Sunday, December 25, 2016

पत्रकारांनी आरोग्याशी तडजोड नकोय

 
     लोकशाहीत चौथ्या स्तंभाला विशेष महत्त्व आहे. समाजाच्या विविध प्रश्‍नांना प्रसारमाध्यमे वाचा फोडतात. शासनाचे व लोकप्रतिनिधींचे काय चुकते ते सुद्धा जनतेपुढे मांडण्याचे धैर्य पत्रकार दाखवतात. त्यामुळे या माध्यमाचा शासन व पुढारी धसका घेतात. पत्रकार हा समाजाचा आरसा असतो. सततची धावपळ, वेळीअवेळी खाणे, अपुरी झोप यामुळे त्याचे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. परंतु, त्याला न जुमानता आपले कार्य तो करीत असतो. त्याच्या कार्याची दखल समाज घेत असतो. त्याचा वेळोवेळी उचित असा गौरव करीत असतो. त्याला मान-सन्मान मिळत असतो. पण तरीही तो आर्थिक बाजूने नडलेला असतो. त्याच्या कामाचा व्याप दांडगा असतो, सतत तो कार्यरत असतो. पण तो आर्थिकदृष्ट्या मात्र सक्षम नसतो. फक्त पत्रकारिता करणार्‍या मंडळींना फक्त याच्यावर उदरनिर्वाह करता येत नाही. कौटुंबिक आर्थिकता ताणलेली असते. खरे म्हणायला गेले तर तो आर्थिक बाजूने सक्षम नसतो, त्याला स्थैर्य नसते. वृत्तपत्र चालवणारे मालक त्याच्या कामाएवढा मोबदला देत नाहीत, ही वस्तूस्थिती आहे. अर्थात हे मी मोठ्या आणि नावाजलेल्या वृत्तपत्रांबाबत बोलतोय. रोजगार हमीवर जाणारा शेतमजूर जेवढे महिन्याला कमावतो, तेवढेही या पत्रकाराच्या हातात पडत नाही. त्यामुळे या पत्रकाराला समाजात मान-सन्मान असला तरी त्याला आर्थिक स्थैर्य नाही. कामसुद्धा एके ठिकाणी शेवटपर्यंत राहील, याची शाश्‍वती नाही. मालक राहू दे बाजूला पत्रकाराला ज्याच्या हाताखाली काम करावे लागते, अशा वृत्तसंपादक, जाहिरात प्रमुख, व्यवस्थापक यांच्याकडूनही फारशी चांगली वागणूक मिळत नाही. सारखा तगादा लागलेला असतो. बातमीचा, जाहिरातीचा, त्याच्या वसुलीचा! यामुळे ग्रामीण भागात किंवा शहरी भागात बातमीदार किंवा पत्रकार म्हणून काम करणार्‍या मंडळींचे मानसिक स्वास्थ्यदेखील चांगले राहत नसल्याचा अनुभव आहे. 
     त्यामुळे पत्रकारांच्या आरोग्याचा प्रश्‍न मात्र इथे महत्त्वाचा ठरतोय. एवढी धावपळ करूनहीदेखील काही त्रुटी राहिल्या तर वरिष्ठांची बोलणी खावीच लागते. कारण वृत्तपत्रांमध्येदेखील जीवघेणी स्पर्धा आहे. आपल्या दैनिकात बातमी चांगली, सविस्तर आली पाहिजे, असा अट्टाहास वरिष्ठांचा असतो. त्यामुळे एवढी धावपळ करूनही वरिष्ठांची बोलणी खावी लागत असेल तर त्याची मानसिक स्थिती चांगली राहिल का, असा प्रश्‍न आहे. त्यामुळे पत्रकारांनीही आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला हवे. आपले आरोग्य शाबूत तर सर्व काही शाबूत. त्यामुळे त्यांनी आरोग्याशी तडजोड करू नये, असे वाटते. अलिकडे वॉट्स ऍप, फेसबूकचा जमाना आहे. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्याचा उपयोग आपल्या कामात करायला हवा. तंत्रज्ञान सुधारले आहे. घटनेच्या ठिकाणी थोडा वेळ बसून निवांतपणे बातमी देता येते. या नव्या तंत्रज्ञानाच्या साधनांची सुविधा वृत्तपत्रांनी पत्रकारांना करून द्यायला हवी.
    ग्रामीण भागातल्या पत्रकारांना लॅपटॉप, टॅबलेट, उत्तम प्रकारचा ( बातम्यासाठी सर्व सोयीनियुक्त )मोबाईल अशा गोष्टी पत्रकारांक़डे आवश्यक आहे. वृत्तपत्रांनी आपल्या दैनिकाचे काम उत्तमप्रकारे कसे होईल पाहताना पत्रकाराची सर्व ती काळजी घ्यायला हवी. त्याचा आरोग्य विमा उतरवायला हवा. मोठ्या आजारांबाबती आर्थिक मदत द्यायला हवी. नाही तर अनेक पत्रकारांना याबाबतीत आलेले अनुभव कटु आहेत. पत्रकारांच्या बातम्या देणारे बेरयया ऊर्फ नारद ( ब्लॉग) याने याविषयी बरेच लिहिले आहे. त्यामुळे त्याची चर्चा करत नाही. शेवटी पत्रकारांना एकच सांगावेसे वाटते की, त्यांनी आपल्या आरोग्याविषयी तडजोड करू नये. व्यायाम, योगावर भर द्या. कामे तर काय होतीलच.

No comments:

Post a Comment