Thursday, February 9, 2017

(बालकथा) टोपीवर टोपी


     डेरविन डीड नावाचा राजा मोठा लहरी होता. त्याने आपला विशाल राजमहाल उंच  पहाडावर बांधला होता. शहरात श्रीमंतांचे टोलेजंग वाडे होते, तर दुसर्‍या बाजूला गरिबांच्या मोडक्या-तोडक्या झोपड्या होत्या.शहरात  श्रीमंतांची संख्या कमी तर गरिबांची संख्या अधिक होती. का कुणास ठाऊक पण राजाला गरिबांचा भारी तिटकारा होता. राजा आपल्या भव्य महालाच्या गच्चीवर उभा राहून शहर न्याहाळायचा तेव्हा टोलेजंग वाडे पाहिल्यावर त्याच्या मनाला समाधान वाटायचे. आणि गरिबांच्या झोपड्यांवर दृष्टी टाकली की, त्याच्या कपाळावर आठ्या पडायच्या. रागाने पुटपुटायाचा, मूर्ख लोक, झोपड्या हटवून वाडे का बांधत नाहीत? खरे तर या प्रश्‍नाचं उत्तर स्वत: राजा डेरविनकडेच होते. त्याने मनात आणले असते, तर तसे घडू शकले असते. गरीब जनताही सुखी-समाधानी राहिली असती. परंतु, हा सल्ला लहरी राजाला कोण देणार? तशी दरबारातल्या कुणाही माणसाची हिंमत नव्हती.
     त्या झोपड्यांमध्ये एक झोपडी होती, क्यूबिंसची! तिथे बार्थ क्यूबिंस आपल्या आई-वडिलांसह राहत होता. झोपडीच्या पिछाडीस काही फळांची झाडं होती. फळे विकून कशी तरी त्या कुटुंबाची गुजराण चालली होती. 
     एक दिवस वडिलांनी क्यूबिंसला फळांनी भरलेली टोपली देऊन बाजारला पाठवले. क्यूबिंस निघाल्यावर वडील म्हणाले, फळं विकून लवकर माघारी ये.
     क्यूबिंसने डोक्यावर वडिलांची जुनी , फाटलेली टोपी घातली. टोपी छान दिसावी म्हणून त्याने एक चमकदार, रंगबिरंगी पिस त्यात खोचला होता. 
     तो बाजारात पोहचला तोचमोठ्याने बिगूल वाजला. बाजूला व्हा, रस्ता मोकळा करा. महाराजांची स्वारी येत आहे. सगळ्यांनी आपापल्या टोप्या हातात घ्या आणि राजाच्या सन्मानासाठी मुजरा अवस्थेत उभे रहा.
रस्त्यातल्या सगळ्यांनीच हुकूमानुसार आपापल्या टोप्या काढून हातात घेतल्या व सगळे मुजरा अवस्थेत उभे राहिले. फक्त त्याला अपवाद होता, क्यूबिंस! राजाचा आदेश न पाळणार्‍याला मोठा दंड ठोठावला जात असे. काही वेळातच राजाचा रथ तेथून निघाला. अचानक रथ क्यूबिंससमोर उभा राहिला. रथात बसलेला राजा  डेरविन अत्यंत क्रोधीत  होऊन क्यूबिंसकडे पाहात होता. तो ओरडला, ए पोरट्या, टोपी खाली घे आधी.
     सगळ्यांच्या नजरा क्यूबिंसवर खिळल्या. तिथे उपस्थित असलेल्या सगळ्याच नागरिकांनी टोप्या उतरवून आपल्या हातात घेतल्या होत्या. फक्त क्यूबिंसच्याच डोक्यावर टोपी होती. 
     भर बाजारात शांतता पसरली होती. आता काय घडणार, याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली. पण एका शिपायाने भाल्याच्या टोकाने क्यूबिंसची टोपी उडवली. ती खाली पडली.  पण काय आश्‍चर्य! पुन्हा क्यूबिंसच्या डोक्यावर एक टोपी दिसू लागली. शिपाई टरकला, तर उपस्थित सगळ्याच लोकांनी दृश्य पाहून तोंडात बोटे घातली. राजाचा तर तीळपापड झाला.  एक टोपी खाली पडली असताना पोराच्या डोक्यावर दुसरी टोपी आली कोठून? सार्‍यांनाच प्रश्‍न पडला.
     ए पोरट्या, डोक्यावरून टोपी काढ बघू, राजा ओरडला.
