लक्ष्मीकुट्टी या सामाजिक कार्यकर्त्या
म्हणून ओळखल्या जातात. आदिवासी भागातल्या महिलांचे
सुखरूप बाळंतपण करण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यांनी विविध आजारांवर
500 पेक्षा अधिक वनौषधे शोधून काढली आहेत. त्या
कविता लिहितात. केरळ सरकारने त्यांना नट्टू वैद्यरत्न पुरस्कार
देऊन गौरव केला आहे, तर याचवर्षी केंद्र सरकारने त्यांचा पद्मश्री
पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. मात्र त्यांचा भूतकाळ खडतर आणि
काटेरी आहे. आज त्यांनी पंच्याहत्तरी पार केली असली तरी त्या
आपल्या कामात व्यस्त आहेत. नव्या वनौषधांचे संशोधन तर सुरू आहेच
पण बाहेर नैसर्गिक चिकित्सेवर भाषण द्यायलाही जातात. उतरत्या
वयातही त्या सर्वात व्यस्त महिला म्हणून ओळखल्या जातात.
आपल्या देशाच्या स्वातंत्र्यानंतरचा
तो काळ होता. आदिवासी भागातल्या मुलींना शाळेत
पाठवण्याची प्रथा नव्हती. पण केरळची राजधानी तिरुवनंतपुरमच्या
कल्लार जंगलात राहणारी चिमुरडी लक्ष्मीकुट्टी या पोरीनं हट्ट धरला, मला शाळेला जायचंय! वडील काळजीत पडले. आजपर्यंत या भागातली एकही पोर शाळेला गेली नव्हती. मग
एकटी मुलगी 10 किलोमीटर दूर कशी बरं जाईल? त्यांना काहीच कळत नव्हतं.
शेवटी मुलीच्या हट्टापुढे वडिलांनी हार
मानली. ही घटना 1950 ची आहे. लक्ष्मीकुट्टी शाळेला जाऊ लागली. केरळच्या शाळेत जाणारी
ती आदिवासी जनजातीमधली पहिली मुलगी होती. गावातील फक्त तीन मुलं
शाळेत जात होती. त्यात ती स्वत: आणि आणखी
दोन मुले. लक्ष्मीकुट्टी हिचे वडील स्वत: तिचे नाव शाळेत दाखल करायला गेले होते. आज सामाजिक कार्यकर्त्या
अशी ओळख असलेल्या लक्ष्मीकुट्टी यांचा
मागे वळून पाहिल्यावर, आपण हे करू शकलो यावरच विश्वास बसत नाही. ती शाळेत नेहमीच अव्वल राहिली.
पण ती फक्त आठवीपर्यंतच शिकू शकली, कारण यापुढचे
शिक्षण घेण्यासाठी परिसरात दूर दूरपर्यंत शाळाच नव्हत्या. शिक्षणाव्यतिरिक्त
त्यांनी घरातच वन- औषधींचे ज्ञान प्राप्त केले.
तिची आई गावात दाईचे काम करत असे. ती शिकली नसली तरी तिची प्रसुती दरम्यानची माहिती थक्क
करणारी होती.आजूबाजूच्या भागातील शेकडो गर्भवती महिलांच्या तिची
यशस्वीरित्या प्रसुती केल्या होत्या. ती त्या भागातील सर्वात
आवडती दाई होती. औषधी वनस्पतींपासून औषधे बनवण्यात आणि रुग्णांची
देखभाल करण्यात ती आईला मदत करायची. हळूहळू मग तिलाही अनेक औषधांचे
ज्ञान येऊ लागले. नंतर तिने आपल्या स्वत:च्या संशोधनानुसार वनौषधी वनस्पतींपासून काही नवीन औषधे बनवली. आईने याकामी तिला खूप मदत केली.
सोळाव्या वर्षी तिचं लग्न झालं. तिचा नवरा नात्याने तिचा चुलत भाऊ लागत होता.
त्यांच्या समाजात अशा प्रकारच्या नात्यातल्या लग्नाची प्रथाच होती.
ती त्याला लग्नाअगोदरपासूनच ओळखत होती. तो तिचा
चांगला मित्र होता. त्याने तिच्या प्रत्येक निर्णयाला साथसोबत
केली. तिच्या पतीच्या म्हणण्यानुसार ती एक धाडसी आणि खंबीर मुलगी
होती. लक्ष्मीकुट्टी स्वत: आठवीच्या पुढे
शिकू शकली नाही,पण तिने आपल्या मुलांना चांगल्या शाळेत शिकवले.
