Thursday, June 28, 2018

धोक्याच्या बदल्यात धोका


     प्रामाणिकपणा हा माणसाचा खरा अलंकार आहे. संत सुकरात म्हणतात, ज्याला प्रामाणिकपणा नाही, तो माणूस नाही. सर्व काही विकले तरीही आपला प्रामाणिकपणा कधीही विकू नका, असे आवाहनही त्यांनी आपल्याला केले आहे.म्हणजे माणसाजवळ प्रामाणिकपणा नसेल, तर त्याच्याकडे दुसरे त्याचे म्हणून काहीच उरत नाही. त्यामुळे एक प्रामाणिक व्यक्ती म्हणून लोक तुम्हाला ओळखत असतील तर, तुम्ही एक महत्त्वाची व्यक्ती आहात, हे लक्षात ठेवा. आणि हे आजच्या घडीला दुर्मीळ आहे, असे म्हणायलाही हरकत नाही. त्यामुळे प्रामाणिकपणा जपायला शिकले पाहिजे.

     धन दौलतीच्या मोहापायी जी माणसं आपला धर्म आणि प्रामाणिकपणा विकून खातात, अशा व्यक्तीचा आत्मा कधीच शांत होऊ शकत नाही, असे म्हणतात. वास्तविक, ज्याने पैशांचा संचय केला आहे, अशा माणसाला कधीच शांत झोप लागत नाही. आपण दुसर्याला लुबाडून आपले घर भरलेले असते,पण आपलेही घर कोणी तरी लुटेल, याची त्याला सतत भिती वाटत असते. त्यामुळे अशी माणसे सतत चलबिचल असतात. तणावाखाली असतात. पण ज्याने प्रामाणिकपणाने कमावलेले असते, त्याला कुणाचीच आणि कसलीच भिती नसते. अशी माणसे बिनधास्त रात्री झोपी जातात. सकाळी फ्रेश होतात आणि आनंदाने कामाला जातात.
     सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आपण काय बोलतो, यावरून आपला प्रामाणिकपणा ठरत नाही, तर आपण काय करतो, हे महत्त्वाचे असते. त्यावरून आपला प्रामाणिकपणा ठरत असतो. त्यामुळे आपले वागणे आदर्शवतच असले पाहिजे.कोणत्याही व्यक्तीचा प्रामाणिकपणा आपण आयकर विवरण पत्रासारखा भरून घेऊ शकत नाही. कारण प्रामाणिकपणा तर त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग असतो आणि तो त्याच्या मानसिकतेत वसलेला असतो, कागदात नाही. प्रामाणिक माणसाचे व्यक्तिमत्त्व भरदार असते. तिथे भलेभले नतमस्तक होत असतात. अशा व्यक्तिमत्त्वाजवळून जाण्याची काहींची लायकीसुद्धा नसते. अशी माणसे या व्यक्तींकडे जाण्याचे धाडस करत नाहीत. कारण ती स्वत:च स्वत:च्या कर्मामुळे खजिल झालेली असतात.
     आपल्याला माहित आहे, जशास तसे, ठकास महाठक, जैसे को वैसा तसे धोका देणार्याला धोका हा मिळतच असतो. आणि प्रामाणिकपणे काम करणार्याला यश मिळतच असते. त्यामुळे चुकीचे वागू नका, भलतासलता मार्ग धरू नका. प्रामाणिक काम करत राहा, यश हे नक्की मिळतच असते, असे आपली संत मंडळी सांगून गेले आहेत. नाही तर जशास तसे उत्तर द्यायला माणसे तयारच आहेत. यासदंर्भात एक गोष्ट सांगितली जाते. एक शेतकरी होता. एक बेकरीवाला रोज त्याच्याकडून दोन किलो लोणी घेऊन जायचा. एके दिवशी बेकरीवाल्याची लहर फिरली. त्याने लोणीचे वजन करण्याचा निर्णय घेतला. कदाचित शेतकरी आपल्याशी लबाडी करत नसेल, असेही त्याला वाटले आणि लोणी त्याने तराजूत तोलून पाहिला. आणि काय आश्चर्य! लोणी कमी आढळून आला.  बेकरीवाल्याचा अंगाचा  रागाने तीळपापड झाला. शेतकर्याने आपल्याला फसवले आहे, याची त्याला खात्री झाली आणि या शेतकर्याने आपल्याला किती लुबाडले, याचा अंदाजही करू लागला, तसा त्याचा बीपी वाढत चालला. बेकरीवाल्याने शेवटी शेतकर्याला न्यायालयात खेचले.
तिथल्या न्यायाधीशाने शेतकर्याला विचारले, “ लोणी तोलण्यासाठी तुम्ही काय करता? तोलण्यासाठी काही निश्चित असे भांडे वैगेरे ठेवला आहात का?  शेतकरी म्हणाला, “ श्रीमंत! मी गरीब आहे. माझ्याकडे यासाठी निश्चित असा उपाय सापडत नव्हता पण मी यासाठी निश्चित एक उपाय शोधला होता.
     न्यायाधीशाने विचारले, “ मग सांगा,तुम्ही लोणी तोलण्यासाठी काय वापरता?ङ्घ
     शेतकर्याने उत्तर दिले, “ खूप दिवसांपासून बेकरीवाला माझ्याकडून लोणी खरेदी करतो. मीही त्याच्याकडून दोन किलोचे ब्रेड खरेदी करतो. तो रोज ब्रेड घेऊन येतो आणि तेच दोन किलोचे ब्रेड तराजूच्या दुसर्या बाजूला ठेवतो. आणि तेवढ्याच वजनाचे लोणी त्याला विकत देतो. लोणी कमी पडले असेल तर यात माझा काही दोष नाही. दोष असेल तर तो या बेकरीवाल्याचा आहे. ” अर्थात बेकरीवाला खजिल झाला, हे सांगण्याची काही गरज नाही.
     याचा अर्थच असा की, धोक्याच्या बदल्यात धोकाच मिळत असतो. आणि प्रामाणिक काम करत असाल तर तुम्हाला नक्कीच यश मिळते.

No comments:

Post a Comment