Monday, December 26, 2016

ही तोंडे बंद कोण करणार?



    आपल्या महाराष्ट्रात शासनानं मावा,गुटखा अशा तंबाकूजन्य पदार्थांवर बंदी घातली आहे. पण आपल्याला कुठे जाणवता का बंदी आहे असं? सगळीकडे खुलेआम, बिनबोभाट  खवय्यांच्या या आवडत्या जिनसा सहज मिळतात. कधी तरी कोठे तरी कारवाई केल्याची बातमी वाचायला मिळते. बाकी सगळा आनंदी आनंद आहे. तंबाकूच्या सेवनाने तरुणाई बिघडत चालली आहे. कर्करोगासारख्या रोगांना बळी पडत ते स्वत:चाच र्‍हास करून घेत आहेत. या तरुणांची कीव येऊन की काय शासनाने मोठ्या महसुलावर पाणी सोडत मावा,गुटख्यांवर बंदी आणली. पण तरुणांना त्याचे काय! मावा,गुटख्याचं बचकं तोंडात टाकून त्याच्या कीकने येणारा परमानंद घेत राहतात. ठीक आहे, मावा, गुटखा, पान-तंबाकू  खातात ते खातातच पण  वर कुठेही थुंकतात. याला काय म्हणायचे? हे वागणे किळस आणणारे आहे.
      समाजात वावरताना सभ्यतेच्या काही मर्यादा असतात. या गोष्टी सांगायचे म्हणजेदेखील सामाजिकदृष्ट्या चिंतेची आणि लाजिरवाणी गोष्ट आहे. कुठे काय बोलावे यापेक्षा काय बोलू नये हे जसे म्हत्त्वाचे आहे तेवढेच कुठे कसे वागावे यापेक्षा कसे वागू नये, याला अधिक महत्त्व आहे. आदरणीय बाळासाहेब ठाकरे एकदा म्हणाले होते. समाजात वावरताना असं दिसतं की, लोक बोलताना कशाचाही विचार करीत नाहीत.उचलली जीभ लावली टाळ्याला. खरे म्हणजे अशा माणसांच्या जिभेलाच टाळे लावले पाहिजे. ठाकरे यांनी व्यावहारिक सत्य स्वच्छ आणि स्पष्ट शब्दांत सांगितले आहे.तसाच एक प्रकार कोठेही थुंकणार्‍यांच्या बाबतीत समाजात नित्य पाहायला आणि अनुभवायाला मिळत आहे.कुठे थुंकावे याचा धरबंध थुंकाणारे पाळत नाहीत.या आपल्या वृत्तीचा त्रास समाजाला होतो,याची या थुंकणार्‍यांना जरादेखील तमा नसते. पूर्वी एक जाहिरात दूरदर्शनला यायची. ती सार्वजनिक हितार्थच होती.रवंथ करणारी एक म्हैस आणि पान खावून पचकन थुंकणार्‍या इसमाची “ आदमी है की जानवर ” अशी तुलना करणारी ही जाहिरात माणूस थुंकण्याच्याबाबतीत जनावरासारखा वागतो, या गोष्टीवर प्रकाश टाकणारी होती. अशा कित्येक जाहिराती समाजहितार्थ दाखवल्या जातात. पण सवयीचा गुलाम बनलेला माणूस मात्र ही थुंकण्याची घाणेरडी सवय काही सोडायला तयार नाही.
      पान-तंबाकू, मावा, गुटखा खाणार्‍या रसिकांच्या मुख कमलातून निघणारा रस  व तो पचकन कुठेही थुंकल्यामुळे केल्या गेलेल्या रंगपंचमीमुळे प्रदर्शित झालेली रसिकता कुठे तरी थांबली पाहिजे.सरकारी कार्यालयातील भिंतीचे कोपरे  आणि तसलीच सार्वजिक ठिकाणे यावर अशी रंगपंचमी होऊ नये, म्हणून देवादिकांचे चित्रे लावण्याचा प्रयत्न झाला.  भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छता अभियानचादेखील अशा मंडळीवर परिणाम झाला नाही. माणसाला हे करू नको, ते करू नको, असे म्हटले की तो हमखास तसे करणारच, ही माणसाची प्रवृत्ती आहे. “इथे लघवी करू नये”  अशी एकादी पाटी किंवा सूचना लिहिलेली असते, मात्र काही महाभाग तिथेच हमखास लघवी करतात, किंवा “येथे वाहन थांबवण्यास मनाई आहे”, असा ङ्गलक जिथे आहे नेमके त्याच्या खाली वाहन लावलेले आढळते,तसा हा प्रकार आहे.
      कोठेही थुंकणे ही लोकांच्या आरोग्यास अपायकारक व तितकीच किळसवाणी गोष्ट आहे.सारासार विचार न करता कुठेही थुंकल्यामुळे सार्वजनिक इमारती,रस्ते नुसते गलिच्छ होत नाहीत तर त्यामुळे ङ्गुफ्ङ्गुसाचे रोग, क्षयरोग, श्‍वासोच्छवासाचे विकार ङ्गैलावण्याचीही मोठी भीती असते. एसटीतून, मोटारीतून किंवा दुचाकीवरून जाताना  पिचकारी मारणारे बाहेर किंवा आजूबाजूला  कोणी पादचारी आहे की नाही, याचादेखील विचार करत नाही. रस्त्यात थुंकणारे केवळ रस्त्यातच थुंकत नाहीत तर आजूबाजूला कोणी उभा आहे की नाही याचे भान न ठेवता मनमोकळेपणाने थुंकतात. त्यामुळे अनेकदा अनेकांच्या अंगावर ही थुंकी उडालेली असते. यावरून मारामार्‍यादेखील होतात. पण अशा महाभागांना मारामार्‍याच काय मरणाचीदेखील भीती वाटत नाही. अशी कमाल ङ्गक्त थुंकणार्‍यांच्याबाबततीतच घडू शकते.
      कुठेही थुंकणे हा जणू काही आमचा जन्मसिद्ध हक्क आहे, असे काही जणांना वाटत असते.यासंदर्भातील एक गंमतीदार गोष्ट सांगितली जाते.एका धनाढ्य व्यक्तीकडे त्याचा एक मित्र गेला. अलिशान भिंतीवर त्याने थुंकी टाकली. तोंडात तंबाकूमिश्रीत पान असल्याने त्याला पुन्हा थुंकी मारावीशी वाटली. तेवढ्यात त्याच्या धनाढ्य मित्राने एक उत्तमप्रतीची, महागडी पिंकदाणी त्याच्या तोंडासमोर धरली. तरी त्या महाभागाने आपली पिंक भिंतीवरच टाकली. असे दोन-चारदा झाले. प्रत्येकवेळी तो श्रीमंत मनुष्य पिंकदाणी त्याच्या तोंडासमोर धरत होता. अखेर शेवटच्या त्या कृतीला हा थुंकणारा वैतागला आणि चिडून म्हणाला,हे पहा पुन्हा जर हे चकचकीत भांडे माझ्यापुढे धरले तर मी त्यातच थुंकेन. सांगून ठेवतो. आता काय म्हणावे या महाभागाला? सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान न करणे, सार्वजनिक ठिकाणी गुटखा, मावा किंवा पान खावून न थुंकणे ही साधीसोपी सभ्य गोष्ट आहे. पण ही सभ्यतादेखील आपल्याकडे राहिली नाही, ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, असं सांगून झालंय. आता यावर आणखी काय सांगावं  

No comments:

Post a Comment