मुलांनीदेखील आईच्या इच्छेनुसार अगदी मन लावून शिक्षण घेतले.
पण ते जास्त काळ आपल्या आईसोबत राहू शकले नाहीत. मोठा मुलगा हत्तीच्या पायात सापडून ठार झाला. हा प्रसंग
त्यांच्या आयुष्यातला सर्वात वाईट आणि कठीण होता. यातून त्या
कशा तरी सावरतात, तोच एका अपघातात त्यांचा धाकटा मुलगादेखील गेला.
या घटनेमुळे त्या अगदी कोलमडून पडल्या. मुलं गेल्यानं
त्या उदास राहू लागल्या. त्यांना जीवन नकोसं वाटू लागलं.
पण त्यांच्या पतीने त्यांना धीर दिला. या काळात
त्यांनी लक्ष्मीकुट्टी यांना कविता लिहायला प्रेरित केले. त्या
कविता लिहू लागल्या. त्यांच्या कवितेत आदिवासी संस्कृती आणि जंगलप्रेमाची
झलक पाहायला मिळते.
त्यांनी पुन्हा औषधे बनवायला सुरुवात
केली. आईकडून शिकलेले ज्ञान त्यांच्या खूपच कामाला आले.
साप चावल्यावर आणि जंगली कीटक चावल्यावर त्यांचे विष उतरवण्यासाठी त्यांनी
नामी उपाय शोधून काढले. दूर दूरवरून लोक त्यांच्याकडे विष उतरवण्यासाठी
येऊ लागले. परिचारिकेचा कधी कोर्सही केला नसताना, त्या उपचारादरम्यान आपल्या रुग्णांसोबत एकाद्या प्रशिक्षित परिचारिकासारख्या
वागत. त्यांनी आपल्या अंगी एक शिस्त आणली होती. हे गुणदेखील त्यांच्या आईकडूनच घेतले होते. लोक त्यांना
प्रेमाने वनमुतशी म्हणून बोलवतात. मल्याळममध्ये त्याचा अर्थ होतो-
जंगलची थोरली आई.
संपूर्ण केरळ प्रांतात त्यांची चर्चा
होऊ लागली. अनेक संस्थांनी त्यांच्या औषधांना
अनेक कसोटीवर पडताळून पाहिले. त्यात त्या उत्तीर्ण झाल्या.
त्यांनी त्यांच्या आठवणीनुसार जवळपास 500 औषधे
बनवली आहेत. त्यांची इच्छा आहे की, आपले
ज्ञान आता लिखित स्वरुपात यायला हवे. माझ्या मृत्यूनंतर ते माझ्याबरोबर
नष्ट व्हायला नको. 1995 मध्ये राज्य सरकारने त्यांचा नट्टू वैद्यरत्न
हा पुरस्कार देऊन गौरव केला. पुरस्कार मिळाल्यावर त्या राज्याच्या
बाहेरही प्रसिद्ध झाल्या. त्या एके ठिकाणी म्हणतात की,
सुरुवातीला माझ्याकडे रुग्ण यायचे, पण आता लोक
मला भेटायला यायला लागलेत. ते मला वनौषधांबाबत विचारतात.
मला खूप चांगलं वाटतं, कारण लोक नैसर्गिक उपचाराबाबत
जागरूक होऊ लागले आहेत.
केरळ बाहेर त्यांना अनेक संस्थांनी नैसर्गिक
चिकित्सेवर भाषण देण्यासाठी बोलवत आहेत. सुरुवातीला
त्या गर्दीपुढे बोलायला कचरायच्या,पण नंतर त्याची त्यांना सवय
झाली. आता बिनधास्त आपले उपचार आणि आपल्या औषधांवर बोलताना दिसतात.
खरे तर त्यांचे संपूर्ण जीवनच जंगलात गेलं आहे. त्यामुळे इथले प्रत्येक झाड-रोप त्यांच्या परिचयाचे आहे.
बाहेरचे लोक त्यांचे वनौषधी ज्ञान पाहून चकित होतात. सध्या केरळ वन विभाग त्यांच्या औषधी ज्ञानाचे पुस्तक रुपात संकलन करत आहे.
2016 मध्ये त्यांना भारतीय जैव विविधता काँग्रेसने सन्मानित केले आहे.
काही दिवसांपूर्वी मन की बात या रेडिओ कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी त्यांचे कौतुक केले आहे. तर या वर्षाच्या प्रारंभीच
त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment