Sunday, May 27, 2012

सार्वजनिक जीवन तंबाखूच्या धुराच्या विळख्यात!

     आपल्या देशात आज अप्रत्यक्ष धुम्रपानामुळे सार्वजनिक आरोग्यच धोक्यात आले आहे. अनेक वैद्यकीय अहवालांनी गेल्या दोन दशकातील विविध अभ्यासाद्वारे काढलेल्या निष्कर्षात यावर शिक्कामोर्तब केले आहे. अप्रत्यक्ष धुम्रपानामुळे फुफ्फुसाचा कर्करोग असेच हृद्यरोग जडलेल्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तंबाखूच्या धुरामुळे श्वसनाचे विकार , अस्थमा आदी रोगांनाही आयते आमंत्रण मिळत असून विशेषतः अल्पवयीन मुले या रोगांची शिकार होत आहेत. आरोग्याला अपायकारक ठरणार्‍या तंबाखूच्या धुरामुळे सर्दी, पडसे, डोकेदुखी, डोळे चुरचुरणे, घसा खवखवणे अशा नेहमीच्या समस्याही निर्माण होत आहेत.
     सिगरेट, बिडी आदी पेटवल्याने होणारा धूर सेवन करणार्‍याच्या शरीरात तर जात असतोच, पण त्याचबरोबर त्या व्यक्तीच्या सभोवताली असलेल्या व्यक्तींच्या शरीरातही श्वसनावाटे हा धूर प्रवेश करत असतो. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावरही तंबाखू सेवन न करताही हा धूर अपाय करतो. धुम्रपान करणार्‍यांच्या आरोग्याला होणार्‍या अपायाइतकाच किंबहुना अधिक अप्रत्यक्ष धुम्रपानामुळे धोका सम्भवतो. हृदयविकार, फुफ्फुसे यांना होणारी हानी ही धुम्रपान करणार्‍याच्या जीवाला होते, तितकीच असते. या धुरातील आरोग्याला हानीकारक ठरणार्‍या रसायनांमुळे न्युमोनिया, अस्थमा, कानाचा संसर्ग आदी समस्यांचे प्रमाणही वाढू लागल्याचे निष्कर्ष निघत आहेत. लहान मुलांना तर या धुरामुळे बहिरेपणा संभवतो. तसेच या धुरामुळे गर्भवती स्र्तियांच्या गर्भाची वाढ खुंटते. त्याचबरोबर श्वसनाचेही विकार जडतात.
     अप्रत्यक्ष धुम्रपानामुळे आपल्याकडे सार्वजनिक आरोग्याची समस्या अतिशय गंभीर बनली आहे. सार्वजनिक वाहतुकीची ठिकाणे, हॉटेल्स, कार्यालये यामध्ये अप्रत्यक्ष धुम्रपानाचे प्रमाण सर्वाधिक आहे. एका पाहणीअंती युरोपीय देशांमध्ये अप्रत्यक्ष धुम्रपानाचा सम्बंध हा वयाच्या १५ वर्षांनंतर येतो. अमेरिकेत धुम्रपान न करणार्‍यांपैकी ८८ टक्के लोक अप्रत्यक्ष धुम्रपानाला बळी पडतात., असाही एक अहवाल सांगतो. भारतात तर हे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत किती तरी पटीने अधिक असल्याची भीती वैद्यकशास्त्रात व्यक्त केली जात आहे.
     सार्वजनिक ठिकाणी धुम्रपानास मनाई करण्यासाठी सरकारने कठोर कायदे केले आहेत. मात्र त्याच्या अंमलबजावणीबाबत ठार निष्क्रियता दिसून येत आहे. अंमलबजावणी काटेकोर व कठोर होण्याची आवश्यकता आहे. शिवाय लोकशिक्षणावर अधिक भर देण्याची गरज आहे. स्वयंसेवी संस्था, निर्व्यसनी नागरिक यांनी आपले कर्तव्य समजून हा धुराचा विळखा कमी करण्याचा प्रयत्न करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. शाळा- कॉलेजमध्ये जागृती करणारी व्याख्याने, पोस्टर्स लावले जावेत. धुम्रपान करणार्‍या पालकाला त्यापासून परावृत्त करण्यासाठी सगळ्यांनीच पुढे आले पाहिजे.

No comments:

Post a Comment