Tuesday, May 15, 2012

चित्त्याची शिकार होणार नाही याची काय खात्री!

चित्ता हा सर्वात चपळ प्राणी; पण या प्राण्याचा हिंदुस्थानातून कधीचाच नायनाट झाला आहे. चित्त्याची ओळख फक्त चित्रातूनच केली जात असताना हिंदुस्थान सरकार चित्त्याचे संवर्धन आपल्या जंगलांमध्ये करणार असल्याची बातमी आली आहे. आफ्रिकेतील नामिबिया या देशातून १२ चित्ते हिंदुस्थानात आणले जाणार असून त्यांना मध्य प्रदेशातल्या कुनो पालपूर अभयारण्यात सोडले जाणार आहे. जून महिन्यात या चित्त्यांचे आगमन हिंदुस्थानात होत असून सध्या कुनो पालपूर अभयारण्यात त्यांच्या भोजनासाठीची आवश्यक ती व्यवस्था केली जात आहे. नामिबिया एकूण ५० चित्ते हिंदुस्थानास देण्यास तयार झाला आहे. त्यांना मध्य प्रदेशाबरोबरच राजस्थानमधील जैसलमेर आणि गुजरातमधील जंगलांमध्ये जोपासले जाणार आहे.
यापूर्वी सत्तरच्या दशकात इंदिरा गांधी पंतप्रधान असताना इराणमधून चित्ते आणण्याची योजना आखण्यात आली होती; परंतु आणीबाणी आणून हुकूमशाहीचा अवतार धारण करू पाहणार्‍या इंदिरा गांधींना यासंबंधातल्या अडचणी सॉल्व्ह करण्यासाठी फुरसतच मिळाली नाही. त्यामुळे ही योजना बारगळली. सध्याच्या घडीला इराणमध्येसुद्धा केवळ ५० चित्तेच उरले आहेत. सध्या फक्त आफ्रिकेच्या व इराणमधल्या जंगलांतच चित्ता आढळून येतो. नामिबिया सरकार चित्त्याच्या शिकारीमुळे त्रस्त आहे. तिथे मोठ्या प्रमाणावर आणि तितक्याच वेगाने जंगलांवर अतिक्रमण होत आहे. तेथील गवताळ मैदाने नष्ट होत चालली आहेत. त्यामुळे तिथले सरकार ५० चित्ते हिंदुस्थानला देण्यास तयार झाले.
हिंदुस्थानात एकेकाळी हजारोंच्या संख्येने चित्त्याचे वास्तव होते. मोगल बादशहा अकबरच्या काळात शिकारपट्ट्यात पाच हजारांच्या आसपास चित्ते असायचे. छत्तीसगड ते कर्नाटक आणि तामीळनाडू ते पुढे केरळपर्यंतच्या विशाल जंगली पट्ट्यात चित्त्यांचे साम्राज्य होते. असे म्हटले जाते की, सरगुजाचा राजा रामानुज शरणसिंह या एकट्याने १ हजार ३६८ वाघांची शिकार केली होती आणि १९६८ मध्ये देशातल्या शेवटच्या चित्त्याची शिकारसुद्धा त्यांनीच केली होती. चित्त्याच्या हिंदुस्थानात होणार्‍या आगमनाने चित्त्याची जात नष्ट केल्याचा कलंक पुसला जाणार आहे. गेल्या ४० वर्षांत देशातल्या बालगोपाळांना चित्ता चित्रात दाखवला जात होता. आता तो प्रत्यक्षात पाहायला मिळणार आहे. चित्त्याच्या आगमनामुळे हौशी लोकांच्या पर्यटनात वाढ होण्याची शक्यता असली तरी चित्त्याच्या शिकारीचीही साशंकता टाळता येण्याजोगी नाही. चित्ता तर आपण नष्ट केलाच, पण आपला राष्ट्रीय पक्षी असलेला वाघही आता धोक्यात सापडला आहे. कधीकाळी ४० हजारांहून अधिक वाघ हिंदुस्थानातल्या जंगलांमध्ये होते, पण २०१० च्या सर्वेक्षणानुसार एक हजार ७०६ च वाघ शिल्लक उरले आहेत. गेल्या पाच वर्षांत आजार, वय, शिकार व अन्य नैसर्गिक आपत्तींमुळे ३७० वाघ नष्ट झाले. यात ६८ वाघ शिकारीला बळी पडले आहेत. वाघाच्या संरक्षणासाठी व संवर्धनासाठी १७ राज्यांवर १४५ कोटी रुपये केंद्राने खर्च केले आहेत. तरीही वाघांची शिकार होतच आहे. असे असताना चित्ता कसा सुरक्षित राहील हा प्रश्‍नच आहे.
चित्त्याला हिंदुस्थानात आणण्यालाही काही संघटनांनी विरोध दर्शविला आहे. मानवी आक्रमणामुळे जंगले नष्ट होत चालली असताना व हिंस्र श्‍वापदे मानववस्तीत घुसून धुमाकूळ घालत असल्याच्या घटना घडत असताना चित्ते हिंदुस्थानात आणून काय साधले जाणार आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. यामुळे मोठे बिकट प्रश्‍न निर्माण होतील व गावेच्या गावे उठवावी लागतील, असे त्यांचे म्हणणे आहे. अर्थात चित्त्यासारख्या प्राण्याचे संवर्धन हिंदुस्थानात होणार असेल तर त्याचे स्वागतच करायला हवे, पण वाघाप्रमाणे त्याचीही शिकार होणार नाही याची काय खात्री! त्यामुळे शेवटी मूळ हेतूलाच धक्का बसणार आहे.
- मच्छिंद्र ऐनापुरेsaamana, 15/5/2012

No comments:

Post a Comment