Wednesday, June 13, 2018

(बालकथा) अहंकारी जिराफ


     एके दिवशी जंगलात सकाळी सकाळी बंटी उंदीर, गोलू हत्ती आणि बल्लू माकड एकत्र खेळत होते. तेवढ्यात तिथे जितू जिराफ आला आणि त्या सगळ्यांना पाहून हसू लागला. जितू जिराफला आपल्या सौंदर्याचा आणि लांब मानेचा मोठा अहंकार होता. त्याच्या या अहंकारामुळे जंगलातला कोणताच प्राणी त्याच्याशी नीट बोलत नव्हता. पण तरीही दुसर्याला नावे ठेवत, त्यांची टिंगलटवाळी करत,टर उडवत जंगलभर फिरायचा. जितूनं बंटी उंदराला पाहून म्हटलं, “काय छोटूराव, कसला रे तू काळमिट्या? आणि तुझी मान कुठे रे गेली? माझी मान बघ! किती लांब आहे?”

     मग त्याने आपला मोर्चा बल्लू माकडाकडे वळवला.त्याची शेपटी लक्षपूर्वक पाहात म्हणाला, “याची शेपटी तर पहा.हॅ..हॅ..हॅ. किती रे लांब? आणि त्याचा उपयोग तर काय रे तुला? याचं तोंड तर बघा, किती विचित्र! पाहिल्यावरच हसायला येतं. हॅ..हॅ..हॅ!”
     आता पाळी आली गोलू हत्तीची! जितू लागला त्यालाही चिडवायला, “गोळ्या मोठ्या, तुझी सोंड बघ,कशी लोंबकळतेय. आण्इ हे तुझे मोठे मोठे दात, त्याचा रे तुला काय उपयोग? इतकं मोठं बोजड शरीर घेऊन चालतोयस तरी कसा?”
     जितूचं बोलणं ऐकून सगळ्यांनाच संताप आला होता,पण गोलू हत्तीने इशारा करून बंटी आणि बल्लूला शांत राहण्याचा सल्ला दिला.तेवढ्यात समोर धुळीचा लोट उठलेला दिसला. पाठोपाठ डरकाळ्या ऐकायला आल्या. सिंहांची एक झुंड त्यांच्याच दिशेने येत होती. बंटी उंदराने झटक्यात आपले बीळ जवळ केले. बल्लू माकड पटकन झाडाच्या शेंड्यावर जाऊन पोहचले. सिंहांची झुंड जितूच्या दिशेनेच येत होती. जितू घाबरून वाट मिळेल तिकडे पळाला.पण काही अंतर गेल्यावर एका झाडाच्या फांदीला धडकून धाडकन खाली कोसळला. हे पाहून गोलू हत्तीला त्याची दया आली. तो धावतच जितूजवळ गेला आणि मोठमोठ्याने चित्कारू लागला. आपल्या ताकदीने त्याने सिंहांच्या झुंडीला परतवून लावले.
     जितू दुखत असल्याने कण्हत होता. गोलू हत्तीने त्याच्या सोंडेने त्याला कुरवाळले. मग बंटी उंदीर आला. त्याने त्याच्या तीक्ष्ण दातांनी कुरतडून औषधी झाडपाडा आणला होता. बल्लू माकडाने त्याच्या जखमेवर औषध लावले.
जितू तिघांची क्षमा मागत म्हणाला, “मला ज्या लांब मानेचा गर्व होता, त्यानेच मला दगा दिला.तुमच्या तिघांमुळे मी जिवंत आहे. मी तुमचे आभार कसे मानू, हेच मला कळेनासे झाले आहे.”
     गोलू हत्ती म्हणाला, “तुला आमचे खरोखरच आभार मानायचे असतील तर आम्हाला एक वचन द्यावं लागेल. आजपासून कुणाचीही टर उडवायची नाही. आणि सर्वांना मदत करायची.”
    जितू म्हणाला, “मी वचन देतो, आजपासून मी कुणाचीच टर उडवणार नाही आणि सर्वांना मदत करीन.”
सर्वांना आनंद झाला आणि चौघे एकत्र खेळू लागले.

No comments:

Post a Comment