विष्णूदास भावे
यांनी 1843 साली सांगलीच्या भूमित सीतास्वयंवर
हे पहिले नाटक सादर केले होते. त्यामुळे सांगलीला नाट्यपंढरीचा
बहुमान मिळाला. भावे यांनी केवळ सांगलीतच नाही तर संपूर्ण जिल्ह्यात
आणि राज्यात आपल्या नाटकांचे प्रयोग केले.नगर,पुणे,बारामती तसेच झांशी,ग्वाल्हेर
या ठिकाणीही नाटकाचे प्रयोग करत सांगलीच्या मातीचा नाट्यगंध रसिकांपर्यंत पोहचवला होता.गोपीचंद हे पहिले हिंदी नाटकही त्यांनी लिहिल्यामुळे आद्य हिंदी नाटककार म्हणूनही
त्यांना संबोधले जाते. आद्य नाटककार म्हणून त्यांच्या नावाने
असलेले नाट्यगृह आजही नाट्यचळवळ जपत आहे.त्यांच्या नावाच्या पुरस्काराला
आजही संपूर्ण देशभरात मानाचे स्थान आहे. त्यांच्या नावाने पुरस्कार
दिला जातो. त्याचे पहिले मानकरी नटसम्राट बालगंधर्व होते.
त्यानंतर केशवराव दाते, आचार्य अत्रे, भालचंद्र पेंढारकर, नानासाहेब फाटक,मास्तर कृष्णराव मामा पेंडसे,दुर्गा खोटे,पु.ल.देशपांडे,ग.दि.माडगुळकर,पु.श्री.काळे, विठाबाई नारायणगावकर, प्रभाकर पणशीकर,वसंत कानेटकर, हिराबाई बडोदेकर,बापूराव माने,शरद तळवळकर,छोटा गंधर्व,दत्तोपंत भोसले,ज्योत्स्ना भोळे,माधव मनोहर,विश्राम बेडेकर, डॉ. जब्बार पटेल अशा अनेक दिग्गजांना पुरस्काराने
सन्मानित केले आहे.
संगीत नाटकाचा
सुवर्ण इतिहासही याच भूमित लिहिला गेला.सांगलीपासून अडीच मैलावर असणार्या हरिपूर
गावातील पारावर या इतिहासाची सुवर्णपाने कोरली गेली. कृष्णा आणि
वारणा नद्यांच्या संगमावर वसलेल्या या गावाला संगीत नाटकाचा इतिहास प्राप्त झाला आहे.
गोविंद बल्लाळ देवल यांना याच ठिकाणी शारदेतील गीत स्फुरले.
13 जानेवारी 1899 रोजी शारदा या संगीत नाटकाचा
प्रयोग किर्लोस्कर नाटक मंडळींनी केला. देवलांच्या या इतिहासाची
पाने आजही येथील रंगकर्मी उघडतात. आणि त्यास वंदनही करतात.
13 जानेवारी 1999 रोजी येथील देवल स्मारक मंदिरने
हरिपूरच्या त्याच पारावर शारदा नाटकाचा शताब्दी प्रयोग करून त्या स्मृतिंना आदरांजली
वाहिली. अॅड्.मधुसुदन
करमरकर यांनी त्याचे दिग्दर्शन केले होते.
स्त्री वेषभूषेत
अनेक भूमिका अजरामर केल्या,त्या नटसम्राट बालगंधर्वाचा इतिहासही रंगकर्मींना वेढ लावणारा आहे.संपूर्ण महाराष्ट्रात या कलाकराच्या गाजलेल्या भूमिकांना ,त्या इतिहासाला मानाचा मुजरा केला जातो. जोहार मायबाप
जोहार या भजनाच्या ओळी आजही आपसूक अनेकांच्या तोंडावर येतात. नारायण राजहंस हे त्यांचे मूळ नाव. मिरजेच्या ज्या नाट्यगृहात
त्यांनी अनेक ऐतिहासिक प्रयोग केले, त्या नाट्यगृहास बालगंधर्वांचेच
नाव दिले आहे.
या रत्नमालिकेत
नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर,मास्टर दीनानाथ मंगेशकर, गणपतराव मोहिते तथा
मास्टर अविनाश अशा अनेकांचा समावेश झाला. अलौकिक आवाजाची देणगी
लाभलेल्या मास्टर दीनानाथांनी आपला काळ गाजविला. सुरुवातीला त्यांनी
ताज वफा, कांटो में फूल या हिंदी-उर्दू
नाटकात संगीत भूमिका केल्या. अच्युतराव कोल्हटकरांनी त्यांना
मास्टर ही पदवी बहाल केली.त्यानंतर बलवंत नाटक मंडळी स्थापन झाली.
