संस्थानकाळात जे
काही फायदे होते,त्यातीलच महत्त्वाचा फायदा म्हणजे लोककल्याणकारी राजांनी केलेल्या शैक्षणिक
सोयी. शैक्षणिक सोयी असलेल्या साम्गली जिल्ह्यातील जत हे असेच
एक नावाजलेले संस्थान होते. ब्रिटिशांनी 1886 साली या भागात सार्वजनिक वाचनालय सुरू केले. शताब्दी
ओलांडणारे सांगली जिल्ह्यातले जत वाचनालय हे दुसरे वाचनालय. सांगलीतील
नगरवाचनालयापाठोपाठ या वाचनालयाचा क्रमांक लागतो. आज या वाचनालयाच्या
स्थापनेला 130 वर्षे उलटून गेले आहेत. त्यादृष्टीने
या संस्थेचा इतिहास उदबोधक ठरावा. सुरुवातीपासून याचा संस्थानचे
कारभारी रावबहाद्दूर रामचंद्र मुळे,ग.कृ.सोहनी,एम.एन.कटकटी गुरुजी,डी.एन.प्रधान यांनी 1939 पर्यंत या वाचनालयाचा कारभार सांभाळला.
जत संस्थानचे शिक्षणमंत्री श्रीमंत अजितसिंहराव डफळे( भाऊसाहेब महाराज) व कै. उदयसिंह
डफळे यांचा वरदहस्तही वाचनालयास होताच. 3 जानेवारी
1892 ला मराठी शाळेत बैठक होऊन त्यामध्ये वाचनालयाचा कारभार कमिटीच्या
हातात सोपवण्यात आला. 1885 ला कोळश्याच्या गाडीतून जतला
2 दैनिक येत होती. 1902 ला 3 दैनिके तर भारत देश स्वतंत्र होत असताना दैनिकांची संख्या 8 तर साप्ताहिकांची संख्या 7 झाली.
अशा तर्हेने भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा
संक्रमण काळ पाहणार्या जत वाचनालयास लोक मान्यता लाभल्याने ते
हळूहळू बाळसे धरू लागले. वाचकांकडून तक्रारीची सुरुवात
29 ऑगस्ट 1897 ला झाली. त्या
दिवशी एका वाचकाने वर्गणी बाबत तक्रार नोंदवली.1910 साली जत वाचनालयास
प्रथम पगारी सेवक नेमण्यात आला.1932 च्या प्लेगच्या साथीत वाचनालय
6 महिने बंद ठेवण्यात आले.वाचनालयात महिला वाचकांसाठी
पुस्तकांची सोय 1940 साली झाली.
लोकांकडून निवडून
गेलेले प्रथम लोकनियुक्त अध्यक्ष आनंदराव उर्फ बाबूराव खानविलकर हे होते.1040 ला 50 व्या वाढदिवसाचे प्रमुख पाहुणे सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयाचे तर्कशास्त्राचे
प्रा. डी.डी.वाडेकर
होते.संस्थान विलिनीकरणापूर्वी याला नेटीव्ह लायब्ररी म्हणत असत.
पण 1948 साली या संस्थेचे जत वाचनालय असे नामकरण
झाले. 1950 साली संस्थेस शासनाकडून तालुका वाचनालय अशी अधिकृत
मान्यता मिळाली.
वाचनालयाच्या विकासात
कै.रामभाऊ बोर्गीकर(वकील), डी.जी.दुगाणी आणि के.बी.पोतनीस
(वकील) यांचाही महत्त्वाचा वाटा आहे. वाचनालयास असलेली जागेची अडचण लक्षात घेऊन जतच्या थोरल्या वेशीजवळ एक भव्य
आणि प्रशस्त इमारत उभी करण्यात आली.1975 मध्ये जत वाचनालयाने
शताब्दी महोत्सव साजरा केला. याचवेळी बर्याच खटपटीनंतर वाचनालयाची जागा परत मिळाल्याने तत्कालिन पाटबंधारे मंत्री वसंतदादा
पाटील यांच्या हस्ते इमारतीचा कोनशिला समारंभ पार पडला. अल्पावधीतच सुसज्ज वास्तू उभी
राहिली.पुस्तक देवघेव,मुक्तवाचनालय आणि
स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी अभ्यासवर्ग अशी तीन दालने उभी राहिली.कवी सुधांशु, शिवाजी सावंत,ना.स.इनामदार,डॉ.विठ्ठल वाघ,शंकर पाटील या सारस्वतांचे पाय या वाचनालयाला
लागले आहेत.
जत वाचनालयाने
वाचन चळवळ पुढे नेण्याचा वसा तसाच सुरू ठेवला आहे. या वाचनालयात दुर्मिळ ग्रंथांबरोबरच दुर्मिख वृत्तपत्रांचा संग्रहही
जपून ठेवला आहे. अधूनमधून त्यांचे प्रदर्शनही भरवले जाते.ब वर्गातील संस्थेचे 500 हून अधिक सभासद आहेत.
आजमितीस 14 वृत्तपत्रे वाचनालयात येतात.
9 साप्ताहिके,17 मासिके वाचनालयात उपलध असतात.27
हजाराहून अधिक पुस्तके,ग्रंथ वाचनालयात आहेत.
वाचनालयाची सुरवात कोठे झाली व जुन्या इमारतीचा फोटो प्रसिद्ध झाला असता तर अधिक माहिती मिळाली असती.
ReplyDelete