Monday, June 18, 2018

कालचा विचार करून आजचा दिवस का बेकार घालवता?


     क्रोधापासून माणसाने स्वत:ला दूर ठेवले पाहिजे. कारण क्रोध काहीही करू शकतो. आयुष्यातून उठवू शकतो. माती खायला लावतो. त्यामुळे त्याच्यापासून चार हात लांब राहायला हवे. त्याचबरोबर क्रोधी माणसांपासून शहाण्यांनी लांब राहिले पाहिजे. क्रोधी माणूस काय बोलतो, हे त्यालासुद्धा माहित नसते, कारण त्याचे स्वत:वरचे नियंत्रण सुटलेले असते. रागाच्या भरात त्याला कोण आपलं, कोण परकं, याचा पत्ताच नसतो. त्यामुळे क्रोधी माणूस भांडणाच्या मूडमध्ये असेल तर आपण शांत राहिलं पाहिजे. भांड्याला भांडं वाजलं की, त्याचा तमाशा व्हायला वेळ लागत नाही. तमाशा पाहायला जशी गर्दी होते, तशी गर्दी आपण रागीट माणसाच्या नादाला लागले की होते. अशा वेळेला आपण शांत राहणेच महत्त्वाचे आहे. शांत व्यक्तिमत्त्वाची माणसं भांडणाचे दार बंद करण्यात यशस्वी होतात.

     मोटीवेशन देणारे सूर्यासिंह सांगतात, तुमच्यावर कोणी संतप्त झाले असेल तर, त्याला विरोध करण्याऐवजी त्याच्यापासून दूर निघून जायला हवे. थोड्या वेळानंतर त्याचा राग आपोआप शांत झाल्याचे तुम्हाला आढळून येईल. संतप्त व्यक्तीवर मात करण्याचा सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे त्याच्यापासून लांब राहणे. रागीट माणसानेही आपल्या क्रोधावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. क्रोध करून होणार्या नुकसानीचा अगोदर त्याने विचार करायला हवा. आणि खरोखरच आपल्याला आपले बिघडून घ्यायचे असेल तर दुसरे काही करावे लागत नाही. आपण फक्त संतप्त व्हायचे, बाकी ते सर्व काम करून मोकळे होते. राग हा आपल्या रक्तात इतके विकार भरतो की, तुमचे सर्व रक्त विषारी बनते. तुमची वाणी विषारी बनते,तुमचे हावभाव विकारी बनतात. पुढे तुमचे हृदयदेखील विषारी बनते. त्यामुळे क्रोधापासून जितके लांब राहता येईल, तितके लांब राहायला हवे.
     याबाबतीत भगवान गौतम बुद्धांची एक कथा सांगितली जाते. एकदा भगवान गौतम बुद्ध प्रवचन देत देत एका गावात पोहचले. तिथल्या लोकांना ते उपदेश देत राहिले. त्या लोकांमध्ये एक क्रोधी माणूसदेखील होता. बाकीचे लोक प्रवचन अगदी तल्लीन होऊन ऐकत होते. पण त्या रागीट माणसाला त्यांच्या प्रत्येक गोष्टी व्यर्थ वाटत होत्या. शेवटी काही वेळ प्रवचन ऐकल्यावर या माणसाचा रागाचा पारा चढला. तो उठून त्यांच्या प्रत्येक गोष्टींना विरोध करू लागला. त्यांना वाट्टेल तसे बोल्ल लागला.
     त्या माणसाचे कटू बोल ऐकून भगवान बुद्ध जरादेखील विचलित झाले नाहीत. ते शांत राहिले. भगवान बुद्धांकडून कोणतीच प्रतिक्रिया येत नसल्याचे पाहून त्याच्या रागाचा पारा आणखी उसळला. तो भगवान बुद्धांचा अपमान करून तिथून निघून गेला.
     दुसर्यादिवशी त्याचा राग शांत झाला. त्याला त्याने केलेल्या कृत्याचा पश्चाताप झाला. त्याने भगवान बुद्धांसाठी संपूर्ण गाव धुंडाळून काढले,पण त्याला बुद्ध कुठेच दिसले नाहीत. भगवान बुद्ध तोपर्यंत दुसर्या गावाला जाऊन पोहचले होते.तो काही लोकांना त्यांचा पत्ता विचारत विचारत त्या गावात पोहचला, ज्या गावात बुद्ध होते.त्यांना पाहाताच त्याने भगवान बुद्धांचे पाय धरले आणि म्हणाला,भगवान, मला क्षमा करा.
     भगवान बुद्धांनी विचारले,तू कशाची क्षमा मागतो आहेस? त्यावेळेला ती व्यक्ती म्हणाली,भगवान, मी तो माणूस आहे, जो काल तुम्हाला वाटेल तसा बोलला. तुमचा अपमान केला. मी केलेल्या कृत्याचा आता मला पश्चाताप होत आहे. त्यासाठीच मी तुमची क्षमा मागत आहे. त्याचे बोलणे ऐकून भगवान बुद्ध म्हणाले, गेलेला काळ मी तिथेच सोडून आलो आहे. तू मात्र अजून त्यातच अडकून पडला आहेस. तुला तुझ्या चुकीची जाणीव झाली आहे. हीच सर्वात मोठी गोष्ट आहे. आता तू आजमध्ये प्रवेश कर. गेलेल्या भूतकाळाचा विचार करत बसून आजमध्ये प्रवेश कर. गेलेल्या काळाचा विचार करून आजचा बहुमूल्य वेळ वाया घालवू नकोस. त्याच क्षणी त्या क्रोधी माणसाचा क्रोध कुठल्या कुठे पळून गेला. त्याचेपार जीवनच बदलून गेले. क्रोधाच्या जागी त्याच्या मनात प्रेमाच्या धारा वाहू लागल्या.

No comments:

Post a Comment