Tuesday, December 27, 2016

करुण कलाधरण नायर



     25 वर्षाच्या या युवा भारतीय क्रिकेटपटूचे नाव आज प्रत्येक क्रिकेटप्रेमीच्या ओठांवर आहे. का असणार नाही म्हणा, कारण करुण नायरने इतक्या लहान वयात कामगिरीच तशी मोठी केली आहे. त्याने आपल्या तिसर्या आंतरराष्ट्रीय सामन्यात तिहेरी शतक झळकावून आपले नाव जगातल्या दिग्गज खेळाडूंच्या यादीत सामिल केले आहे.भारत आणि इंग्लंड दरम्यानच्या कसोटी मालिकेतल्या पाचव्या कसोटी सामन्यात करूणने 303 धावा बनवून आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत पहिल्या शतकाला तिहेरी शतकात बदलून विरेंद्र सेहवागसोबतच्या क्लबमध्ये जाऊन पोहचला आहे.
     क्रिकेटपटू करण नायरचा जन्म 6 डिसेंबर 1991 मध्ये जोधपूर येथे झाला.खरे तर तो मूळचा केरळचा राहणारा आहे. राज्यस्तरावर करण कर्नाटककडून खेळतो आहे. क्रिकेटच्या मैदानावर अगदी मोकळेपणाने खेळणारा आणि गोलंदाजांची शिट्टी-बिटी गुल करणारा करण स्वभावाने तसा फारच लाजाळू आणि कमी बोलणारा आहे.तो कोणाशीही एकदम मिसळत नाही.
     करणने आपल्या पहिल्या दर्जाच्या खेळाला 2013 ला प्रारंभ केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये याच वर्षी म्हणजे 2016 ला त्याने  पदार्पण केले. पहिल्या दर्जाच्या सामन्यांमध्ये त्याची कामगिरी सर्वोत्तम राहिली आहे. त्याची शानदार कामगिरी पाहून आयपीएल 2016 मध्ये दिल्ली डेयरडेविल्सने त्याला 4 कोटी रुपयांची बोली लावून खरेदी केले होते. पण त्याचा बेस प्राइस फक्त 10 लाख रुपये होता.
     आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतल्या तिसर्याच सामन्यात परिपक्व खेळाचे प्रदर्शन करत त्याने सार्या क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. करणला लहानपणी फुफ्फसाचा आजार होता. फुफ्फसाची क्षमता कमी असल्याने त्याला  डॉक्टरांनी शारीरिक मेहनतीचा सल्ला दिला होता. यामुळे वडिलांनी त्याला क्रिकेटच्या मैदानात उतरवले. शानदार कामगिरीमुळे करण भविष्यात कित्येक विक्रम तोडू शकतो, यात वादच नाही. त्याच्या पुढील कामगिरीस शुभेच्छा!



No comments:

Post a Comment