Friday, June 8, 2018

(बालकथा) पूर्वजांची अमानत


     राजा कृष्णदेवरायचा दरबार भरला होता. तेवढ्यात उंची वस्त्रे परिधान केलेला एक व्यापारी दरबारात आला. सोबत त्याने एक मोठी नक्षीदार संदूक आणली होती. व्यापारी हात जोडून राजाला म्हणाला,“ महराज, मी काही दिवस तीर्थरात्रेला निघालो आहे. ही संदूक माझ्या पूर्वजांची अमानत आहे. ही एकाद्या सुरक्षित ठिकाणी ठेवावी. यात्रेवरून परतल्यावर घेऊन जाईन.”

राजाने पेटीचे वजन केले. व्यापार्याला त्याची पावती दिली आणि ती संदूक तेनालीरामकडे सोपवली.
     काही महिने उलटल्यानंतर व्यापारी आला. त्याने संदूक मागितली. तेनालीराम आणि व्यापारी संदूक घ्यायला तेनालीरामच्या घरी गेले. संदूक त्याने उचलण्याचा प्रयत्न केला, तर ती त्याला फारच हलकी वाटू लागली. तो काळजीत पडला. व्यापार्याच्या सांगण्यावरून त्याचे वजन करण्यात आले. त्याचे वजन पहिल्यापेक्षा फक्त एक चतुर्थांश भरले. तेनालीराम समजून चुकला की, व्यापार्याने काही तरी चलाकी केली आहे.
     तेनालीरामने त्या संदुकीचे काळजीपूर्वक निरीक्षण केले. तो दरबारात गेला आणि घाबरल्याचे नाटक करत म्हणाला,“ महाराज, या व्यापार्याचे पूर्वज माझ्या घरात घुसले आहेत. ते पेटी व्यापार्याकडे सोपवू देईनात.”
व्यापारी ओरडून म्हणाला,“ हा धूर्त आहे, महाराज! माझी संदूक हडपण्याचा याचा डाव आहे.”
     दरबारातले काही लोक व्यापार्याच्या बाजूने झाले. राजा म्हणाला,“ तेनालीराम, आपण सर्वजण तुझ्या घरी जाऊ. पण लक्षात ठेव. जर तू जे बोलतोयस, ते खोटे निघाले तर तुझी काही खैर नाही. तुला मोठ्यात मोठी शिक्षा ठोठावली जाईल.”
     दरबारी मंडळींसोबत राजा कृष्णदेवराय तेनालीरामच्या घरी गेले. सर्वजण संदूक ज्या खोलीत ठेवली होती, त्या ठिकानी गेले. राजाने पाहिले, पेटीच्या चारी बाजूने मुंग्यांची रांग लागली होती. मुंग्या त्यातून येत-जात होत्या. राजाने संदूक खोलण्याचा आदेश दिला. संदूक खोलण्यात आली तर त्यात साखर भरलेली होती. पण  निम्म्यापेक्षा अधिक साखर मुंग्यांनी फस्त केली होती.
     दरबारातल्या काही लोकांचे चेहरे पांढरेफट्ट पडले. राजाने व्यापार्याला कैद करण्याचे फर्मान सोडले. तो घाबरला. त्याने दरबारातल्या काही लोकांचे भांडे फोडले. त्यांनी त्याला असे करण्यासाठी पैसे दिले होते. तेनालीरामला बदनाम करण्यासाठी षडयंत्र रचले गेले होते. राजाने त्या सर्वांना कैद करण्याचे आदेश दिले. त्यांना जबर दंड ठोठावण्यात आला. आणि तेनालीरामला पुरस्कार देण्यात आला.

No comments:

Post a Comment