Monday, December 26, 2016

समुहाने वाईटाचा नाश शक्य


आपल्या आजूबाजूला  आपल्याला नको असलेल्या काही गोष्टी घडत असतात.  आपल्या देशात भ्रष्टाचार शिष्टाचार झाला आहे. दिवसाढवळ्या आपल्या माता-भगिनींवर अत्याचार होत आहेत. रोज कोणत्या ना कोणत्या कारणांसाठी मुडदे पडत आहेत. शेतकरी आत्महत्या करत आहेत. रोज कोणावर ना कोणावर अन्याय घडत आहे. या गोष्टी थांबवता येणं शक्य नाही, पण कमी जरूर करता येतील. त्यासाठी एका विचाराच्या माणसांनी एकत्र येऊन तोडगा काढला पाहिजे. यावर निव्वळ भाषणे देऊन चालणार नाही. संयमाने या समस्यांच्या मुळाशी जायला हवे. हे करताना आपल्या स्वत:लाही बदलायला हवे. आपल्या आवडी-निवडींना, स्वभावाला मुरड घालावी लागणार आहे. आपण समाजाचे काही देणे लागतो, असा विचार करून समाजासाठी काही केले पाहिजे. की बांधिलकी जोपासली पाहिजे. मन संवेदनशील असलं पाहिजे. सहिष्णु असलं पाहिजे. या मतलबी दुनियेत आपण मतलबी होऊन चालणार नाही. त्यांना वळणावर आणायला हवं. वळणाचं पाणी वळणावरचं जाणार, असं म्हणतात. वळणं चांगली असली की, काही त्रास पडत नाही. आपल्याला  फक्त वळण लावून द्यायचे आहे.
 समाज अनेक कारणांनी प्रदुषित होत आहे. तसं माणसाच्या कृपेनं निसर्गदेखील प्रदूषित होत आहे. जल, हवा,ध्वनी प्रदूषणाने माणूस माणसाचंच जिणं हराम करत आहे. सांडपाणी,रसायन मिश्रित कारखाण्याची मळी नद्यांमध्ये मिसळत आहे. त्यातल्या पाण्याच्या सेवनानं आरोग्य बिघडत चाललं आहे. जमिनीत रासायनिक खताचा बेसुमार वापर करून तिला नापिक करत आहोत. कारखान्यांच्या धुरंड्यांमधून, वाहनंमधून निघणारा विषारी वायू माणसाचंच आयुष्य कमी करत आहे. त्यातच करू नये ते माणूस करू लागल्याने स्वत:च स्वत:च्या शरीराची नासाडी करून घेत आहे. दारू, मावा-गुटखा, बिडी-सिगरेट याची लत माणूस हकनाक लावून घेत आहे. सरळ जीवन जगण्याचा मंत्र आपल्या साधू-संतांनी दिला असताना माणूस वाकड्यात शिरत आहे. यावर समुहाने आवर घालता येईल. गाव करी तिथे राव काय करील, अशी एक म्हण आहे. त्यामुळे सगळ्यांनी मिळून वाईटाचा नाश करण्याचा चंग बांधला तर सर्व काही शक्य आहे.

No comments:

Post a Comment