Wednesday, June 13, 2018

या युवकांना आवरा रे !


      परवा रात्री जत शहरात युवकांच्या दोन गटात किरकोळ कारणांवरून वादावादी झाली.त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले. यावेळी नंग्या तलवारी नाचवण्यात आल्या. या युवकांनी झुंडीने जाऊन शहरातील दुकाने बंद करायला भाग पाडले. लोकांनीही विनाकारण झंझट मागे लागायला नको म्हणून आपला बाडबिस्तारा आवरून घर गाठणे पसंद केले. खरे तर या गोष्टीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. कोणीही उठतो, शहर बंद करायला निघतो. जत शहरात कायदा सुव्यवस्था अस्तित्वात आहे की, नाही असा सवाल करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. पुढारी,सामाजिक, जातीपातीच्या संघटना यांच्या पाठबळावर आजचा युवक दुसऱ्याला वेठीस धरायला निघाला आहे. पोलीस तक्रारीशिवाय काही कारवाई करत नाहीत. आणि तक्रार झाली तर मिटवामिटवी करायला लोकप्रतिनिधी आणि पुढारी यांचा हस्तक्षेप आहेच. त्यामुळे अशा फुकट दादागिरी करणाऱ्या टोळक्यांचे फावते आहे. जत शहराची इमेज शांत आणि सहनशील अशी आहे. आता त्याला तडे जात आहेत. अशा दादागिरी करणाऱ्या टोळक्यांवर वेळीच पायबंद घातला नाही तर शहराला फार मोठी किंमत चूकती करावी लागणार आहे. 

