Thursday, February 9, 2017

वडिलांची शिकवण

(बालकथा )

     फार वर्षांपूर्वी चंदनगड राज्यात सूर्यसेन नावाचा एक धनाढ्य शेतकरी राहत होता. त्याची किती तरी हेक्टर जमीन होती. किती तरी माणसे त्याच्याकडे चाकरीला होती. त्याला दोन मुले होती. थोरला प्रवीणसेन मोठा आळशी होता, तर धाकटा आर्यसेन मेहनती. सूर्यसेन थोरल्या मुलामुळे  चिंतेत होता.तो त्याला खूप समजावून सांगायचा, परंतु त्याच्यावर काही एक परिणाम व्हायचा नाही. सूर्यसेनने त्याला सुधारण्यासाठी एक योजना आखली. त्याने सगळी जमीन आणि चाकर दोन्ही मुलांना समसमान वाटून दिले. राहायलादेखील वेगवेगळी घरे दिली. प्रवीणसेन आळशी असल्याने तो शेतावर कधी जायचा नाही. फक्त त्याची माणसेच शेतावर जाऊन काम करायची. मालक शेताकडे फिरकत नसल्याने चाकर माणसे मनमानी कारभार करू लागली. साहजिकच याचा परिणाम असा झाला की, हळूहळू पीक उत्पन्नात घट येऊ लागली. प्रवीणसेनला आता गरिबीत दिवस काढावे लागले. धाकटा मुलगा आर्यसेन भल्या पहाटे उठायचा. शेतावर जायचा. आपल्या चाकर लोकांबरोबर काम करायचा. त्याचे कष्ट पाहून चाकर माणसेदेखील दिवस-रात्र काम करायची. 

     शेतातली सगळी कामे वेळच्यावेळी व्हायची. आर्यसेन शेतात नवनीन प्रयोग राबवायचा. अधिक काम करणार्‍या चाकरांना बक्षिसी द्यायचा. त्यामुळे त्यांना आणखी हुरूप यायचा. ती आपलेच शेत आहे, अशा भावनेने शेतात राबत. सगळ्या प्रकारची काळजी घेत.साहजिकच याचा परिणाम पीक उत्पन्नात व्हायचा. पीक भरघोस  येऊ लागलं. धनधान्याने त्याचे घर भरून जाऊ लागले. काही दिवसातच तो  पहिल्याहीपेक्षा अधिक मोठा श्रीमंत शेतकरी बनला.  
     एके दिवशी सूर्यसेनने दोघा मुलांना बोलावून घेतले. त्यांची ख्यालीखुशाली विचारली. मोठा म्हणाला, आपण माझ्यावर अन्याय केला आहे. आपण आर्यसेनला माझ्यापेक्षा अधिक चांगली पिकाऊ जमीन दिली आहे. त्यामुळेच त्याचे उत्पन्न भरघोस येते आहे आणि माझे कमी. याचा परिणाम मी दिवसेंदिवस गरीब होत चाललो आहे.
     सूर्यसेन म्हणाला, मी दोघांनाही समान पिकाऊ जमीन  दिली होती आणि तेच तुमचे भाग्य होते. त्याने मन लावून मेहनत केली. तू मात्र आळस केलास. तुझ्या माणसांच्या जीवावर जगलास. त्यांनी मनमानी केली. त्यामुळे तुझे उत्पन्न घटत गेले. उलट तुझा धाकटा भाऊ त्याच्या माणसांबरोबर काम करीत राहिला. त्याची काळजी घेत राहिला.आणि त्याचे उत्पन्न वाढले. 
     वडिलांच्या बोलण्यावर त्याचे डोळे उघडले. त्याला गरिबीचे कारण समजले. आता तो आपल्या माणसांसोबत शेतात काम करू लागला. 


No comments:

Post a Comment