Sunday, December 25, 2016

तरुणाईने विधायक संकल्प घेऊन पुढे आले पाहिजे


चार दिवसांतच नववर्षाची सुरुवात होईल. नवे वर्ष म्हणजे संकल्प, नवी सुरुवात, नवा प्रयत्न व नवा उत्साह असायला हवा. जुन्याचे जुनाटपण , कटू अनुभव विसरायला लावून नवी उमेद देण्याची प्रेरणा नवे वर्ष देते. त्यामुळे दरवर्षी नव वर्षाच्या सुरुवातीचे स्वागत करण्यासाठी तरुणाई आसुसलेली असते,परंतु या स्वागतामध्ये संकल्पापेक्षा , विधायक उपक्रमांपेक्षा गटागटाने एकत्र येऊन पार्ट्या साजर्या करण्यावरच अधिक भरवाढू लागला आहे.हे चित्र खटकणारेच आहे.
गेल्या काही दिवसांपासून नव्या वर्षाच्या तयारीसाठी सोशल मिडियांवरून प्लॅनिंगचे चॅटिंग सुरू आहे.मात्र नव्या वर्षाचे स्वागत दारु पिऊनच करावे, असे काही कोणत्या पुस्तकात, मार्गदर्शिकेत लिहून ठेवले नाही. हा काळोखाचा रस्ता आपला नाही, हे माहित असूनही तरुणाई नवीन वर्षाचे स्वागत दारुच्या पार्ट्यांनी करायचे म्हणते, हे जरा अजबच मानावे लागेल.ार्थात सरकारनेही त्यापुढे दोन पावले पुढे टाकत बार, दुकानांना नव्या वर्षाच्या सुरुवातीला जरा जास्तीचीच मोकळीक दिली आहे. त्यावरून सरकारी व्यवस्थेलाही नेमके काय सांगायचे आहे, हेही स्पष्ट होत नाही.
गेल्या काही वर्षांपासून शहरी,निमशहरी भागातच नव्हे तर ग्रामीण भागात अगदी वाड्यावस्त्यांवरही मद्याच्या बाटल्या रित्या करून नवीन वर्षाचे स्वागत होते. नशेत बेधुंद झालेली तरुणाई ध्वनिवर्धकाच्या भिंती लावून,कर्णकर्कश्श आवाजापुढे  अचकट-विचकट नृत्य करून नववर्षाचे स्वागत करते हे दुर्दैवच मानावे लागेल. त्यापुढचे काही नमुने दुचाकीच्या सायलेन्सरच्या पुंगळ्या काढून भरधाव दुचाक्या चालवून हॅपी न्यू इयर अशी हाळी देत रस्त्याने फिरतात. गाढ झोपेत असलेले ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांना नव्या वर्षाच्या पहिल्या क्षणालाच असा खडा लागणार असेल तर नव्या वर्षाबद्दल त्यांची काय मते बनतील याचा विचार कोणी करीत नाही, या वर्षी तो करावा अशी माफक अपेक्षा आहे.
राज्यात एकिकडे दररोजच्या हलाखीला, नेहमीच्या शेतीतील तोट्याला कंटाळून, पिचून गेलेल्या शेतकर्यांनी आपल्या जीवनयात्रा संपवण्याचे सत्र सुरूच ठेवले आहे. दररोज पाच-सहा आत्महत्यांच्या घटना घडतच आहेत. कदाचित आपल्या घराजवळ, गावाजवळ, तालुक्याजवळ नसेल,परंतु आपल्या राज्यातच या दुर्दैवी घटना घडत आहेत. कोणाच्या तरी घरातील आधार सहजगत्या संपतो, हे चित्र दिसत असताना खिसा रिता होईपर्यंत खर्च करून नव्या वर्षाचे स्वागत चुकीच्या पद्धतीने करण्याची चूक या वर्षी तरी तरुणाईने करू नये. नोटाबंदी याला काही प्रमाणात आळा घालील, असे वाटत असले तरी तरुणाई स्वत: हो ऊन यापासून परावृत्त झाली तर चांगलेच म्हणायला हवे. राज्यात,देशात अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत. शिक्षणापासून ते नोकर्यांपर्यंत अन शेतीतील कष्टापासून ते व्यवसायातील मंदीपर्यंत अनेक समस्या आहेत. त्याची जाणीव बाळगून आपला उत्साह कोणाच्या तरी अडचणींचा विषय बनणार नाही, याची काळजी नववर्षाचे स्वागत करणार्यांनी नक्की घ्यावी.
आपल्या नेहमीच्या कट्ट्यावर एकत्र येऊन उवा पिढीने या निमित्ताने सामाजिक जाबाबदारीचे भान ठेवत शेतकयांच्या वाढत्या आत्महत्यांबद्दल, त्यांच्या प्रश्नांबद्दल चिंतन करण्याची ही वेळ आहे. आत्महत्यांपासून शेतकर्यांना परावृत्त करण्यासाठी नेमक्या काय उपाययोजना करता येतील, त्यामध्ये आपला काय वाटा राहिल, याविषयी गटचर्चा करण्याचीही आवश्यकता आहे. गरिबांना मदत,स्वच्छतासारखी जबाबदारी उचलता ये ईल का याविषयी संकल्प करावा. ॠमाजात वाढत चाललेल्या अंधश्रद्धांना पायबंद घालण्यासाठी नव्या वर्षात युवकांची फळी उभारता ये ईल का? त्यांच्यामध्ये सामाजिक समरसतेची मशाल पेटविता ये ईल का, याविषयीही विचारमंथन करावे. अर्थात नव्या वर्षाचे स्वागत जल्लोषाने करूच नये, असा याचा अर्थ कदापि नाही. फक्त तो चुकीच्या मार्गाने न करता जो खर्च जर गावातील एखाद्या गरजु, हुशार मुलाला शैक्षणिकदृष्ट्या दत्तक घेऊन तोच खर्च शाळेकडे सुपूर्त केला,त्या विद्यार्थ्यास आवश्यक साहित्य खरेदी करून भेट देऊन केला तर तो सार्थकी लागेल. आजची युवा पिढी ही समंजस आहे, त्याहून ती नव्या विचारांना आयाम देणारी व दूरदृष्टीने विचार करणारी आहे, हे थोरांना पटवून देण्याचीही संधी यानिमित्ताने आहे.

या दिवसाच्या निमित्ताने आपले गाव, आपली वाडी-वस्ती स्वच्छ व लखलखीत करण्यानेही नवे वर्ष अधिक उत्साहाने साजरे करता येऊ शकते.गावात जलसंवर्धनासाठी एखादी उपाययोजना आखता येत असेल तर त्यामध्येही योगदान देऊन नवनिर्मितीला हातभार लावता येऊ शकेल. गावातील ओढे खोलीकरणासाठी, स्मशानभूमी सुशोभिकरणासाठी एवढेच नाही तर गावातील अंतर्गत रस्त्यांच्या सुशोभिकरणाचीही मोहिम युवकांनी हाती घ्यावी.एकदा का तरुणाईने एखादा प्रश्न हाती घेतला व त्यांचा समूह एखाद्या कामास सुरुवात करताना दिसला तर आजच्या तरुणाईकडे भरवशाने पाहात असलेली जुनी पिढी आणि आपोआपच ग्रामपंचायतीही माणसेही या कामात पुढे सरसावतील. फक्त सुरुवात झाली पाहिजे.

No comments:

Post a Comment