Tuesday, May 29, 2012

बालकथा सर्वोच्च खोटे

                                                                      गोष्ट तशी जुनीच आहे. चंदनपूरच्या राजाला एकदा लहर आली. त्याने एक घोषणा केली, जो कोणी सर्वोच्च खोटे बोलेल, त्याला सोन्याचा सफरचंद समारंभपूरवक बहाल करण्यात येईल. राजाची घोषणा ऐकून दूर-दूरचे लोक आले. खोटारडेपणाचा कळस गाठणार्‍या घटना त्यांनी कथन केल्या, पण तरीही त्या राजावर प्रभाव टाकू शकल्या नाहीत. असेच काही दिवस गेले. सर्वोच्च खोटे बोलणारा अद्याप सापडला नाही. एक दिवस अत्यंत गरीब, हडकुळा इसम हातात मडके येऊन दरबारात दाखल झाला. तो राजाला म्हणाला," महाराज, आपल्या ईश्वर सुख आणि शांती देवो. आरोग्य आणि संपन्नता देवो. पण मला क्षमा करा, कारण मी माझे पैसे न्यायला आलो आहे. आपण माझे कर्जदार आहात. हुजूर, आपण मला माझे  सोन्याने भरलेले मडके परत द्यावे. सध्या मी खूपच आर्थिक हालाकीत आहे."
      हे ऐकून राजाला मोठा संताप आला. या सटर-फटर माणसाचा मी कसा बरं कर्जदार असणार? राजा म्हणाला," तू खोटे बोलतो आहेस. मी तुझ्याकडून कुठले कर्ज-बिर्ज घेतलेले नाही." तो इसम म्हणाला," महाराज, मी खरेच बोलतो आहे. पण मग तुम्हाला खोटे वाटत असेल तर तो सोन्याचा सफरचंद मला बक्षीस द्या. " आता राजाला त्याच्या म्हणण्याचा अर्थ कळला. मग तो मोठ्या चलाकीने म्हणाला," नाही.. नाही... तू खरेच बोलतो आहेस." गरीब इसम पटकन म्हणाला," मग माझे सोन्याने भरलेले मडके परत द्या." शेवटी राजाने मान्य केले की, या माणसाने बक्षीस जिंकले आहे. राजाने त्याला सर्वोच्च खोटे बोलणार्‍याचा पुरस्कार जाहीर करून सोन्याचे सफरचंद बक्षीस समारंभपूर्वक देऊन सन्मान केला. 

No comments:

Post a Comment