्यासाठी 29 जुलै रोजी जागतिक वाघ
दिवस साजरा केला जातो.
वाघाच्या बचावासाठी सरकारने योजना आणि
कायदे बनवण्यात कोणतीच कसर बाकी ठेवली नाही. पण
इतके करूनही वाघांची संख्या कमी होतच आहे. हा मोठा चिंतेचा विषय
आहे.खरे तर सत्य असे की, राज्य सरकारांचीदेखील
उदासिनता आणि भ्रष्टाचार प्रवृत्ती यांमुळे संरक्षणाच्या नावावर वाघांपर्यंत जो लाभ
जायला हवा होता, तो मधल्या मध्ये हडप केला जात असल्याने वाघांच्या
संरक्षणाची सरकारी पातळीवरून केली जाणारी यंत्रणा पांढरा हत्ती म्हणून सिद्ध होत आहे.
सरकारने वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत अनेक कायदे केले आहेत.
यात वाघाची शिकार करणार्याला सात वर्षांची शिक्षा
होऊ शकते. मात्र लाचारी प्रवृत्तीमुळे भक्कम पुरावे न्यायालयापुढे
सादर होत नाहीत, त्यामुळे क्वचितच लोकांना शिक्षा होताना दिसते.
या परिस्थितीत आवश्यकता या गोष्टीची
आहे की, जंगल टास्क फोर्सची स्थापना करायला हवी आणि त्याला पोलिस
समकक्ष अधिकार द्यायला हवेत. वन्यजीव आणि जंगलाशी संबंधित प्रकरणांचा
निपटारा करण्यासाठी खास ट्रिब्यूनलची स्थापना आणि दुष्काळ किंवा कोणत्याही प्रकारच्या
अन्य आपत्तीजन्य जसे की, वणवे वगैरेवर तात्काळ आणि प्रभावी कारवाई
करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन टीमची स्थापना करायला हवी. वन विभाग
अद्ययावत आणि तंत्रज्ञानयुक्त करण्याबरोबरच अधिकारी वर्गांना विशेष अधिकार देण्याचीही
आवश्यकता आहे. यामुळे लाकूड तस्करी आणि वन्यप्राणी शिकार्यांशी समर्थपणे सामना करता येईल. कायद्याचे पालन निश्चित करण्याची आणि गुप्तयंत्रणा विकसित करण्याची गरज आहे. वन आणि वनात राहणार्या प्राण्यांविषयी लोकांमध्ये जागृती
करायला हवी. जर सर्वच लोकांना वन प्राण्यांच्या लुप्त होण्याची
कारणे आणि त्याचे परिणाम समजावून सांगितल्यास निश्चितच सकारात्मक
परिणाम दिसून येतील आणि राजकीय पक्षदेखील त्यांच्या अजेंड्यावर या मुद्द्यांना स्थान
देतील. नंतर सत्तेवर आलेल्या राजकीय पक्षांना काही ठोस पावले
उचलावी लागतील.
लोकांनी वन्यप्राण्यांना दया आणि सहानुभूतीच्या दृष्टीकोनातून पाहायला हवे.
आणि अशा उत्पादनांवर,वस्तूंवर बंदी घालायला हवी, ज्यांमध्ये
वन्य प्राण्यांचा विविध अंगांचा वापर केला जातो. अजाणतेपणी शहरात
घुसलेल्या प्राण्यांना मारले जाऊ नये. वाघांची सद्याची परिस्थिती
पाहता वाघांसाठीच्या आरक्षित, व्याघ्र प्रकल्पांमध्ये माणसांची
लूडबूड पूर्णपणे थांबवली पाहिजे. वाघांनी प्राचीन काळापासून जंगलांमध्ये
राज्य केले आहे. जरी आपण त्यांना त्यांच्या आहे त्या परिस्थितीत
सोडले तरी परिस्थिती पूर्वपदावर येऊ शकेल.मात्र यासाठी जंगलातून
आपली पावले माघारी घेतली पाहिजेत. आता नैसर्गिक संतुलन कायम ठेवण्यासाठी
काही भाग आपल्याला पुन्हा निसर्गाला द्यावा लागेल. आपण विकासाच्या
नावाखाली जर पाणी, जंगल आणि जमीन या मूलभूत गोष्टींचे नुकसान
करत असू तर हा विकास नव्हे तर विनाश आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.
No comments:
Post a Comment