Thursday, December 29, 2016

घरच्यांपासून लपवून हॉकी शिकलो


     पंजाबच्या एका छोट्याशा गावात राहणार्‍या हरजीतचे वडील ट्रक ड्रायव्हर होते. ते नेहमी ट्रक घेऊन देशातल्या दूरवरच्या वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये जायचे. पंधरा-पंधरा दिवस, महिना-महिना घरी येत नसत.अशा परिस्थितीत सगळी जबाबदारी आईवर पडायची. ते सगळे मोहाली जिल्ह्यातल्या कुरेली गावात राहत असत. घरापासून जवळच असलेल्या मैदानावर गल्लीतली मुले हॉकी खेळायला जायची. हरजीतदेखील शाळा सुटल्यावर थेट मैदानावरच जायचा. आई हाका मारायची,ओरडायची, पण त्याचा हरजीतवर कसलाच परिणाम व्हायचा नाही. आई रागवायची,बाबा आल्यावर त्यांच्याजवळ कागाळी करीन म्हणायची,पण बाबा कित्येक दिवसांनंतर यायचे,मग आई तक्रार करण्याचे विसरून जायची.
     आईला काळजी वाटायची. मुलाचे अभ्यासकडे लक्ष नाही. फक्त खेळाकडे ध्यान आहे. तिला काय माहित की, खेळातदेखील करिअर करता येते.तिची फक्त एवढीच इच्छा असायची की,त्याने मोठे होऊन बापासारखे ट्रक ड्रायव्हर होऊ नये.तिचे एकच स्वप्न होते, मुलाने शिकून एखादी चांगली नोकरी पकडावी.त्या दिवसांत शेजार्‍यांच्या फारच कमी घरांमध्ये टीव्ही होता. काही लोक रेडिओवर क्रिकेट समालोचन ऐकायचे. सचिन आणि गांगुली यांची नावे त्याने आवश्य ऐकली होती. मात्र कुठल्या हॉकीपटूचे नाव माहित नव्हते. हॉकी खेळण्यात त्याला खूप मजा येत होती. हिरव्यागार गवताच्या गालिच्यावर स्टीकने चेंडूशी खेळायला त्याला फार आवडायचं.
आता त्याचं अभ्यासातून मन उडालं होतं. एक दिवस त्याने हिम्मत करून बाबांना सांगून टाकलं की, मला शाळा शिकायची नाही, हॉकी शिकायची आहे. मला हॉकीपटू व्हायचं आहे. हे ऐकून बाबांना मोठा धक्का बसला. ते त्याच्यावर चांगलेच भडकले. त्यांना वाटले की, पोरगं,चुकीच्या दिशेने चाललं आहे. ते त्याच्याकडून खूप मोठी आशा बाळगून होते. पण पोरगा मात्र त्यांची स्वप्ने धुळीला मिळवायला निघाला होता.त्याला खूप बोलणी खावी लागली. पण हरजीतसिंहवर त्याचा काही फरक पडला नाही.शाळेतल्या शिक्षकांनीही हरजीतच्या वडिलांना समजावून सांगितलं. खेळातसुद्धा चांगल्या संधी आहेत. त्याला अडवू नका.खेळू द्या. शेवटी बाबा तयार झाले. हॉकी शिकवणुकीचा खर्च मोठा होता.हरजीतला हॉकी कीट घ्यायसाठी वडिलांना नातेवाईकांकडून उधारीने पैसे घ्यावे लागले होते. शिकवणीची फीदेखील जास्त होती. प्रशिक्षकानं सांगितलं होतं की, मुलाच्या डाएटकडे लक्ष द्या. वडिलांची कमाई इतकी नव्हती की, ते इतका खर्च पेलू शकतील. मुलाला सगळ्या सुविधा उपलब्ध करून देणं, त्यांच्या हाताबाहेरचं काम होतं. अडचणी वाढल्या तसं, त्यांनी एक दिवस वैतागून सांगितलं की, आता खेळ-बीळ बंद कर आणि अभ्यासाला लाग. त्याकडे लक्ष दे. हरजीतला मोठा धक्काच बसला.पण वडिलांना काही बोलायची त्याची हिम्मत झाली नाही. प्रशिक्षण सोडून तो पुन्हा अभ्यासाला लागला. 
