Monday, May 28, 2012

कृत्रिम शीतपेये आरोग्यास घातक

उन्हाळय़ात घराबाहेर पडल्यावर शरीराची लाहीलाही होत असताना तहान भागविण्यासाठी आकर्षक बाटल्यांमधील शीतपेयांचे सेवन केले जाते. यामुळे तात्पुरते मनाला समाधान मिळते, मात्र नकळतपणे शरीरावर त्यांचा प्रतिकूल परिणाम होतो. जगभरातील संशोधकांनी यावर संशोधन केले असून शीतपेयांच्या अतिसेवनामुळे आजारी पडणार्‍या लहान मुलांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे यात समोर आले आहे. त्यामुळे जर कोणी सातत्याने कार्बनयुक्त शीतपेयांचे सेवन करत असेल तर त्याला वेळीच या धोक्यांची कल्पना द्यायला हवी.

    
फेसाळणारी कार्बनयुक्त कोलासारखी शीतपेये आरोग्यास हानीकारक आहेत असा दावा पाँडिचेरी विश्वविद्यालयाच्या संशोधकांनी केला आहे. दिल्लीस्थित विज्ञान आणि पर्यावरण केंद्राने केलेल्या चाचणीमध्ये लोकप्रिय कोला कंपन्यांच्या शीतपेयांमध्ये जास्त प्रमाणात हानीकारक घटक आढळून आले आहेत. या घटकांमुळे मनुष्याच्या शरीरावर एखाद्या स्लो पॉयझनसारखा परिणाम होतो असे स्पष्ट झाले आहे. या शीतपेयांचा सर्वाधिक धोका बालकांना होत असून जगभरातील प्रदीर्घ संशोधनानंतर कृत्रिम स्वाद, रसायने, रंग असणार्‍या पेयांपासून लहान मुलांना दूर ठेवावे असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. संशोधनानुसार या पेयांच्या वारंवार सेवनाने मुलांची एकाग्रता कमी होते, शिवाय शरीरावरदेखील दुष्परिणाम होतो. जवळपास सर्वच कृत्रिम शीतपेयांत एथलिक                    
       ग्यायकॉल, सॅकरीन, कॅफीन आणि फॉस्फोरिक अँसिड मिसळलेले असते. यामुळे ज्या वयात मुलांच्या शरीराची वाढ होत असते त्याच काळात त्यांची भूक मंदावते. त्यांना अशक्तपणा येऊ शकतो. त्यांच्या लिव्हर व किडनीवरदेखील परिणाम होण्याचा धोका असतो. अनेकदा ही शीतपेये बराच काळ सतत फ्रीजमध्ये ठेवण्यात आल्यामुळे दूषित होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे मोठय़ांनी शीतपेये टाळायलाच हवीतच, पण मुलानांही यापासून दूर ठेवायला हवे. त्यापेक्षा ताज्या फळांचा रस, ताक, लस्सी, नारळपाणी यासारखी शीतपेये द्यावीत. ही शीतपेये शरीराकरिता उत्तम असतात. यातून पोषक घटक तर मिळतातच, सोबत उन्हाळय़ातील त्रासांपासूनदेखील बचाव होतो. या पेयांमुळे उत्साहदेखील टिकून राहतो. त्याचप्रमाणे यात धोक्याचे प्रमाणदेखील कमी असते.

punya_nagari 28/5/2012 ( loikjagar)

No comments:

Post a Comment