      जत शहरातील युवा पिढी भरकटत चालली आहे. अर्थात ही एकट्या जत शहराची समस्या नाही . राज्यातल्या,देशातल्या  विकासाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या सर्वच लहान-मोठ्या शहरांची ही समस्या आहे. अशा शहरात वाढत चालली युवा पिढी पोटापाण्याच्यादृष्टीने समाधानी असावी, असे दिसते. नाहीत तर लष्कराच्या भाकऱ्या भाजण्याचा उद्योग ही मंडळी करत बसली नसती. पोटाची आग विझवण्यासाठी भाकरी मिळवायला कुठे तरी कष्ट उपसायला गेली असती. खायला फुकटचे मिळत असल्याने असे उद्योग सुरू असावेत. एक तर  यांना स्वतः चे  आई-वडील फुकट पोसत असले पाहिजेत किंवा त्यांचे मायबाप म्हणवणारे आणखी कुणी पुढारी वगैरे मंडळी  त्यांना पोसत असावेत, अशी शंका आहे. मात्र ज्यांना स्वतः ची पोरे नीट पोसता येत नाहीत, ती या पोरांचे काय पालनपोषण करणार? आणि तिसरा पर्याय आहे तो भीक मागून खाण्याचा नाहीत तर हिरावून,ओरबाडून घेण्याचा!  मात्र हिरावून खाण्याच्या प्रकाराला चोरी नाही तर खंडणी म्हणतात. त्यामुळे आता ही पिढी कोणत्या प्रकारे जगत आहे, हे त्यांचे त्यांना माहीत. मात्र यापेक्षा दुसरे कुठले जगण्यासाठीचे स्त्रोत नाहीत,हे मात्र खरे! पण हे काही फार काळ टिकणारे  नाही. आजकाल माणसांचा जीव स्वस्त झाला आहे. लाखासाठी नाही तर हजारासाठी लोक जीव घ्यायला उठले आहेत. दारू,तंबाकू-गुटखा-मावा, चरस,गांजा यांच्या सेवनाच्या व्यसनाने शरीराचे मातेरे करून घेत आहेत. अशी शरीरे कॅन्सरसारख्या असाध्य रोगांनी खोखले होत आहेत. अशी शरीरे तीस-चाळीस वर्षांच्या आतच गळून पडत आहेत. किडे-मुंगे जसे पायाखाली चिरडून कसे मरत आहेत, तसे हे उद्याच्या भारताचे भविष्य असलेले युवक किड्यामुंग्यासारखे मरत आहेत. या युवकांना कोणते व्हिजन नाही, काही तरी आपल्यासाठी, लोकांसाठी, देशासाठी करावे अशी सामाजिक,देशभक्तीची बांधिलकी त्यांच्यात उरली नाही. चार दिवस आला,चैनी केला आणि गेला. कोण होता माहीत नाही, कशाला जन्माला आला होता माहीत नाही. मागे त्याचे काहीच अस्तित्व राहिले नाही. याला काही जिणे म्हणायचे का? त्यापेक्षा जन्माला आला नसता तर बरं झालं असतं. विनाकारण लोकसंख्येत भर. असेच लोक म्हणू मोकळे होतात.
       माणसाचा जन्म हा एकदाच मिळतो. तो असा फुकट घालवायला नाही तर काही तरी भव्यदिव्य करून दाखवायचा आहे. या जन्माला आल्यावर आपल्याबरोबरच आपल्या कुटुंबाचे,समाजाचे,देशाचे भले करायला आपल्याला जन्म मिळाला आहे, त्याचा सुयोग्य उपयोग माणसाने करायला हवा. ऑस्कर वाइल्ड म्हणतात,'जगायला मिळणं ही एक अत्यंत  दुर्मिळ गोष्ट आहे. जगायला मिळणं ही दुर्मिळ गोष्ट असतानादेखील माणसे श्वास घ्यायला मिळतो म्हणून  अस्तित्वात आहेत. ते खऱ्या अर्थाने जगतच नाहीत.
ऑस्कर वाइल्ड पुढे म्हणतात,'भरभरून जगा, इतरांसारखे नव्हे तर स्वतःला पाहिजे तसे जगा. काही तरी वेगळं करा.काही तरी विलक्षण, अद्वितीय करा.काही तरी असामान्य करा.उत्कट जगा,उत्स्फूर्त जगा,सळसळत्या उत्साहाने भरभरून जगा. प्रत्येक दिवस,प्रत्येक तास,प्रत्येक मिनिट,प्रत्येक सेकंद गृहीत धरू नका.तुम्हाला काय आवडतं,  काय महत्त्वाचं वाटतं, तुमची स्वप्नं काय आहेत ती पूर्ण करा. कसली वाट पाहाताय,जा त्यांच्या मागे जा.तुमच्याकडे एकच जीवन आहे,एकच संधी आहे,ही संधी एकेका दिवसाने दवडू नका. आणि जरी तुमची उद्दिष्ट,तुमची स्वप्नं पूर्ण करू शकला नाहीत तरी तुम्ही  अभिमानाने जगाल. आणि शेवटी कोणतीच खंत तुमच्या मनाला टोचणार नाही.तुम्ही कोणावर प्रेम करता,तुमच्यावर कोण प्रेम करतं, जा त्यांना सांगा, आजच सांगा.आता सांगा,परत परत सांगा ,हजार वेळा सांगा,तुमची प्रेम दाखवण्याची शेवटची संधी केव्हा असेल हे कोणालाही सांगता येत नाही.
     'आयुष्य नावाची ही जादुई गोष्ट क्षणभंगूर आहे,तिला गृहीत धरण्याची चूक करू नका.प्रत्येकजण दिशा हरवून बसल्यासारखा वागतो आहे. तुम्ही मात्र हरवून नका. प्रत्येकजण विचार करण्याची कुवत संपल्यासारखा वागतो आहे.तुम्ही मात्र डोकं ठिकाणावर ठेवा. प्रत्येकजण तुमच्यावर अविश्वास दाखवेल.दाखवू दे.तुम्ही मात्र स्वतः वरचा विश्वास  ढळू देऊ नका.प्रत्येकजण स्वतः च्या संसाराच्या रहाट गाडग्यात स्वतः च्या स्वप्नांना विसरत चालला आहे. तुम्ही मात्र स्वप्नांचा पाठपुरावा करायला विसरून नका.इतर लोक मेंढ्यासारखे इतरत्र पळताहेत,तुम्ही मात्र सिंहासारखे नजर रोखून उभे राहा.
       माणूस म्हणून जो जन्म मिळाला आहे, त्या जीवनाचे सार्थक होईल,असे जीवन जगायला हवे.  चांगली आणि मोठी स्वप्ने पाहायला शिकले पाहिजे. ते मिळवण्यासाठी मेहनत केली पाहिजे, जिद्द बाळगली पाहिजे. माणसे जन्माला येतात,मरतात पण काही लोकांनाच लोक ध्यानात ठेवतात. जे लोक काहीतरी भरीव ठेवून जातात. त्यांचे नाव मागे राहते. आजकालचा युवक सर्व काही झटपट पाहिजे,यासाठी धडपडतो आहे.पण झटपट काहीच मिळत नाही. त्यासाठी कष्ट उपसावे लागतात. फक्त पायातले बघून चालत नाही. दूरचे पाहावे लागते. समोर पाहिल्याशिवाय आपण कुठे आहोत,याचा अंदाज येत नाही. आपली वाटचाल कशी हवी,हे पाहण्यासाठी मधे-आधे वर पाहायला हवे. आज युवक,माणसे फक्त पायातले पाहात आहेत. फक्त पायातले पाहण्याची सवय लागलेल्या या युवकांना खरे तर समोरचे पाहण्याची सवय लागावी यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यांना नादाला लावणारे लोक या गोष्टी सांगणार नाहीत. त्यांना गुलाम हवे आहेत आणि त्यांना हा हातचा गुलाम घालवायचा नाही. त्यामुळे तरुणांनी पहिल्यांदा आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे. समाज सेवा देणारे लोक पुढे यायला हवेत. सरकारनेदेखील युवकांच्या कल्याणासाठी मेळावे घेतले पाहिजेत,त्यांना सुयोग्य मार्गदर्शन केले पाहिजे. आज नोकऱ्या नाहीत. बेरोजगार वाढत आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्या हाताला काम मिळवून देण्याची आवश्यकता आहे. वाहवत चाललेल्या युवकांना मार्गावर आणले पाहिजे. यासाठी सर्वच बाजूने प्रयत्न होण्याची गरज आहे.

No comments:

Post a Comment