ग्लॅमर,प्रेम आणि रोमांस यांनी भरलेल्या बॉलीवूड चित्रपटांना कंटाळलेले प्रेक्षक आता खेळ आणि खेळाडूंच्या जीवनाशीसंबंधीत चित्रपटांना अधिक पसंद करताना दिसत आहेत. लगान,चक दे इंडिया,भाग मिल्खा भाग, पानसिंह तोमर आणि मेरी कोमसारख्या चित्रपटांना मिळालेल्या यशामुळे उत्साहित बॉलीवूड निर्मात्यांचे लक्ष आता कुस्तीशीसंबधीत कथानकावर गेलं आहे. सलमान खाननी पश्चिम उत्तर प्रदेशातील कुस्तीशीसंबंधीत कथेवर सुल्तान बनविला. जॉन अब्राइमने रुस्तम-ए-हिंद गामांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवण्याची घोषणा केली आहे.अमिरखानचा दंगल आपलं लक्ष केवळ देशातला प्राचीन खेळ-मलविद्या किंवा कुस्ती याची झालेली दुर्दशा याकडेच वेधत नाही तर भारतीय समाजात होत असलेल्या बदलावरही प्रकाश टाकतो.
तसे पाहिले तर आपल्या देशातले क्रीडाप्रेमी क्रिकेटशिवाय दुसर्या कुठल्या खेळाकडे पाहायलाच तयार नाहीत.नाही म्हणायला हॉकी,व्हॉलीबॉल,गोल्फ,बास्केटबॉल आणि कबड्डीविषयी थोडी रुची वाढत आहे. पण क्रिकेटच्या मानाने ती कमीच आहे. ही आवडदेखील देशातल्या काही भागा-प्रदेशांपुरतीच मर्यादित आहे. फुटबॉल म्हटले की, पश्चिम बंगाल. आपल्या देशातल्या इतर राज्यात याबाबतची रुची जवळजवळ नाहीच. भारतात कुस्तीची लोकप्रियता कमी होत असली तरी ऑलम्पिकमध्ये हा मोठा लोकप्रिय खेळ आहे. जगातल्या 122 देशांमध्ये कुस्ती खेळली जाते. भारत,पाकिस्तान,इराण,तुर्की, उज्बेकिस्तान, तजाकिस्तान,मंगोलियासारख्या देशांमध्ये कुस्तीविषयी पारंपारिक आवड पाहायला मिळते.महाभारत काळापासून आजच्या आधुनिक युगापर्यंत भारतात मल्लविद्येला म्हणजेच कुस्तीला एक समृद्ध परंपरा आहे. आजदेखील उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा,मध्यप्रदेश, राज्स्थान आणि आपल्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातील अशी अनेक ठिकाणे आहेत,जिथे कुस्ती आणि पैलवानीविषयी लोकांमध्ये कमालीची रुची आहे. मोठ्या शहरांमध्ये आयपीएल सामान्यांसाठी लाखोची गर्दी होत असते, तशी ग्रामीण भागात कुस्ती पाहायला गर्दी होत असते. आपल्या महाराष्ट्रातल्या कोल्हापूर, नाशिक, सातारासारख्या जिल्ह्यांमधल्या ग्रामीण भागात कुस्तीचे आखाडे प्रसिद्ध आहेत.इथल्या कुस्तीची ऐटच न्यारी आहे.
स्वातंत्र्य पूर्वकाळात सगळ्या जुन्या शहरांमध्ये जसं की, भोपाळ,इंदोर,पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा,नागपूर, मुंबई, बडोदा,बरेली, ग्वालियर,झांसी,दिल्ली,रोहतक,मेरठ,लुधियाना,अमृतसर, जालंधर आदी शहरांमधले आखाडे प्रसिद्ध आहेत. ही आखाडे शहरापासून काही अंतरावर निसर्गाच्या सानिध्यात बांधले गेले. कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांचे कुस्तीवर विलक्षण प्रेम. फाळणी अगोदरच्या पंजाब प्रांतातल्या प्रसिद्ध पैलवानांना आंमत्रण देऊन इथल्या कुस्तीगीरांना तालीम द्यायचे. त्यामुळेच महाराष्ट्रात आखाड्यांना तालीम म्हटले जाऊ लागले. महाराजांमुळे कुस्तीला महाराष्ट्रात मान मिळाला. आजही पूर्वीप्रमाणे कुस्तीचा फड ग्रामीण भागात रंगतो. फड प्रेक्षकांनी खचाखच भरलेला असतो.
साठच्या दशकापर्यंत उत्तर भारत आणि महाराष्ट्रातल्या काही प्रमुख शहरांमधल्या आखाड्यांमध्ये पैलवानांची गर्दी होती. त्या दिवसांत पैलवान आजच्या चित्रपटातल्या नायकाप्रमाणे लोकांमध्ये प्रसिद्ध होते. लोक सामान्य लोक त्यांना पाहायला, बोलायला, भेटायला उत्सुक असत. त्यांना दूध, खारीक-बदाम खाऊ घालत, त्यांना मान-सन्मान देण्यात त्यांना आनंद वाटे. दिल्लीचे गुरु हनुमान आणि त्यांचे शिष्य चंदगीराम यांचे नाव आदराने घेतले जाई. 1970 च्या दशकापर्यंत बॉलीवूडमध्ये दारासिंहचे चित्रपट सुपरहिट चालायचे, जे प्रामुख्याने त्यांची मल्लविद्या किंवा शरीरसौष्ठवर अधारित होते.