     बाबांची ताकीद होती की, चांगल्या गुणांनी पास व्हायला हवं. त्यामुळे त्याचा अभ्यासात अधिक वेळ जाऊ लागला. मात्र हॉकी मनातून जात नव्हती. हॉकीपासून काही दिवस दूर राहिला, पण फार दिवस नाही. घरच्यांपासून लपवून तो गोपाळ अ‍ॅकॅडमीत जायला लागला. अशाप्रकारे त्याची हॉकीची शिकवणी सुरू राहिली. घरच्यांना याची गंधवार्तादेखील लागली नाही. प्रशिक्षक त्याच्या कामगिरीवर खूश होते. ते दिवस मोठ्या अडचणीचे होते. त्याच्याजवळ बूट घ्यायलादेखील पैसे नव्हते. घरची परस्थितीही अशी नव्हती की, त्याने वडिलांकडे पैसे मागून घ्यावेत. त्यामुळे त्याला फाटक्या बुटावरच काम चालवावे लागे. त्याची हॉकी स्टीक तुटायची, तेव्हा प्रशिक्षक त्याला दुसरी स्टीक उपलब्ध करून द्यायचे. त्याला खेळत राहणं महत्त्वाचं होतं. हरजीतच्या आई बलवीर सांगतात की, आमची आर्थिक परिस्थिती फारच बिकट होती.हॉकी खेळायला त्याला चांगल्या बुटांची गरज होती. पण आम्ही नाही घेऊ शकलो. हॉकी खेळायला त्याला खूप दूर पायी चालत जावं लागायचं. मी जाणायची की, त्याला सायकल हवी आहे, पण आम्ही असहाय्य होतो. 
     या दरम्यान हरजीत स्थानिक स्पर्धांमध्ये भाग घेत होता. मोहालीत त्याचं नाव होत होतं. ही गोष्ट घरच्यांपर्यत पोहोचली, तेव्हा शेजार्‍यांनी सांगितलं की, तुमचा मुलगा खेळात चांगला हुशार आहे. खूप चांगला खेळतो. आता घरचे नाराज नव्हते. या दरम्यान त्याचा मोठा भाऊ नोकरी करायला सौदी अरेबियात गेला.लहान भावाच्या प्रशिक्षणाची सारी बाजू त्याने उचलली. घरची परिस्थिती सुधारू लागली.हरजीत 2008 साली गाव सोडून जालिंधरला आला. तिथे सुरजीतसिंह अ‍ॅकॅडमीत दाखल झाला. तिथे त्याला पहिल्यांदा पुरेशा सुविधांसह खेळण्याची संधी मिळाली. तो या संधीचे महत्त्व जाणून होता. मोठ्या जोमाने तो आपले लक्ष्य गाठण्यासाठी कामाला लागला. आता हॉकी त्याचं वेड बनलं.
     2012 साली पंजाब ज्युनिअर हॉकी संघात त्याला स्थान मिळालं. याच वर्षी सुल्तान ऑफ जौहर कपसाठी खेळण्याची संधी मिळाली. 2013 साली सगळ्यात उभरता खेळाडू म्हणून त्याला पुरस्क्कार देऊन गौरवण्यात आलं. आई सांगते की, हरजीत खूपच कष्टाळू आणि शांत स्वभावाचा आहे. तो आमच्यापासून लपवून हॉकी शिकत राहिला. मोठ्या अडचणी असतानाही त्याने आम्हाला काही मागितले नाही. आता संपूर्ण देश त्याचे कौतुक करत आहे. आम्हाला त्याचा मोठा अभिमान वाटतो आहे. डिसेंबर 2016 मध्ये त्याच्या नेतृत्वाखालील ज्युनिअर हॉकी संघाने देशाला विश्‍वचषक मिळवून दिला. तब्बल 15 वर्षांनंतर संघाने ज्युनिअर हॉकी विश्‍वचषक पटकावला. जिंकल्यानंतर हरजीतने घरी फोन केला, तर कळलं की सगळं गाव या विजयाचा उत्सव साजरा करत आहे.हरजीत म्हणतो की, वाटलं होतं की, आपण ही बातमी सांगितल्यावर आईला मोठा धक्का बसेल. पण शेजार्‍यांनी आधीच तिला भेटून शुभेच्छा दिल्या होत्या. आईला आनंद होणं,हा माझ्यासाठी सर्वात मोठं बक्षीस आहे.

No comments:

Post a Comment