Monday, December 26, 2016

पाणी बचत मंत्राचा प्रसार व्हायला हवा


पाणी म्हणजे जीवन. अशा पाण्याचा प्रश्‍न यंदा गंभीर आहे, याची जाणीव  ठेवायला हवी. दुष्काळसदृश परिस्थितीचं भान  ठेवायला हवं. त्याचप्रमाणे पाणीटंचाईच्या काळात पाण्याची उधळपट्टी ही गंभीर बाब आहे. पाण्याचा वापर काटकसरीनेच करण्याची आवश्‍यकता आहे.
आम्ही पाणीपट्टी भरतो, मग किती पाणी वापरायचे हे  आम्ही ठरवणार,  असे यापुढील काळात म्हणून चालणार नाही. पाण्याची बचत ही प्राथमिकता आहे. तज्ज्ञांच्या मते दरडोई दर दिवशी 40 लिटर पाणी पुरेसे ठरते. आपण किती पाणी वापरतो हे पाहणे गरजेचे आहे. वैयक्तिक, परिसराची व सार्वजनिक स्वच्छता कटाक्षाने पाळायला हवी. पण पाण्याची उधळपट्टी टाळायलाच हवी.
तिसरे जागतिक युद्ध झाल्यास ते पाण्यासाठीच होईल, हे भाकीत वास्तवात उतरेल याची धास्ती वाटते. भारताची लोकसंख्या जगाच्या 16 टक्के आहे व पाण्याचा साठा फक्त 4 टक्के आहे, हे विसरून चालणार नाही. त्यातच अमर्याद जंगलतोड, भौतिक सुधारणा व विकासाच्या नावाखाली रस्ते, कॉंक्रिटची उभी राहणारी जंगले, उद्योगांसाठी वापरले जाणारे पाणी याकडे डोळसपणे पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.
घरांतून वाहणारे नळ दुरुस्त करून घ्यावेत. वाहणारे सार्वजनिक नळ दुरुस्त करून घ्यावेत.  रेन हार्वेस्टिंग, पाण्याचा पुनर्वापर, पाणी साठवण व काटकसरीने वापर यास प्राधान्य हवे. पाणी शिळे होत नाही याची जाण  ठेवायला हवी.     खरे तर "जलबचत चळवळ' उभी करण्याची गरज  आहे. महिला स्वयंसहाय्यता बचत गट, स्वयंसेवी संस्था, भजनी मंडळ, ज्येष्ठ नागरिक, तरुण मंडळे, सांस्कृतिक मंडळे, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी वगैरेंनी 'पाणी वाचवा' मोहीम हाती घेऊन जनजागृती करायची गरज आहे. पाणी बचत मंत्राचा "डोअर टू डोअर' प्रसार होणे गरजेचे आहे. पाण्याचा वापर करताना फक्त स्वतःच्या घरापुरतेच नव्हे तर एकूण समाजाचा, राज्याचा व राष्ट्राचाही विचार व्हावा.  लहरी मान्सून, आटत आलेले नैसर्गिक पाणी स्त्रोत, भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वेगाने होणारी घट, वाढते हापसे यांमुळे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वेगाने होणारी घट यांमुळे पाण्याची परिस्थिती गंभीर आहे. बरं पाणी साठवण्यासाठी आणि बचत करण्यासाठी मात्र कोणतेही प्रयत्न नाहीत. त्यामुळे विहिरी, नद्या, तलाव, तळी यांमध्ये साठा येणार तरी कोठून. त्यामुळे यासाठी जागृती घरा घरातून होण्याची आवश्‍यकता आहे.
इतर कोणत्याही गोष्टी वा वस्तू उदा. धान्य वगैरे परदेशातून आयात करता येईल टंचाईग्रस्त म्हणून. पण पाणी आणणार कोठून? तेव्हा "पाणी वाचवा', पाणी जिरवा आणि त्याचा वापर काटकसरीने करा .

No comments:

Post a Comment