भारतातल्या प्रसिद्ध पैलवानांमध्ये जगज्जेते गुलाम मोहम्मद ऊर्फ गामा यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. 1878 मध्ये अमृतसर येथे जन्मलेले गामा फक्त 10 वर्षाचे असताना त्यांनी जोधपूरमध्ये झालेल्या आखाड्यात 400 पैलावानांच्या स्पर्धेत 15 वे स्थान पटकावले होते.त्यांच्याबाबतीत आणि त्यांच्या सरावाबाबत अनेक दंतकथा प्रसिद्ध आहेत. ते रोज पाच हजार जोर बैठका आणि तीन हजार दंडबैठका मारायचे.त्यांचा दररोजचा खुराक जबरदस्त होता. 15 लीटर दूध,एक शेर बदाम आणि अर्धा शेर तूप त्यांना रोज लागायचे. 1897 आणि 1910 च्या दरम्यान गामा यांनी भारतातच नव्हे तर जगातल्या अनेक देशांमध्ये जाऊन तिथल्या नामांकित पैलवानांना धूळ चारली होती. त्यांना 1910 मध्ये रुस्तम-ए-हिंद हा किताब दिला गेला.
गामा यांच्या तोडीचा गुंगा नावाचा पैलवानही प्रसिद्ध आहे. तसेच गुलाम आलिया यांनी 1902 मध्ये युरोपातील सर्व मल्लांना जिंकून रुस्तम-ए-हिंदचा किताब मिळवला होता. कल्लू आलिया व त्यांचा मुलगा गामा कल्लू हाही प्रसिद्ध मल्ल होता. अहमदबक्ष या मल्लाने 1912 मध्ये युरोपात जाऊन तेथील मध्यमगट वजानाच्या सर्व प्रसिद्ध पैलवानांना हरविले होते.
1920 साली सर दोराबजी टाटांच्या मदतीने काही कुस्तीगीर एंटवर्प ऑलिम्पिक सामान्यांसाठी गेले होते. त्यावेळी शिंदे नावाच्या महाराष्ट्रीय मल्लाने कुस्तीत आपली चुणूक दाखवली होती. त्यानंतर 1948 साली लंडन ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्रातल्या मातीतल्या रांगड्या खाशाबा जाधवने दोन कुस्त्या जिंकून सहावा क्रमांक मिळवला. पुढे 1952 च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये त्याने तिसरा क्रमांक पटवून भारताला एकमेव कास्यपदक मिळवून दिले. त्याच सामान्यात के.डी. माणगावे याचा पाचवा क्रमांक आला.अलिकडे सुशांतकुमार,योगेश्वर दत्त यांनीही आपल्या कुस्तीचे वैभव राखत यश मिळवून दिले.
फाळणीनंतर गामा पाकिस्तानात गेले आणि लाहोरला स्थायिक झाले. आपल्या जीवनाच्या आखेरच्या काळात ते खूपच आजारी होते. त्यांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यावेळेला भारतातले उभरते उद्योगपती जीडी बिर्ला, जे कुस्ती आणि पैलवानीचे मोठे शौकीन होते, त्यांनी गामा यांना आर्थिक मदत केली. गामा यांचे निधन 23 मे 1960 मध्ये लाहोर येथे झाले. असे म्हटले जाते की, चिनी मार्शल आर्टचा विख्यात कलाकार ब्रूसली याने गामा यांच्या जीवनापासून प्रेरणा घेतली होती.
भारतात कुस्ती आणि पैलवानीची इतकी मोठी समृद्ध परंपरा आणि लोकप्रियता असताना शेवटी आपण ऑलम्पिक, एशियाड आणि कॉमनवेल्थसारख्या खेळांमध्ये का चांगले प्रदर्शन करू शकत नाही? का आपण साक्षी मलिकने मिळवलेल्या महिला कुस्तीतल्या कास्य पदकावर संतुष्ट होतो? ही आपल्या देशाची मोठी शोकांतिका म्हणावी लागेल.याला सर्वस्वी आपल्या देशांची सरकारे जबाबदार आहेत.त्यांनी या खेळाची फार मोठी उपेक्षा केली आहे. आता कुस्ती फक्त गावांपुरती मर्यादित राहिली आहे. शहरी मध्यमवर्ग क्रिकेटमध्ये मश्गूल आहे. कारण त्यात ग्लॅमर,पैसा,रोमांच सर्व काही आहे. ग्रामीण भारतातले मोठे-वृद्ध, मुले आणि युवा कुस्तीचे आखाडे पाहून रोमांचित होतात. त्यांच्या मनोरंजनाचे ते साधनच आहे. कुस्ती ग्रामीण संस्कृतीचे प्रतीक आहे. पण ही कुस्ती गाव-खेडे सोडून बाहेर पडायला हवी आहे.
अमिर खानच्या दंगल चित्रपटाने भारतीय कुस्तीविषयी एक उम्मीद जागवली आहे. रुस्तम-ए-हिंद गामा आपल्या वृद्धापकाळात आपल्यावरील उपचाराला महाग झाले असले तरी भारताच्या युवा पैलवानांना आणि खास करून गीता फोगट,बबिता फोगट आणि साक्षी मलिकसारख्या पैलवानांना मदत आपल्या देशातल्या सरकारांनी औद्योगिक घराण्यांनी करायला हवी आहे.
daink sanchar,solapur
daink sanchar,solapur
No comments:
Post a Comment