Saturday, February 4, 2017

चार आण्यात अशोककुमारचं गाणं


     किशोरकुमार लहानपणापासूनच गात.त्यांच्याकडे येणार्या नातेवाईक,पाहुण्यांना ही गोष्ट माहित होती. त्यामुळे आलेली मंडळी किशोरकुमारला गाण्याचा आग्रह करायचे. मिश्किल मुडी असलेले किशोरकुमार त्यांना विचारीत,तुम्हाला किती पैशाचं गाणं ऐकायचं आहे? अर्थात पाहुणे चकीत होत. त्यावर किशोर कुमार म्हणत,तुम्हाला एक रुपयाचं गाणं ऐकायचं असेल तर हा बंदा सैगलचं गाणं ऐकविल. बारा आणे दिलात तर पंकज मलिक यांचं गाणं ऐकवतो. आणि चार आणे दिलात तर अशोककुमारचं गाणं ऐकवीन.
     किशोरकुमार यांच्या लेखी अशोककुमार यांचं गाणं चार आणे होतं. पण त्याकाळी अशोककुमार यांची गाणीदेखील लाखमोलाची होती.आजच्या पिढीला त्यांची गाणी माहित आहेत की नाही कुणास ठाऊक, पण त्याकाळी सैगल, सुरेंद्रनाथ यांच्याप्रमाणेच गायक अभिनेत्यांच्या लोकप्रियतेच्या काळात अशोककुमारच्या गाण्यांचा एक खास चाहतावर्ग होता. बंधनच्या चल चल रे नौजवान गाण्याने एका संपूर्ण पिढीला वेड लावले होते.आजच्या पिढीला त्यांच्या गाण्याबाबत फारशी कल्पना नाही. त्यामुळे त्यांना या गाण्याची कल्पना यावी आणि ज्यांना ही गाणी ठाऊक आहेत,त्यांच्यासाठी त्या काळात रमून जाण्याची संधी या गाण्याद्वारे मिळणार आहे.
     मैं बन की चिडिया बन बन बोलू रे देविकाराणीबरोबर गायलेले अशोककुमार यांचे गाणे फारच प्रसिद्ध पावले होते.कैसे करूं मुरख प्यार प्यार (अछूतकन्या 1938),मेरे दिल की दुनिया अजड गयी,भरने दे मोरे नीर(जन्मभूमी 1936) आणि मतवाले नैनोवाले ही गाणी देविकाराणीबरोबर गायली. राधा राधा प्यारी राधा,क्यों बाजे हृदय वीणा के तार लीला चिटणीसबरोबर(कंगन 1936),चलता रहे सागर भी (निर्मला 1936),फूलों उम आज मेरी नाव चली रे, हमने किसीसे सुनी कहानी, एक बात बता दो हमें गोरी लीला चिटणीससह( झूला 1942)प्यारे प्यारे सपने हमारे कोरससह, मेरे जीवन के पथ पर देविकाराणीसह ( अंजान 1941)कब तक बोलो छूपी रहोगी, रेणुकादेवीबरोबर(नया संसार 1941),नजरों की दुनिया आबाद कर(नजमा 1943) ही गाणी प्रसिद्ध पावली.

