Monday, December 12, 2016

त्रिभुवनाचा राणा




      मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर दत्ताचा जन्म झाला. म्हणून यादिवशी दत्ताचा जमोत्सव सर्व दत्तक्षेत्रात साजरा होत आहे. पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल व सुक्ष्म रुपांत आसुरी शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. त्यांना दैत्य म्हटले जात असे. देवगणांनी त्या आसुरी शक्तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले. तेव्हा ब्रम्हदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रुपांत दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला. त्यानंतर दैत्य नष्ट झाले.
     दत्तात्रय हे विष्णूच्या चोवीस अवतारांपैकी एक मानला जातो. या भूतलावर अवतरीत होण्यास अत्रिऋषी आणि अनसूया माता हे दत्ताचे मातापिता झाले. यासंबंधी पुराणात कथा सांगतात ती अशी,अनसूया अतिशय सत्वशील, पतिव्रता स्त्री . अत्रीऋषींची पत्नी तिच्या सतीत्वाचे थोरपण देवतांपर्यंत पोहोचलेले. त्यामुळे देव स्त्रियांमध्ये असूया निर्माण झाली. त्यांनी आपले पती ब्रह्मा- विष्णू - महेश या तिन्ही देवांना अनसूयेचे सत्वहरण करण्यास अत्री ऋषींच्या आश्रमात पाठविले. ऋषी आश्रमात नव्हते. ’अतिथी देवो भवहा गृहस्थ धर्म त्यानुसार अनसूयेने अर्ध्य- पूजन केले. आणि ती भोजनाची सिद्धता करू लागली. अतिथींसाठी पात्र सिद्धता झाल्यानंतर साधूरूपातील तिन्ही देवांना आमंत्रित केलेले, पण निर्वसना होऊन भोजन वाढावे असा आग्रह. अतिथी विन्मुख जाऊ नये, याकरिता अनसूयेने ते मान्य केलेले आणि अंत:करणात पतिस्मरण करून तिन्ही देवांवर तीर्थ शिंपडले. बघतात तो काय! तिन्ही देवही झाली बाळे आणि अनसूया त्या तिन्ही बाळांना मातेच्या ममतेने घास भरवू लागली. खरोखर स्वर्गीय आनंदाचा तो क्षण.. पण इकडे लक्ष्मी, पार्वती, सावित्री प्रतीक्षेमध्ये हतबल झालेल्या. अजूनही का आले नाहीत देव? न राहवून शेवटी त्या तिघी निघाल्या अत्री ऋषींच्या आश्रमात. आणि हे काय? इथे तर ही लहान लहान बालकं दिसतायत. कुठे गेले देव? तेंव्हा ध्यानात आले हा तर अनसुयेच्या सतीत्वाचा प्रभाव. ही बाळच आहेत आपले पती. हे लक्षात येताच अंतरी खजील झाल्या त्या. तेव्हा अनसूयेने त्यास पूर्वरूप दिलेले. इतके श्रेष्ठ हे पतिव्रतेच सत्व आणि मग शिवाच्या अंशाने दुर्वास अवतरले. ब्रम्हाच्या अंशाने सोम निर्माण झाला आणि विष्णूच्या अंशाने दत्तरूप प्रतिष्ठित झालेत असे हे दत्तात्रयाचे रूप.
     दत्तात्रयाचा आश्रम सिंहाचलाजवळ प्रयागवनात असे. दत्तात्रय स्वेच्छेनुसार संचार करणारे आहे. आणि स्मर्तृगामीसुद्धा आहे. म्हणजे ज्याने स्मरण केले त्यास सत्त्वर भेटणारे, असा भाव दत्तभक्तांच्या अंतरी असतो. माहूर, पांचाळेश्वर आणि कोल्हापूर ही त्यांची विहारस्थाने आहेत. दत्तात्रयाची उपासना महाराष्ट्रात मोठया प्रमाणात करण्यात येते. नाथ आणि महानुभाव संप्रदायातही दत्तोपासना आहे. वारकरी संप्रदायातदत्तात्रेय योगियाचे श्रद्धास्थान ज्ञानेश्वरांच्या अंतरी विराजित आहे. संत एकनाथ विरचितत्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणाअशी आरती भक्तीभावाने गायिली जाते. दत्तोपासनेला संजीवन मिळालेले ते नरसिंह सरस्वतीच्या काळात. त्यांच्या महासमाधीनंतर महाराष्ट्रात दत्तोपासनेचा सर्वत्र प्रभाव वाढू लागला. दत्तोपासनेच्या सार्मथ्यामुळे साधकांना सिद्धत्व प्राप्त होते. आर्तांची दु:खे दूर करण्याचा मार्ग प्रशस्त होतो.
दत्तगुरू हा गुरूस्वरूप मानला जातो. ’ गुरुदेव दत्तहा दत्तोपासनेचा घोष आहे. दत्तात्रेय परमगुरू आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाने साधनामार्गावर विकास करता येतो. दत्त संप्रदाय सर्वसमन्वयात्मक आहे. तरीही दत्तोपासकांची अनुष्ठाने फारच कठोर असतात. सगुण साक्षात्कारासाठी ते स्वत: अति घेतात.
     या संप्रदायात मूर्तीपेक्षा पादुकांची पूजा करण्यात येते. औदुंबर, वाडी आणि गाणगापूर या दत्ताच्या क्षेत्री पादुकांचीच पूजा केली जाते. मध्यकाळात मंदिरातील मूर्तीचा विध्वंस परकीयांकडून होत असल्यामुळे हा सुरक्षिततेचा उपाय असावा.
दत्तसंप्रदायाचे तत्वज्ञान दत्तमहात्म्य, अवधुत गीता, गुरूगीता, जीवन्मुक्तगीता यामधून प्रगट झालेले आहे. गुरूचरित्र हा तर अतिशय महत्त्वाचा ग्रंथ आहे. यामध्ये संप्रदायाच्या आचारधर्माचे विवेचन आलेले आहे. दत्तसंप्रदायामध्ये मार्गशीर्षातील गुरूदत्ताच्या नवरात्रात गुरूचरित्राचे पारायण भाविक मोठया र्शद्धेने करतात. मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्तजयंती असते. असा हा दत्तराज त्रिगुणात्मक त्रिमूर्ती स्वरूपात साक्षात आहे. या त्रिभुवनाचा राणा आहे. त्यांच स्वरूपनेति नेतिम्हणून वेदांनीही जाणलेले नाही. देवादिकांना, ऋषीमुनीयोगीजनांना ध्यान लावून बसले तरी दत्तस्वरूपाचा थांग लागत नाही. अशा या दत्त देवाची आरती केल्यामुळे सर्व चिंतांचे हरण होत असते. ( श्री दत्त जयंतीनिमित्त लेख)



No comments:

Post a Comment