राम गणेश गडकरी,वीर वामनराव जोशी,स्वातंत्र्यवीर सावरकर, वासुदेवशास्त्री खरे,
विश्राम बेडेकर आदींची नाटके त्यांनी रंगमंचावर आणली. त्यांनी अनेक नाटकात स्त्री भूमिकाही साकारल्या. पुण्यप्रभाव,
भावबंधन, उग्रमंडल,रणदुंदुभी,मानापमान,संन्यस्थ खड्ग,ब्रम्हकुमारी,राजसंन्यास अशी त्यांची गाजलेली नाटके आहेत. विष्णूदास
भावे,देवल,खाडिलकर यांनी रंगभूमिचा पाया
रचला आणि ही रंगभूमि पुढे नेण्याचे काम साम्गलीतील गणपतराव मोहिते तथा मास्टर अविनाश
यांनी केले.
नाट्यचळवळींची
ही परंपरा अखंडितपणे वहात असतानाच नव्या पिढीत नाट्यलेखक,नाटककार, कलाकार,दिग्दर्शक यांनी यात मोलाचे योगदान दिले. 1970 ते
85 च्या कालखंडात रंगभूमीवर अशाच कलाकारांनी आपले अस्तित्व सिद्ध करताना
संपूर्ण राज्यभर आणि राज्याबाहेरही सांगलीचा डंका वाजविला. दिलीप
परदेशीच्या रुपाने परंपरा पुढे नेणारा एक अस्सल नाटककार सांगलीच्या रंगभूमीला मिळाला.
नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत परदेशींचे नाटक आहे का। अशी विचारणा रसिकांमधून
व्हायची. रसिकप्रेक्षकांमध्ये परदेशींच्या नाटकांची इतकी जादू
त्यावेळी निर्माण झाली होती. काळोख, अंतिम,निष्पाप,कहाणी, अस्त अशा त्यांच्या
नाटकांनी रंगभूमी गाजवली. काळोख देतं हुंकार या त्यांच्या व्यावसायिक
नाटकालाही मोठे यश लाभले.प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यावेळी त्यांची
आठ ते दहा नाटके असायची. एकांकिका स्पर्धांमध्येही तितक्याच संख्येने
एकांकिका दाखल व्हायच्या. रंगभूमी स्पर्धात्मक स्तरावर खर्या अर्थाने सक्षम करण्याचे मौलिक काम परदेशींनी केले.
आम कुलकर्णी यांनीही
रिंगण या नाटकाद्वारे नाट्यसृष्टीत आपला ठसा उमटविला. दिग्दर्शनाच्या स्तरावर चेतना वैद्य,प्रदीप पाटील,प्रकाश गडदे यांनीही रंगभूमी गाजविली.बडोदा विद्यापीठाचे नाट्यशास्त्र विभागप्रमुख म्हणून काम केलेले यशवंत केळकर
यांनी नाट्यशिबिरांद्वारे याठिकाणच्या चळवळीला तेवत ठेवले. नाटक,
संगीत नाटकाच्या परंपरेला नवी झळाळी मिळत असतानाच संगीत व अन्य पौराणिक
कार्यक्रमांनीही स्वतंत्र अस्तित्व जपले. अशोक परांजपे यांनी
इंडियन नॅशनल थिएटर ( आयएनटी) मार्फत सोंगी
रामायण चे प्रयोग केले. राष्ट्रीय स्तरावर याला मोठे यश मिळाले.पुणे,मुंबई, दिल्ली इतकेच काय तर
परदेशातही याचे प्रयोग झाले.
दरम्यान, सांगलीला माधव खाडिलकर,
आशा खाडिलकरांच्या रुपाने एक नाट्यदाम्पत्यही लाभले.सागरा प्राण तळमळला या नाटकाने चांगले यश मिळवले. शिवाजी
विद्यापीठाच्या ललित कला विभागप्रमुख भारती वैशंपायन यांचेही योगदान उल्लेखनिय मानले
जाते. श्रीनिवास शिंदगी यांनी बालनाट्यामध्ये अमूल्य योगदान दिले.
