Thursday, February 9, 2017

(बालकथा) गुलाबाचे फूल


     राजूच्या वाढदिवसाला आजोबांनी त्याला एक गुलाबाचे रोप दिले. ते दोघांनी मिळून   एका कुंडीत लावले. राजूने त्याला पाणी घातले. राजू  रोज बाल्कनीत जाऊन रोप पाहायचा आणि आजोबांना पुसायचा,  '' आजोबा, फुलं कधी लागणार हो?''
     ''लागतील- लागतील रे, बाळा! थोडा धीर धर. हे  रोप हळूहळू मोठे होते. मग त्याला फुलं लागतात. ''
     ''राजू ऽऽऽ... !'' मम्मीची जोराची हाक आल्यावर राजू पळाला.
     अलिकडे राजू फारच व्यस्त दिसू लागला. दुसर्‍या टर्मची परीक्षा तोंडावर आली होती. आता तर त्याला आजोबांच्या खोलीत डोकावून पाहायलादेखील सवड नव्हती. इकडे आजोबांचा खोकला वाढत चालला  होता.तर  मम्मीने त्याच्यावर अभ्यासाचा चांगलाच दवाब टाकला  होता.
     आजोबांच्या खोलीसमोरून जाताना त्यांच्या नजरेला नजर भिडायची, पण परीक्षेचे ध्यान आले की, राजू आपोआप पुढे सरकायचा. 
     एक दिवस तो शाळेतून आल्यावर त्याला बाल्कनीतल्या गुलाबाला फूल लागल्याचे दिसले. त्याला कोण  आनंद झाला. धावतच तो बाल्कनीत गेला. कुंडीतल्या रोपाला लालचुटूक फूल उमलेलं होतं. त्याच्या अंगात उत्साह संचारला. कोणाला सांगू कसं सांगू, असे त्याला झाले. तो धावतच आजोबांच्या खोलीत शिरला आणि म्हणाला, '' आजोबा आजोबा , बघा गुलाबाला किती मस्त... '' पण पलंग रिकामा दिसल्यावर बाकीचे शब्द ओठातच विरले. 
     ''चल, कपडे बदल आणि जेऊन घे. '' मम्मीचा आवाज कानांवर पडला. 
     ''आजोबा कोठे आहेत? '' त्याने विचारले.
     '' त्यांना बाबांनी हॉस्पिटलमध्ये नेलंय.'' मम्मीने उत्तर दिले.
     आज राजूचं मन उदास होतं. झोपदेखील उशिरानं आली.तो   सलग चार-पाच दिवस  रोज बाल्कनीत जाऊ लागला. फूल न्याहाळायचा.  हळूवारपणे त्याला स्पर्श करायचा. त्याला त्यात फार  आनंद वाटायचा. गुलाबाला आता चार-पाच कळ्यादेखील दिसू लागल्या. पाचव्या दिवशी राजू शाळेतून आल्यावर बाल्कनीत गेला.तेव्हा त्याच्या छोट्याशा जीवाला धक्काच बसला. फूल तुटून खाली फरशीवर  विखुरले होते.. 
     राजूचं मन आज फारच  बैचेन होतं. मध्यरात्र झाली तरी त्याला झोप आली नाही. पण ज्यावेळेला त्याला झोप आली, तेव्हा स्वप्नात तुटून पडलेल्या गुलाबाच्या पाकळ्या उडून त्याच्यासमोर फेर धरून नाचू लागल्या. त्याने हात पुढे केला आणि पाकळ्या त्याच्या हातात अलगद  आल्या. एक पाकळी मोठी झाली. त्याला दोन डोळे आले. मग मोठमोठे अश्रू  गाळू लागली. 
     '' राजू, आता तू आम्हाला दिसणार नाहीस. कारण आता आमच्यात ना गंध आहे, ना रंग. आम्ही सुकून गेलो आहोत. '' आणि पाकळी  हमसून हमसून रडू लागली.
     '' अरे,... ''  राजू घाबरून उठून बसला. स्वत: शीच म्हणाला, ''अरे, हे तर स्वप्न! '' 
आज सकाळी तो कसनुसं चेहरा करीतच  शाळेला गेला.  शाळेतून आला तेव्हा त्याला आजोबांचा दरवाजा उघडा असल्याचे दिसले.
     '' आजोबा...! '' तो पळतच गेला आणि आजोबांना गच्च मोठी मारली. आजोबांचा हिरमुसलेला चेहरा  आनंदाने खुलला. 
     ''राजू! ''आजोबांचा कमजोर आवाज आनंदाने थरथरत होता.
     ''आजोबा, कुंडीतल्या गुलाबाला  फुलं उमलली होती. ''
     ''खरंच! '' 
     ''पण सुक ली आणि  तुटून खाली पडली. '' राजू नाराजीने म्हणाला.
     '' अरे,मग काय झालं, दुसरे फूल येईल. '' आजोबा त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले.
   '' खरच! '' राजूला कळ्या आठवल्या. तो अगदी उड्या मारतच बाल्कनीत गेला. आणि आनंदाने  चित्कारला, ''  आहा!   किती किती फुल!ं'' तेवढ्यात कुंडीत तुटलेल्या फुलांच्या काही पाकळ्या पडलेल्या दिसल्या. फरशीवर पडलेल्या पाकळ्या  नोकरानीने कचर्‍यात फेकल्या होत्या. राजूने कुंडीत पडलेल्या पाकळ्या उचलल्या आणि त्या ओठाने चुमल्या. त्या आपल्या पुस्तकात ठेवून आजोबांकडे गेला. 
     चार दिवसांनी त्याचा वाढदिवस होता. आईने त्याला अगदी प्रेमाने विचारले, ङ्ग तुला वाढदिवसाला काय हवंय?''  मम्मीच्या  गळ्यात हात टाकत लाडिकपणाने म्हणाला, '' मम्मी, रोज संध्याकाळी आजोबांसोबत दोन तास खेळणार मग अभ्यास करणार. बस्स! मला हीच भेट हवी आहे.''
     मम्मी  अवाक होऊन पाहात  राहिली. राजूच्या  शब्दांनी  आजोबांच्या कानांमध्ये  मधाचा गोडवा भरला.
     मम्मी  राजूला म्हणाली, '' हो, बेटा! ''
    ''पण हां, एक लक्षात ठेव,  परीक्षेची चांगल्याप्रकारे तयारी कर  आणि मला फुल्ल मार्क घेऊन दाखव. ''

No comments:

Post a Comment