Wednesday, June 27, 2018

यशाचं रहस्य काय?


     ‘ पुढच्याच ठेच ,मागचा शहाणा’ अशी एक म्हण आहे. म्हणजे पुढच्या माणसाने ज्या चुका केल्या, ते चुका आपल्या हातून होणार नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे. यशाचे खरे हेच गमक आहे. यश मिळवण्यासाठी उगीच घाई करून चालत नाही. शिवाय एकापेक्षा अधिक कामांत हात घालून चालत नाही. कारण त्यामुळे कुठल्या एकाच कामाकडे पूर्ण लक्ष देता येत नाही. एका वेळी एकापेक्षा अधिक कामे करणारी व्यक्ती कोणत्याही कामात यश मिळवू शकत नाही. दोन नावांमध्ये बसून प्रवास करणार्यांप्रमाणेच बुडणे हेच त्याच्या नशिबी असते. ‘एक ना भर भाराभर चिंध्या’ असे उगीच म्हटलेले नाही. म्हणजे अपयशाची अनेक कारणे आहेत, ही यशस्वी होणार्या माणसाने अयशस्वी लोकांकडून शिकले पाहिजे. त्यामुळे अपयशी माणसेही वाचायला शिकली पाहिजेत, हे प्रामुख्याने लक्षात ठेवले पाहिजे.

     यश मिळवण्यासाठी विनाकारण घाई करून चालत नाही. कारण यशासाठी केलेली घाई, हीसुद्धा अपयशी होण्याचे कारण आहे. आणि ही चूक आपण लगेच सुधारली पाहिजे. जर त्यातून आपण काही शिकू शकलो नाहीत तर मात्र शेवटी पदरी आपल्या धोकाच आहे. प्रेरक विचार देणारे सूर्यासिन्हा म्हणतात,यशस्वी लोक चुका करून त्यांचा स्वीकार करतात आणि त्यात सुधारणा करून पुढे जातात. हुशार लोक आपल्या आणि दुसर्याच्या अपयशातून धडा घेतात आणि आपले सर्व लक्ष यशावर लक्ष केंद्रित करतात.
     एकदा पराभवाने खचलेली व्यक्ती जीवनात यशस्वी झालेल्या एका व्यक्तीकडे गेला. त्याने यशस्वी व्यक्तीला विचारले, “दादा, तुमच्या यशाचे रहस्य काय आहे? ” यशस्वी व्यक्ती त्याला म्हणाली,“ आयुष्यात जी माणसं यशस्वी झाली नाहीत, त्यांच्याकडूनच तर मी जीवनात यशस्वी होण्याचे धडे घेतले आहेत. अपयशी व्यक्ती म्हणाली, तुम्ही काय सांगता आहात, ते मला काही कळालं नाही, जरा समजून सांगितलं तर बरं होईल. तेव्हा यशस्वी व्यक्ती म्हणाली, मला सांगा, तुमच्या पदरात अपयश का पडल?
     अपयशी माणूस म्हणाला, “ पूर्वी मी खूप श्रीमंत होतो. यशस्वी होण्यासाठी मी एक कंपनी काढली. त्यात मी खूप मोठी गुंतवणूक केली. मला लगेच यशस्वी व्हायचं होतं. त्यामुळे मी त्याचवर्षी पुन्हा एक दुसरी कंपनी सुरू केली. त्यात मी माझे उरलेले सगळे पैसे गुंतवले. मी घाईगडबडीने दोन कंपन्या सुरू केल्या,पण मला कोणत्याही कंपनीला पूर्ण वेळ देता आला नाही.
     तो पुढे सांगू लागला, काही वर्षातच दोन्ही कंपन्या तोट्यात गेल्या. मला त्या कंपन्या वर काढण्याकरता पैसाच मिळाला नाही. मग काय! दिवसेंदिवस तोटा वाढत चालला आणि शेवटी एक दिवस कंपनी बंद करावी लागली. आज मी पूर्ण अपयशी आहे.
     आता यशस्वी व्यक्ती म्हणाली, तुमच्या अपयशाची दोन कारणे आहेत.एक म्हणजे,तुम्ही एकाच वेळी दोन कंपन्या सुरू केल्या. त्यामुळे तुम्ही कुठल्याही एका कंपनीला पूर्ण वेळ देऊ शकला नाही. दुसरे कारण म्हणजे,तुम्ही या दोन्ही कंपन्यांमध्ये तुमचा सगळा पैसा गुंतवला. ज्यावेळेला तुम्हाला कंपन्यांमध्ये तोटा झाला,त्यावेळेला त्या कंपन्या तोट्यातून बाहेर काढण्यासाठी तुमच्याजवळ पैसाच शिल्लक नव्हता. आता मी जे सांगितले, हे बरोबर आहे का? तुम्ही याच्याशी सहमत आहात का?
 मग आता मला सांगा,या अपयशातून तुम्ही काय शिकला? 
     अपयशी व्यक्ती म्हणाली, मी माझ्या अपयशातून काय शिकणार? यशस्वी झालो असतो तर बरंच काही शिकलो असतो.
     यशस्वी व्यक्ती म्हणाली, तुम्ही तुमच्या अपयशातून काहीच शिकला नाहीत. म्हणून तुम्ही आजदेखील अपयशी आहात.मी मात्र अपयशी लोकांच्या अपयशातूनच शिकलो आणि यशस्वी झालो. मी अपयशी लोकांनी ज्या चुका केल्या, त्या चुकांमधून शिकलो आणि माझ्या आयुष्यात त्या चुका केल्या नाहीत. हेच माझ्या यशाचे रहस्य आहे. ” 

No comments:

Post a Comment