     क्यूबिंसने डोक्याला हात लावला तर डोक्यावर दुसरी टोपी! अरेच्चा! ही टोपी आली कोठून? माझी टोपी तर खाली पडलीय.   राजाच्या इशार्‍यावरून क्यूबिंसला अटक करण्यात आली. या भयंकर अपराधासाठी देहदंडाची शिक्षा होती. राजाचा रथ महालाच्या दिशेने निघून गेला.
     शिपाई  क्यूबिंसला ओढत-काढत घेऊन जाऊ लागले. पण नेताना त्याच्या डोक्यावरची टोपी काढून टाकली जात होती. पण लगेच तिथे दुसरी टोपी प्रकट होत होती. जादू म्हणायची का भानामती? शिपाई हा प्रकार पाहून पार भेदरून गेले होते. ही बातमी हा हा म्हणता संपूर्ण शहरात पसरली.
     स्वत: क्यूबिंसही या प्रकाराने चांगलाच हादरला होता. तो विचार करत होता, माझी टोपी तर शिपायाने उडविली होती, मग या दुसर्‍या टोप्या येताहेत कोठून? भूत-प्रेत, जादूटोणा तर नसेल? क्यूबिंसला दरबारात उभे करण्यात आले. इथे आणेपर्यंत हजारो टोप्या काढून फेकण्यात आल्या होत्या, तरीही क्यूबिंसच्या डोक्यावर टोपी दिसत होती. 
     तू मुलगा आहेस म्हणून तुला ही शेवटची संधी देतोय. टोपी उतवून ठेव नाही तर ... राजा ओरडला.
     क्यूबिंस हात जोडून म्हणाला, महाराज, यात माझा काहीच दोष नाही. हा  काय प्रकार चाललाय, माझे मलाच कळेना. महाराज, यातून मला सोडवा. माझा यात काहीच दोष नाही. असे म्हणून त्याने टोपी काढून फेकून दिली, पण त्याच्या डोक्यावर दुसरी टोपी हजर...!
     राजा म्हणाला, मला काही सांगू नकोस.बर्‍या बोलानं टोपी काढून फेक. मला तुझ्या डोक्यावर टोपी दिसता कामा नये.
दोघा शिपायांनी क्यूबिंसचे हात धरले. तर तिसरा  त्याच्या डोक्यावरची टोपी काढून फेकू  लागला. दरबारात टोप्यांचा खच पडला, पण क्यूबिंसच्या डोक्यावरची टोपी काही हटेना. दरबार भयभयीत झाला.
     राजाने मांत्रिकाला बोलावणे धाडले. तो धावतच आला. चुटकीसरशी समस्या सोडवतो, असे म्हणत त्याने मंत्र पुटपुटायला सुरूवात केली. जादूची काठी  गोल गोल फिरवली. आणि क्यूबिंसच्या डोक्यावरची टोपी काढून फेकून दिली. मांत्रिकाची मात्रा चाललीच नाही. टोपी क्यूबिंसच्या डोक्यावर हजर होती.  
     आता राजाच्या पायाखालची वाळू  सरकू लागली. तो वेड्यासारखा ओरडला, अरे, माझ्या राज्यात याची टोपी उतरवाणारा कोणी माय का लाल आहे का नाही? इतक्यात तिथे राजाच्या पुतण्या आला. त्याचा हातात धनुष्यबाण होता. तो म्हणाला, काका, आपण निश्‍चिंत राहा. मी तुम्हाला या अपशकुनी टोपीपासून मुक्त करीन. 
     मग त्याने क्यूबिंसला दोन खांबांमध्ये उभे केले. लक्ष्य साधून टोपीच्या दिशेने त्याने बाण सोडला.टोपी बाणासह मागे गेली. पण फरक मात्र काहीच पडला नाही. कारण क्यूबिंसच्या डोक्यावर पुन्हा टोपी दिसत होती. तो टोपीवर निशाणा साधत राहिला पण क्यूबिंसच्या डोक्यावरची टोपी काही अदृश्य झाली नाही. 
     आता मात्र राजाला वेड लागायची पाळी आली. त्याने मुकुट काढून फेकून दिला आणि  वेड्यासारखा डोक्याचे केस ओढून काही ना काही बरळू लागला. त्याची अवस्था एका मंत्र्याला पाहावली नाही. तो सल्ला देत म्हणाला, महाराज, आपण याला मृत्यूदंडाची शिक्षा सुनवावी.त्याला जल्लादच्या ताब्यात द्या. त्याचा शिरच्छेद केल्यावर टोपीचा प्रश्‍नच राहणार नाही. 
राजाला मंत्र्याचा सल्ला पटला.  लागलीच क्यूबिंसला जल्लादकडे  नेण्यात आले.जल्लादने त्याला टोपी उतरवायला सांगितली. क्यूबिंस त्याला म्हणाला, तू स्वत: का उतरवत नाहीस?
