काही तरी करणार्यांसाठी सर्व काही शक्य आहे,पण न
करणार्याला मात्र सर्व काही अशक्य आहे. ज्याच्या मनात जिद्द, विश्वास
असेल तर सर्व काही शक्य आहे. एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे,
ती म्हणजे या जगात असे कोणतेही कार्य नाही, जे
अशक्य आहे.फक्त आपण त्यासाठी तयार असले पाहिजे. मला जमत नाही, मला येत नाही, असे
म्हणत राहिल्यावर ती गोष्ट कशी येणार बरं! तिथेच जर ती गोष्ट
मला का येत नाही? मी का करू शकत नाही? असा
विचार करायला हवा.ती गोष्ट करण्यासाठी आपल्याजवळ कशाची उणीव आहे,
याचा शोध घेऊन ती आपल्याला का येत नाही, म्हणून
त्याच्या खनफटीलाच बसले पाहिजे. एकादी गोष्ट सहजासहजी मिळत नाही,
ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे.
यशस्वी माणसे कोणतेही काम अशक्य समजत
नाहीत. त्यांच्यासाठी सर्व कामे ही सहज आणि शक्य असतात.
कारण त्यांना यशाची चटक लागलेली असते. त्यातूनच
ते त्याकडे ओढले जातात. एक लक्षात ठेवा, एकाद्या कामाला अशक्य समजणारी व्यक्ती अतिशय दुर्बल असते. एखादे काम अशक्य असल्याचे त्याने जाहीर केल्यावर पुढे चालून त्याच्यासाठी सर्व
कामे अशक्य होतात. मग तो आयुष्यात काहीच करू शकत नाही.
जो प्रयत्न करतो,त्याला यश हे हमखास मिळत असते.
आपण ज्याचा विचार करतो आणि मन लावून ते करण्यासाठी प्रयत्न करतो,
तेव्हा ते कधीच अशक्य होत नाही.
हंगरीच्या लष्करात एक शुटर होता. त्याचं नाव होतं करौली. तो त्या
देशातला सर्वात उत्तम असा शूटर होता. संपूर्ण देशाची आशा त्याच्या
टिकून होती.येणार्या 1940 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत तो सुवर्ण पदक पटकवणार, याची
खात्री तमाम देशवासियांना होती. पण नंतर एक अशी घटना घडली की,
त्याचा पुढचा काळ अंधकारमय होऊन गेला. ज्या हाताने
शुटिंग करणार होता, त्याच हात बॉम्ब स्फोट झाला. हात पूर्णपणे निरोपयोगी झाला. डॉक्टरांनी सांगितले की,तो आता शुटिंग करू शकत नाही. करौली अजून आपल्या लक्ष्यापासून
दोन वर्षे दूर होता. त्याचा त्याच्यावर विश्वास होता की, तो नक्की जिंकणार! त्याच्या नशिबाने त्याचा पराभव करण्याचा निश्चय केला,पण तो हरला नाही.
त्या अपघातानंतर बरोबर एक महिन्याने
त्याने दुसर्या हाताने शुटिंगचा सराव करायला सुरुवात
केली. त्याला जगातला बेस्ट शुटर बनायचे होते आणि त्यासाठी आता
त्याच्याकडे फक्त डावा हात उरला होता. आणि प्रचंड जिद्द,मेहनत,झपाटलेपणा, सातत्य याच्या
जोरावर त्याने त्याच्या डाव्या हातालाच उत्कृष्ठ बेस्ट हँड बनवले. त्या दिवसांत हंगरीमध्ये एक शुटिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
तिथे देशातल्या इतर भागातले शुटरही उपस्थित होते. हाही तिथे गेला.त्यांना वाटले की, काही महिन्यांपूर्वी त्याच्याबाबतीत अपघात घडूनही तो सहभाग घेणार्यांना प्रोत्साहन द्यायला आला असेल, असे वाटले.
सगळ्यांनी त्याच्या हिंमतीला दाद दिली. पण तो तर त्यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी
गेला होता. त्याने त्याच्या डाव्या हाताने स्पर्धेत भाग घेतला
आणि स्पर्धाही जिंकली. उपस्थितीत सगळ्यांनीच आश्चर्याने तोंडात बोटे घातली.
त्याने दोन वर्षांत आपल्या डाव्या हाताला
अशा प्रकारे सक्षम बनवले की, येणार्या ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेता यावा असे. पण
1940 मध्ये होणारी ऑलिम्पिक स्पर्धा दुसर्या जागतिक
युद्धामुळे रद्द करण्यात आली. करौली खूप निराश झाला.परंतु, तो हिंमत हारला नाही. 1948 मध्ये झालेल्या स्पर्धेत त्याने आपल्या देशासाठी सुवर्णपदक मिळवून दिले.
पराभव झालेल्या माणसाकडे त्याची हजार
कारणे असतात,पण जिंकणार्याकडे फक्त एकच कारण असते आणि ते त्याला विजय मिळवून देतं. इच्छाशक्ती असली की, अशक्य काहीच नाही, हे लक्षात घ्यायला हवे.
No comments:
Post a Comment