     लीला चिटणीसबरोबर चल चल रे नौजवान (बंधन 1940),रेहमत बानूबरोबर आज मौसम सलोना सलोना रे(झूला 1941), नजर कुछ आज ऐसा आ रहा है, क्या मोहब्बत का अंजाम है(नजमा 1943),मुझे मधूर लगना है वो चमकी चमकी बिजलियां हा बिजलियां( चल चल रे नौजवान 1944),कोरससह डोल रही है नैना मेरी व अमीरबाई कर्नाटकीबरोबर हर दिन है नया हर रात ( शिकारी 1946), लाज भरे इन नैंन में सखी (उत्तरा- अभिमन्यू 1946), आँंखे तो हुई बंद दर्द जागारे (1945), सपेरे बिन बजाओ रे, गीतादत्तसह (पद्मिनी 1948),रेल गाडी रेल गाडी, नाव चली नानी की नाव चली( आशीर्वाद 1968),प्रभुजी मेरे अवगुण चित ना धरो(कंगन 1972)
     या गाण्यांकडे लक्ष दिले तर असे लक्षात येईल की, अशोककुमार यांच्या गायिकीवर संगीत दिग्दर्शिका सरस्वतीदेवी यांचा पूर्ण प्रभाव होता.ही गाणीदेखील सरस्वतीदेवी यांनीच संगीतबद्ध केली आहेत.1936 साली प्रदर्शित झालेला जीवननैया हा त्यांची भूमिका असलेला पहिला चित्रपट. त्याचे संगीत दिग्दर्शनदेखील सरस्वतीदेवी यांनीच केले होते.त्यांच्या संगीत दिग्दर्शनात अशोककुमार यांनी गायिकीला सुरुवात केली, परंतु ख्याती त्यांना अछुतकन्या मधील मैं बन की चिडिया या गाण्याद्वारे मिळाली. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या गाण्याद्वाराच चित्रपटांमधील द्वंद्वगीतांना प्रारंभ झाला.

     या गाण्यांना रामचंद्र पाल( कंगन,नया संसार),पन्नालाल घोष( अंजान),रफिक गजनवी(नजमा),गुलाम हैदर( चल चल रे नौजवान,पद्मिनी),एस.एन.त्रिपाठी (उत्तरा अभिमन्यू),एस.डी.बर्मन(शिकारी),एच.पी.घोष( बेगम),वसंत देसाई( आशीर्वाद) आणि कल्याणजी आनंदजी(कंगन)या संगीतकारांनी संगीत दिले आहे.या संगीतकारांपैकी रामचंद्र पाल आणि पन्नालाल घोष सरस्वतीदेवींबरोबर बॉम्बे टॉकीजमध्ये संगीतकार म्हणून काम करत होते.एस.एन. त्रिपाठी त्याच काळात सरस्वतीदेवीचे सहाय्यक होते. अछूतकन्यामध्ये अशोककुमारने गायलेले ऐसा करता मूरख प्यार प्यार ची संगीतरचना एस.एन.त्रिपाठी यांनीच केली होती. ते स्वत: संगीतकार बनल्यानंतर उत्तरा अभिमन्यू या एकाच चित्रपटात अशोककुमार गायले. एस.डी.बर्मन यांनी संगीत कारकिर्दीची सुरुवातच शिकारी या चित्रपटातील अशोककुमार यांच्या गाण्यातून झाली. 1936 ते 1949 चा काळ अशोककुमार यांच्या गायिकीचा होता. या काळात गाऊ न शकणार्या देविकाराणी,लीला चिटणीस, रेणुकादेवीबरोबर अशोककुमार गायले. मात्र पार्श्वगायनाचे युग सुरू होताच अमिरबाई कर्नाटकी (किस्मत,शिकारी),ललिता देऊळकर(साजन),गीतादत्त(पद्मिनी)सारख्या पार्श्वगायिकांबरोबरही त्यांनी गाणी गायिली. 1948 नंतर गायन सोडले मात्र 1968 साली आलेल्या आशीर्वाद चित्रपटात वसंत देसाई यांनी त्यांना रेलगाडी गायला लावले. सचीनदा बर्मन यांना हे गाणे फार आवडायचे. धीरे धीरे आ रे बादल(किस्मत-अमीरबाई कर्नाटकी), बाबू अजी बाबू गले में तेरे चाँद चमकता आणि मैं हूं जयपूर की बंजारन(साजन), मुझे जो खिलाते है पान मैं मिरची (नजमा) आदी गाणी लोकप्रिय ठरली होती.त्या काळात सात हजार रुपये रॉयल्टी रुपाने त्यांना मिळाले होते.

No comments:

Post a Comment