     जल्लाद पुढे सरकारला आणि त्याने त्याची टोपी काढून भिरकावून दिली. पण तशीच टोपी क्यूबिंसच्या डोक्यावर दिसू लागली. जल्लादने पुन्हा टोपी उडवली. तरीही डोक्यावर टोपी! असा प्रकार बराच वेळ चालला. पण टोपी काही डोक्यावरून हटली नाही. भूत-बीत, करणी-बिरणी असेल, या भितीने जल्लाद तेथून पळून गेला. राजाच्या आदेशाचे पालन काही झाले नाही.
शिपाई पुन्हा क्यूबिंसला घेऊन माघारी राजाकडे आले. सगळा वृत्तांत ऐकून राजाची वाचाच बंद झाली. त्याला या मुलाचे काय करायचे हा मोठा प्रश्‍न पडला. तेवढ्यात प्रधान त्याच्या कानात फुसफुसत म्हणाला, महाराज, याला उंच मनोर्‍यावरून खाली लोटून देऊ. म्हणजे सगळा प्रश्‍नच मिटून जाईल. 
     सेनापतीचा विचार राजाला पटला.तातडीने अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. शिपायांना क्यूबिंसला घेऊन शहरातल्या उंच मनोर्‍याकडे नेण्याचा आदेश दिला. शिपाई त्याला घेऊन जाऊ लागले. मागे राजा आणि त्याचे दरबारी होते. बिच्चारा क्यूबिंस!  काहीच दोष नसताना त्याला मृत्यूला सामोरे जावे लागत होते. क्यूबिंसच्या डोळ्यांतून अश्रूच्या गंगा वाहात होत्या. क्यूबिंस विचार करत होता, शेवटी त्याच्या डोक्यावर टोपीवर टोपी ठेवणारा कोण आहे
     इतक्यात एक विचित्र घटना घडली. टोपीचा रंग बदलू लागला. नवी टोपी अत्यंत आकर्षक आणि चमकदार दिसू लागली. डोळे दीपवून टाकणारा प्रकाश त्यातून बाहेर पडत होता. त्यामुळे त्याच्यासोबत चालणारे शिपाईसुद्धा चकीत झाले. राजालाही मोठे नवल वाटत होते. ज्यावेळेला क्यूबिंस मनोर्‍याच्या अगदी शिखरावर पोहचला , तेव्हा अस्ताला जाणार्‍या सूर्याच्या प्रकाशात त्याची टोपी उजळून निघाली. वाटलं की, टोपीला हिरे-माणके मढवलेली आहेत.
     क्यूबिंस आता अगदी काठावर उभा होता. राजाला वाटलं, त्याच्या त्या चमकणार्‍या टोपीपुढे आपला राजमुकुट काहीच नाही. राजाने त्याच्या आयुष्यात इतकी किंमती आणि सुंदर टोपी कधी पाहिली नव्हती.
     अचानक राजा क्यूबिंसला म्हणाला, पोरा, तुझी टोपी मला दे, याच्या बदल्यात काहीही माग.
     का नाही...  का नाही, ही घ्या महाराज. या बदल्यात मला काही नको. असे म्हणत क्यूबिंसने आपली टोपी काढली आणि राजाच्या हातात कोंबली. राजाने टोपी घातली. त्याअगोदर त्याने आपला राजमुकुट उतरवला होता. अचानक एक विलक्षण अशी घटना घडली. आता क्यूबिंसच्या डोक्यावर दुसरी कुठली टोपी  दिसली नाही. वार्‍यात त्याचे केस भूरभूर उडत होते. इतक्यात एक जोराचा हवेचा झोका आला. आणि टोपी राजाच्या डोक्यावरून उडून गेली. 
     राजा ओरडला, अरे माझी टोपी , माझी टोपी. पकडा तिला.असे म्हणत तो मनोर्‍याच्या अगदी काठाला येऊन  झुकला. तसा जोराचा वारा आला आणि त्या वार्‍यात राजाही उडून गेला.सगळे बघतच राहिले, पण राजा कुठे गेला कुणालाच समजले नाही.  हा प्रकार पाहून शिपाई, मंत्री सगळे घाबरून खाली पळाले. 
     क्यूबिंस आपल्या  जागेवर उभा राहून मोठमोठ्याने हसत होता. त्यानंतर मात्र त्याला कुणीही पाहिले नाही. तो कुठे गेला,  कुणालाच माहित नाही. पण मनोर्‍यावर मात्र मोठमोठ्यानं हसण्याचा आवाज मात्र उशिरापर्यंत घुमत राहिला. घुमत राहिला.        ( अमेरिकन लोककथा)    


No comments:

Post a Comment