Saturday, December 10, 2016

वृक्षसंवर्धन आणि आम्ही


     निसर्ग चक्र बदलत चालले आहे.याला जबाबदार माणूसच आहे.नैसर्गिक साधन संपतीचा वापर बेसुमार वाढला आहे.झाडे,पाणी,खनिजे यांच्या वाढत्या वापरामुळे अनेक समस्या वाढत आहेत.वृक्षतोड ही त्यातलीच एक मोठी समस्या आहे.या वृक्षतोडीचा फटका तापमान वाढीस करणीभूत ठरत आहे. खासगीरित्या वृक्षतोड बेसुमार होत आहेच,पण शासनातर्फे होणारी वृक्षतोडही मोठी गंभीर आहे. हे म्हणजे लोकासांगे ब्रम्हज्ञान आणि आपण मात्र कोरडे पाषाण, अशी सरकारची अवस्था आहे.विशेष म्हणजे याकडे कुणीही गांभीर्याने लक्ष द्यायला तयार नाही. अनेक भागात रस्ता रुंदीकरण, मोठे प्रकल्प, धरणे बांधणे, बांधकाम, उद्योगधंदे उभारताना होणारी वृक्षतोड मोठया प्रमाणात असते. या आधीही वृक्षतोड झाली आहे, होत आहे आणि होत राहणार यात मात्र शंका नाही. मात्र, याचा फटका पर्यावरण तसेच वन्यजीवांनाही सहन करावा लागत आहे. अनेक सामाजिक संस्था,सरकारी कार्यालये यांनी वृक्षसंवर्धनासाठी रोपटी लावण्याचा प्रकल्प हाती घेतला. काहींनी केलेली वृक्ष लागवड ही यशस्वीही ठरली. मात्र, बहुतांश ठिकाणी त्याचा दिखावाच झाला. त्यामुळे खरच हे वृक्ष मोठे झालेत का? याचे संवर्धन होत आहे का याकडे पाहण्याची तसदी कुणी घेतली नाही. सरकारेही किती झाडे लावली?किती जगली? एवढीच आकडेवारी घेऊन आपल्या फायलीत लिहून ठेवतात आणि मोकळी होतात.
     झालेल्या वृक्ष लागवडीच्या झळा आपल्याला जाणवत असल्या तरी आम्ही त्यासाठी काहीच करू शकत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. शासनातर्फे मोठया प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येते. मात्र, लावलेली झाडे जगतात की मरतात याची काळजी घेण्याकडे शासनाने पाठ फिरविली आहे. शासनाने लावलेल्या झाडांच्या संवर्धनासाठी काळजी घेतली असती तर आता आपल्या परिसरात जंगलमय वातावरण निर्माण झाले असते. मात्र, शासनाच्या दुर्लक्षामुळे उन्हाची तीव्रता वाळवंटात असण्याचा प्रत्यय करून देते. आतातरी शासन याकडे लक्ष देणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
     शासनाने वृक्ष लागवडीसाठी योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. त्या बरोबरच त्या जमिनीत कोणत्या प्रकारचे रोपटे येते याची दक्षता घेणे गरजेचे आहे. ज्या ठिकाणी पाणी कमी आहे तेथे कडूलिंब, चिंच, बाभूळ यासारख्या झाडांची लागवड केल्यास त्यांचे संवर्धन होऊ शकते. पाणथळ भागात योग्य त्या रोपटयांची निवड करून त्यांची लागवड केल्यास या वृक्षांचे संवर्धन होऊ शकते. मात्र, नियोजनबद्धतेच्या अभावी कोठेही आणि कोणत्याही प्रजातीची रोपटी लावली तर ती बाद करण्यातच अधिकतर प्रशासन धन्यता मानत असते. यामुळे अनेक ठिकाणी रोपटयांच्या संवर्धनातही दुर्लक्ष होते.
