Friday, May 25, 2018

सुप्रसिद्ध उद्योजक अशोक खाडे


     मी उद्योजक अशोक खाडे. मी मूळचा सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातल्या पेडचा. मी आज दास ऑफशोअर या यशस्वी अशा पाचशे कोटी उलाढाल असलेल्या कंपनीचा मालक आहे. आज माझ्या कंपनीत सुमारे तीन हजार कर्मचारी काम करतात. सव्वीस वर्षांपूर्वी दरमहा पंधरा हजार रुपये पगाराची नोकरी सोडून माझा स्वत:चा उद्योग सुरू केला. पण हे एवढे मोठे वैभव आज उभे राहिले असले तरी त्यावेळी माझ्या अंगी असलेल्या आत्मविश्वास,जिद्द आणि मेहनतीमुळे घडले आहे. त्यामुळे जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर या गोष्टी आपल्या अंगी असणे आवश्यक आहे.

     मी लहान असतानाची आमची घरची आर्थिक परिस्थिती फारच बेताची होती. वडील चांभार काम करायचे. आई शेतात राबायची. यामुळे मीदेखील शेतीची कामे शिकलो. शेतातील भांगलणीसारखी कामे, ऊसतोडणी ही कामे केली आहेत. पुढे तासगावच्या बोर्डिंगमध्ये राहून मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. नंतर आत्यांकडे मुंबईला गेलो. तिथे दहा बाय दहाच्या खोलीत राहून इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. पुढे माझगाव डॉकला 1975 मध्ये इंजिनिअर म्हणून नोकरीला प्रारंभ केला. मात्र नोकरीत मन रमेना. शेवटी 1992 मध्ये दरमहा पंधरा हजार रुपये मिळणारी नोकरी सोडून दिली आणि स्वत:ची दास ऑफशोअर कंपनी स्थापन केली. आम्ही तिघे भावंडं आहोत प्रत्येकाच्या नावाच्या इंग्रजी आद्याक्षरांवरून (दत्तात्रय, अशोक आणि सुरेश) दास हे नाव कंपनीला दिले. यातील सुरेश खाडे हे मिरज विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. या कंपनीचा विस्तार होत गेला असून आज इंजिनिअरिंग, डेअरी, ॅग्रो प्रॉडक्ट, रस्ते बांधणी, समुद्रातील कामे, उड्डाण पूल, बांधकाम अशा सात कंपन्यांचा समूह बनला आहे.
     स्वीडनच्या शालेय अभ्यासक्रमात माझ्याविषयीच्या धड्याचा अंतर्भाव करण्यात आला आहे. खरे तर युवकांना आणि खास करून लहान मुलांना माझे सांगणे आहे की, खूप मेहनत करा. जिद्द ठेवा, आयुष्यात यश हमखास मिळते. आपल्याला आवडणारे क्षेत्र निवडा. त्यामुळे मन लावून काम करता येईल आणि त्यात चांगली प्रगती साधता येईल. आज सरकारी नोकर्या कमी आहेत. त्यामुळे नोकरीच्या मागे न धावता उद्योजक व्हा. मात्र यासाठी कौशल्य आत्मसात करायला हवे.
     कोणावरही विसंबून राहून उद्योग करता येत नाही. ज्या विषयाचे ज्ञान आहे, तेच क्षेत्र निवडा म्हणजे फसवणूक होणार नाही. उद्योग सुरू करण्यापूर्वी त्याचा सांगोपांग अभ्यास करा. आपले प्रश्न घेऊन यशस्वी झालेल्या आणि उद्योगात अयशस्वी झालेल्या लोकांकडे जा. चर्चा करा. त्यांच्या यशापयाशाचे मर्म जाणून घ्या. शंकांचे निरसन करून घ्यायला लाजू नका आणि घाबरूही नका आणि मगच उद्योगाचा नारळ फोडा.
     उद्योजक म्हणून श्रीगणेशा केल्यावर मला पहिले काम माझगाव डॉकमध्येच मिळाले. ते काम 1 कोटी 92 लाखांचे होते. यासाठी पैसे उभे करणे कठीण होते,पण माझा आणि माझ्या भावांचा समुद्रातील कामांचा प्रदीर्घ अनुभव कामाला आला. आमचा कामातील प्रामाणिकपणा पाहून बँकांनी आम्हाला अर्थसहाय्य केले. मग काय? आम्ही मागे वळून पाहिलेच नाही. ब्रिटिश गॅस, ओएनजीसी या कंपन्यांचे समुद्रातील प्रकल्पांची कामे केली. अबुधाबीचे राजे शेख महंमद बिन खलिफा यांच्याबरोबर आमची भागिदारी आहे. उद्योग जगतात आमचे आदर्श जमशेदजी टाटा आहेत. त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे.
     आपला मराठी माणूस उद्योग करायला कचरतो. नोकरी करणे, आठवड्याच्या सुट्ट्या खाणे आणि आहे त्यात समाधान मानणे असे मर्यादित आयुष्य मराठी माणूस जगतो. भरारी मारण्यासाठीचे पंख आपणच छाटून घेतलेले असतात. पण आयुष्यात मोठे व्हायचे असेल तर कष्ट करण्याची जबरदस्त तयारी असायला हवी आहे. सणवार,लग्न सोहळे,दिवाळी, श्रावण अशा कामांसाठी आपण हकनाक सुट्ट्या खर्च करीत असतो. बस किंवा रेल्वेतला प्रवास आपण झोपून किंवा गप्पा मारण्यात घालवतो. राजकारण,क्रिकेट, दुसर्यांविषयी कुचेष्टा करण्यात वेळ घालवत असतो. म्हणजे जवळपास आपण साठ ते सत्तर टक्के वेळ वाया घालवतो. हाच वेळ सत्कारणी लावला तर आपलाच फायदा होतो.
     कोणताही व्यवसाय,उद्योग करायचा असेल तर संयम, मेहनत, प्रामाणिकपणा, कौशल्य, नम्रता आणि नेतृत्व क्षमता महत्त्वाची आहे. यश मिळवायचे असेल तर घेतलेल्या कामावर तुटून पडायला हवे. आज नवनव्या संधी आहेत. त्या हेरता आल्या पाहिजेत. आज अनेक वडिलोपार्जित व्यवसाय मागे पडत आहेत,पण त्यांना नव्या तंत्रज्ञानाची, कौशल्याची जोड दिल्यास असे व्यवसाय पुन्हा उभारी घेऊ शकतात. मॉल उभा करायला फार अक्कल लागत नाही,पण स्कील बिझनेस महत्त्वाचे आहे. उद्योगात यश मिळवण्यासाठी आणि मालाच्या पुरवठ्यासाठी सतत अभ्यास महत्त्वाचा आहे. ग्राहक वाचता आला पाहिजे. स्ट्रेन्थ, वीकनेस, अपॉर्च्युनिटी आणि थ्रेटस या चार मुद्द्यांवर व्यवसाय,उद्योग आधारलेले आहेत. त्याचे विश्लेषण महत्त्वाचे आहे. आपली बलस्थाने आणि कमजोरी आपल्याला ओळखता आली पाहिजेत. बाजारपेठांतील संधी आणि व्यवसायातील अडथळे यांचे सतत मूल्यमापन केले पाहिजे. अर्थात उद्योगधंद्यात सतर्कताही महत्त्वाची आहे.

No comments:

Post a Comment