Thursday, June 21, 2018

प्रयत्नांती परमेश्‍वर


     तुमचे प्रयत्न तुम्हाला यश मिळवून देते. त्यामुळे काहींना ईर्ष्या होणं साहजिक आहे. तुमच्या यशावर जळणारी असतात. तुम्हाला मागे खेचणारी पुष्कळ माणसे असतात. तुमच्या क्षमतेवर संशय घेणारी असतात. तसेच तुमचे टीकाकारही असतात. काहीजण विनाकारण तुम्हाला वाईटसाईट बोलतील. काहीजण तुम्हाला उकसावतील. तुमच्या आदर्शाला तडे जातील, अशा पद्धतीने तुमच्याकडून वर्तन येईल, अशा प्रकारची परिस्थिती तुमच्याभोवती तयार करून ठेवतील. पण आपले चित्त ढळू द्यायचे नाही. अंगावर कितीही चिखलफेक झाली तरी आपण गप्प बसायचे नाही. आपली धडपड आपण कायम ठेवायची. तुमच्यावर होणारी टीका, बदनामीचे षडयंत्र, अपमान यामुळे खचून जाऊन शांत बसायचे नाही. बास आता, म्हणून सर्व काही प्रयत्न सोडून द्यायचे नाहीत. आपले प्रयत्न तर आपण चालूच ठेवायचे.

     हे जगच दुसर्याचे पाय ओढणारे, खाली खेचणारे आहे. जी माणसे सकारात्मक विचार करणारी असतात, दुसर्याच्या यशाला आपला आदर्श मानणारी आणि त्याचे तोंडभरून स्तुती करणारी असतात, त्यांच्याकडून नक्कीच तुम्हाला अभिनंदनाची पावती मिळत राहते. महत्त्वाचे म्हणजे, प्रयत्न,कष्ट, जिद्ध यांच्या जोरावर मिळवलेले यश असे कुणाच्या टीकांनी किंवा नावे ठेवल्याने पुसून जात नाही. कितीही झाकून ठेवण्याचा प्रयत्न केला तरी कोंबडा काही आरवायचा थांबत नाही, ही गोष्ट आपल्याला माहित आहे. तसे पिव्वर सोन्याची चकाकी चमकल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आजूबाजूची काळजी करायची सोडून द्या आणि प्रयत्न करीत राहा. यश हमखास मिळत राहते, आपले ध्येय आपल्याला गाठता येते. त्यामुळे काहीही झाले तरी आपल्या ध्येयापासून विचलित होऊ नका.
     याबाबतीत एक गोष्ट सांगितली जाते. एके दिवशी एका शेतकर्याचा बैल विहिरीत पडला. तो बैल भितीने मोठमोठ्याने हंबरडा फोडू लागला. त्याच्या डोळ्यांत अश्रू दिसत होते. शेतकरीदेखील त्याचे काळीज चिरणारे हंबरडे ऐकून कासाविस झाला. त्यालाही काय करावे, सुचेना. बैलाला वर काढण्याचा उपाय काही दिसत नव्हता. शेवटी त्याने निर्णय घेतला. बैलाला जिवंत गाडायचा. कारण बैलदेखील म्हातारा झाला होता. त्याला वाचवून काही फायदाही होणार नव्हता. शेवटी त्याने विहिरीतच त्याच्यावर शेवटचे संस्कार करायचे, असा निर्णय घेऊन टाकला.
     शेतकर्याने आपल्या शेजार्या-पाजार्याने बोलावले. खोर्या-कुदळ घेऊन ती माणसे आली आणि त्यांनी विहिरीत माती टाकायला सुरुवात केली. बैलाला काहीच कळेना. त्याच्यावर अंगावर तर माती पडत होती. तो थोडा वेळ शांत राहिला. आणि अचानक त्याने आपले अंग जोरजोराने झाडले. त्याच्या अंगावरची माती त्याच्या पायाखाली गेली. तो थोडा वर आला. त्याच्यावर अंगावर माती पडतच होती. तो आणखी थोडा वेळ शांत राहिला आणि पुन्हा अंगावरची माती झाडून त्याने ती पायाखाली घेतली. तो आणखी थोडा वर आला. आता तो थोडा थोडा वर येत राहिला. असा प्रकार बराच वेळ चालला. शेतकरी आणि त्याचे शेजारी-पाजारी आपापले काम करत होते. खूप वेळ काम चालले होते. अचानक त्यांना बैलाचे शिंग आणि पाठ वर आलेली दिसली. सगळे आश्चर्यचकित झाले. त्यांनी विहिरीत डोकावले तर बैल त्यांनी टाकलेल्या मातीवर चढून वर आला होता. तसा शेतकर्याला आणि बाकी लोकांनाही आनंद झाला. त्यांनी आणखी माती टाकून बैलाला वर काढले.
     बैल आता आपले सारे संपले म्हणून गप्प बसला असता तर जिवंत राहिला नसता. तो मातीखाली गाडून मरून गेला असता. पण त्याने जगण्याची धडपड केली म्हणून तो वाचला. तशाच प्रकारे आपल्यावर कितीही चिखलफेक झाली तरी घाबरून, खचून जायचे नाही. आपला प्रयत्न सोडायचा नाही.  आपल्याला कल्पना आहे, कोणत्याही कामात , त्यातल्या अपयशाने आपल्याला निराशा ही येतेच. पण प्रयत्न नाही केला की, काहीही मिळत नाही. एखादी वस्तू मिळवण्यासाठी माणूस हात पुढे करून प्रयत्न करतो, तेव्हाच त्याला ती वस्तू मिळते.
त्यामुळे या प्रयत्नामुळे आणखी बर्याच गोष्टी साध्य होतात. या प्रयत्नामुळे बघा, स्पर्धादेखील जिवंत राहते. महत्त्वाचे म्हणजे, तुम्ही प्रयत्न केला तरच तुम्हाला तुम्ही काय करू शकता, हे कळू शकते. आणि प्रयत्न करणारी व्यक्ती नेहमी आशावादी असते. एक लक्षात ठेवा, ठाम विश्वासाने केलेले प्रयत्न पराभवाचेही विजयात रुपांतर करतात.

No comments:

Post a Comment