वर्षा भावे यांनीही बालनाट्याचे अनेक प्रयोग केले. त्यांनी काही नाटकांना संगीतही दिले. डॉ. दयानंद नाईक,डॉ.मधू आपटे,
रत्नाकर दिवाकर, बाबासाहेब पाटील, नाना ताडे, मुकुंद पटवर्धन, राजेंद्र
पोळ,सुनील नाईक, अरुण मिरजकर, राम कुलकर्णी, अरविंद लिमये, वामन
काळे, चंद्रकांत धामणीकर, विजय कडणे अशा
अनेकांनी ही चळवळ नुसती जिवंत ठेवली नाही,तर त्यात अनेक बदलही
केले. केवळ अभिनेता, अभिनेत्री म्हणूनच
नव्हे तर दिग्दर्शक, लेखक याचबरोबर नेपथ्यकार म्हणूनही सांगलीने
राज्यात आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर अव्वल
दर्जाचा नेपथ्यकार म्हणून सांगलीचे बाबा लिमये यांनी स्थान मिळवले होते. सांगलीचेच प्रवीण कमते यांनी चार्लीच्या जीवनावरील प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रात
तसेच दूरदर्शनवरही केले. चित्रपटांच्याबाबतीतही सांगलीने आपली
छाप सोडली. दिलीप परदेशी लिखित अंगू बाजारल जाते हा चित्रपट तसेच
सांगलीचेच आण्णासाहेब घाटगे यांनी पंढरीची वारी या चित्रपटाची निर्मिती केली.
या चित्रपटाला संपूर्ण महाराष्ट्रात मोठे यश मिळाले.
वैयक्तिक पातळीवर
सुरू असलेले हे प्रयत्न संस्थास्तरावरही चालू होते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, अखिल महाराष्ट्र
मराठी नाट्यविद्यामंदिर ,देवल स्मारक, अभिरुची,
अॅक्टिव्ह, नाट्य,
चित्रपट,कलाकार,तंत्रज्ञ
कल्याण ट्रस्ट, सस्नेह ग्रुप, मिरजेतील
नाट्यांगण आदी संस्थानींही आपली ताकद या चळवळीमागे उभी केली. मिरजेसारख्या ठिकाणी दरवर्षी नाट्यांगणने राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा भरवून
राज्यभरातील रंगकर्मींना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. देवल स्मारकने
13 जानेवारी 1999 रोजी हरिपूरच्या त्याच ऐतिहासिक
पारावर देवलांच्या शारदा या संगीत नाटकाचा ऐतिहासिक शताब्दी प्रयोग केला. हा प्रयोग भालचंद्र पेंढारकर,वि,भा.देशपांडे, मास्टर अविनाश यांच्या
साक्षीनेच नोंदला गेला. या ऐतिहासिक घटनेच्या निमित्ताने राज्यभरातील
शारदा नाटकाचा प्रयोग केलेल्या संस्थांचा सत्कारही करण्यात आला होता. देवलने 1990 ते 96 या कालावधीत
अनेक नाटकांचे प्रयोग केले. राज्य नाट्य स्पर्धेलाच नव्हे तर
दिल्लीतील स्पर्धेतही त्यांनी अनेकवेळा प्रथम क्रमांकाची बक्षिसे मिळवली. शारदा, स्वयंवर,मत्स्यगंधा,कट्यार काळजात घुसली, संशयकल्लोळ या सर्व नाटकांनी दिल्लीत
प्रथम क्रमांक मिळवित सांगलीचा झेंडा रोवला. नाट्यसृष्टीच्या
इतिहासात दिल्लीत बक्षिसांच्या सर्वच्या सर्व म्हणजेच 16 कॅटॅगिरीत
प्रथम क्रमांक मिळवण्याचा पराक्रम ययाती-देवयानी या नाटकाने केला.
दिल्लीच्या नाट्यैतिहासात याची नोंद आहे. राज्य
नाट्य स्पर्धेच्या गेल्या चाळीस वर्षाच्या इतिहासात कधीही सांगलीच्या नाटकाला प्रथम
क्रमांक मिळाला नव्हता.तोही पराक्रम 1996 ला स्वयंवर या नाटकाने केला. विक्रमावर विक्रम रचत रंगभूमीवर
सांगलीने आपले नाव कोरले.खर्या अर्थाने
ही नाट्यपंढरी आहे,हेसुद्धा वारंवार सिद्ध केले. गद्य नाटकात मधू आपटे यांच्याबरोबर अरुण नाईक, तारा भावाळकर,
शैला गाडगीळ,मुकुंद फडणीस यांनीही कर्तृत्व सिद्ध
केले.सांगलीच्या नाट्यैतिहासात सलग दहा नाट्यप्रयोग करण्याचा
विश्वविक्रमही नोंदला गेला आहे.
अनाहूत या नाट्यप्रयोगाचे 2003 मध्ये सलग चोवीस तासात दहा
प्रयोग करण्यात आले. या नाट्यपंढरीच्या आणि महाराष्ट्राच्या नाट्य
इतिहासात हा क्षण सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाईल. सांगलीत उगम
पावलेला हा नाट्यप्रवाह खळखळत ठेवण्यात हजारो रंगकर्मीचा हात असला तरी त्यांच्या या
प्रयत्नांना रसिकांनीही तितकाच सन्मान दिला.
No comments:
Post a Comment