कष्टकर्यांच्या हक्काचा रोजगार देण्याच्यादृष्टीने सांगली जिल्ह्यातल्या सुपुत्र आणि विधानपरिषदेचे माजी सभापती वि.स.पागे यांनी राज्यात रोजगार हमी योजनेचा कायदा केला.राज्याच्या या ऐतिहासिक निर्णयाची केंद्रानेदेखील दखल घेतली आणि तत्कालीन कॉंगेस आघाडी सरकारने ही योजना 2005 पासून देशभर सुरू केली.
गरिबांच्या चेहर्यावरील दु:खाची जाणीव, तसेच कष्टकर्यांच्या हाताला हक्काचे काम मिळावे, तरच त्याला पोटभर अन्न मिळेल, या सर्व गोष्टींचा विचार करूनच तासगावचे सुपुत्र वि.स. पागे यांनी रोजगार हमी योजना जन्मास घातली. केवळ घोषणा करून वि.स.पागे थांबले नाहीत. सध्याच्या राज्यकर्त्यांप्रमाणे त्यांची ही केवळ घोषणा नव्हती. त्यांनी रोजगार हमीची योजना जाहीरही केली आणि तासगाव तालुक्यातील विसापूर येथून योजनेची सुरुवातही करून दाखवली. ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी ती यशस्वीदेखील करून दाखवली.म्हणूनच त्यांना रोजगार हमीचे जनक म्हटले जाते.
गुणवंत,कीर्तीवंत,दूरदृष्टीचे संयमी, सोज्वळ असे व्यक्तीमत्त्व म्हणजे वि.स. पागे.1969 मध्ये पागे यांनी मांडलेल्या या पहिल्या कामाचा प्रयोग सर्वप्रथम तासगाव तालुक्यातील विसापुरात झाला. तत्कालिन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याहस्ते या कामाचा प्रारंभ होणार होता. परंतु,तांत्रिक अडचणीमुळे तत्कालिन कृषिमंत्री पी.के. चव्हाण यांच्याहस्ते प्रारंभ झाला. रोहयोची पहिली कुदळ विसापुरात मारली गेली. 25 टक्के लोकवर्गणी आणि 75 टक्के शासनाचा पैसा अशा पद्धतीने पहिल्यांदा या कामाची सुरुवात झाली.त्यावेळी लोकवर्गणीतून दीड-दोन हजार आणि सरकारकडून पाच-सहा हजार अशा आठ एक हजाराचे हे पहिले काम झाले.खुदाई करून या योजनेतून वृक्षारोपण करण्यात आले.
दोन वर्षानंतर महाराष्ट्र सरकारने राज्यभर ही योजना लागू केली. त्यावेळी वि.स. पागे यांचे सर्वत्र कौतुक झाले.काम नसणार्या अनेक बेकारांनी त्यांना धन्यवाद दिले. पुरुष आणि महिलांना समान मजुरी मिळाली पाहिजे, या हेतुने 2 रुपये 70 पैसे मजुरीवर मजुरांनी काम केले. सुरुवातीला 8 ते 10 मजूर कामाला होते. सुमारे 56 लाभधारकांनी विविध कामे यातून केली होती. पुढे राज्यात सर्वत्र या कामाची मागणी वाढू लागली. पर्यायाने गरजूंना स्थानिक पातळीवर काम मिळाल्याने खूप समाधानाचे वातावरण होते. महाराष्ट्राने ही योजना बरीच वर्षे चालवली. याचे अनुकरण पहिल्यांदा आंध्र प्रदेश सरकारने केले. नंतर केंद्र सरकारनेही या योजनेला विशेष महत्त्व देत 2005 रोजगार हमी योजना राबवली.यामुळे देशातल्या कोट्यवधी मजुरांना हक्काचा रोजगार मिळाला.
ग्रामसभेला याबाबतचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे यातील भ्रष्टाचाराला लगाम बसला आहे.यातून मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे झाली आहेत. होत आहेत. मात्र ज्या सांगलीच्या भुमिपुत्राने रोजगार हमी योजन देशभर पोहचवली, त्या जिल्ह्यात मात्र या योजनेला अधिकर्यांच्या निष्काळजीपणामुळे खीळ बसली आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात सुमारे अडीच लाख मजुरांची नोंदणी झाली आहे. अधिकार्यांनी ही योजना मोठ्या जोमाने राबवण्याची गरज आहे. सांगली जिल्ह्यातील जत, आटपाडी,कवठेमहांकाळ आणि तासगाव, मिरजेचा पूर्व भाग अजूनही दुष्काळाचे चटके सोसतो आहे.इथे जलसंधारणाची कामे अजून मोठ्या प्रमाणात होण्याची गरज आहे. जलसंधारणातून हे दुष्काळी तालुके सुजलाम-सुफलाम झाल्यास वि.स.पागेसारख्या महान व्यक्तिला ती मानवंदना ठरेल
No comments:
Post a Comment