     रोप लागवडीवेळी सर्वसाधारणपणे दीड फूट खड्डा खणून त्यामधील दगड काढून शेणखत किंवा कंपोष्ट खत, कुजलेला पालापाचोळा, माती घेऊन रोप लागवड करावी. या बरोबरच वाळवीपासून बचाव होण्यासाठी वाळवी प्रतिबंधक औषधांची मिसळण करावी. चार ते पाच फूट उंच असलेल्या रोपांची निवड केल्यास आणि लागवड केल्यास ते यशस्वी ठरू शकते. मात्र, याकडे शासानाने पाठ फिरविल्याचेच दिसून येतेआपल्या शहरांचा विस्तार वाढत आहे तसे वृक्षांची तोडही वाढत चालली आहे. यामुळे शहरांच्या निसर्ग सौंदर्यीकरण आणि पर्यावरण तसेच हवामानावर याचा विपरित परिणाम होताना दिसून येत आहे. जेथे नवीन वसाहती उभे होत आहेत तेथील वृक्षांची संख्या कमी होत आहे. अशामुळे वृक्ष नष्ट होत असून इमारतींची संख्या मोठया झपाटयाने वाढत आहे. अशा परिस्थितीत वृक्ष संवर्धन करण्यासाठी प्रत्येकाने किमान दरवर्षी एक तरी वृक्ष लावावा व त्याचे संवर्धन करावे. मात्र, खरंच जर प्रत्येक व्यक्तीने एक वृक्ष दरवर्षी लावल्यास इमारतींच्या जंगलातही वृक्षांची संख्या वाढल्याखेरीज राहणार नाही. प्रत्येक माणसाला दिवसागणिक दोन झाडांचा तीन किलो ऑक्सीजन दररोज लागतो. यामुळे दरवर्षी एक झाड लावून त्याचे संवर्धन केल्यास भावीकाळात मनुष्याला याचा फायदा नक्कीच होणार यात शंका नाही.
पूर्ण वाढ झालेली झाडे रस्ते रुंदीकरण, बांधकाम, उद्योगधंदे, घरे बांधणी तसेच इतर व्यवसाय उभारणीसाठी तोडली जातात. यामुळे निसर्गाचे मोठे नुकसान होते. हे टाळण्यासाठी शक्य तितकी रोप लागवड करून नुकसान टाळता येते. मात्र अशा उपक्रमांकडेही दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे दिसून येते. यामुळे केवळ पर्यावरणाचा ़र्हासच होत आहे. आतातरी याचा विचार गांभीर्याने घेण्यासाठी योग्य ती उपाययोजना हाती घेणे गरजेचे आहे.
     शहरांमध्ये शासनाच्या आदेशानुसार दरवर्सी रोपांची लागवड केली जाते. शहरात आणि आसपासच्या माळरानावर वृक्ष लावण्याचा फार्स केला जातो. नंतर पूर्वीसारखीच परिस्थिती तयार होते. त्यांचे जतन, संवर्धन होत नाही. त्यामुळे माळराने भकास दिसतात. माळ रानावर केलेल्या वृक्ष लागवडीचे संवर्धन केल्यास माळरानही जंगलमय बनल्याखेरीज राहणार नाही. यामुळे नेमके प्रशासन कोणत्या ठिकाणी वृक्ष लागवडीसाठी निधी वाया घालवतो याचे भान त्यांना राहिलेले नाही. देशाची साधनसंपत्ती नष्ट होत असताना याला वाचविण्याचे काम हे प्रत्येकाचेच आहे. मात्र, याकडे विशेषतः कोणच लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे.
     विविध संस्थांनी वृक्ष लागवडीसाठी युद्धपातळीवर काम सुरू केले आहे. त्यांनी केलेल्या या कार्याचे कौतुक करावे तितके कमीच आहे. मात्र, काही संस्था केवळ आपल्या प्रसिद्धीसाठी वृक्ष लागवड करतात. वृक्ष लागवड झाली की आपले काम संपले असे त्यांचे मत असते. खरेतर वृक्ष लागवड केल्यानंतर त्यांच्या संवर्धनासाठी केलेले कार्य हे महत्त्वाचे ठरते. काही संस्थांनी तर एकाच खड्डयामध्ये अनेक वेळा वृक्ष लागवडीचा संकल्प साधला आहे. अशा संस्थांना खरंच वृक्ष संवर्धनाची काळजी आहे, असे म्हणायचा प्रश्न पडतो. भरमसाठ झाडे लावण्यापेक्षा एकच झाड लावा आणि त्याचे जतन आणि संगोपन करा. त्याचा नक्कीच फायदा होईल. माणसाने केलेली आर्थिक गुंतवणूक त्याच्या भावी आयुष्याला उपयुक्त ठरते. मात्र एका माणसाने एका झाडाची गुंतवणूक केली तर ती त्याच्या आख्ख्या कुटुंबाला फायद्याची ठरते, ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे.





No comments:

Post a Comment