Sunday, February 19, 2017

शेखर नाईकला नोकरीची प्रतीक्षा


     वयाच्या अकराव्या वर्षी शेखर नाईक पहिलीत दाखल झाला. तेव्हापासून तो क्रिकेट खेळू लागला होता. त्याच्या शाळेसाठी शेखर राज्यस्तरापर्यंत खेळला आहे. पण हे सगळं वाटतं तितकं सोपं नव्हतं. कारण तो जन्मापासूनच अंध आहे.कर्नाटकातील शिमोगासारख्या एका छोट्याशा जिल्ह्यात जन्मलेल्या शेखरच्या कुटुंबात हा अनुवंशिक आजार आहे. त्याचे मित्र त्याला त्याच्या नेत्रहिनतेमुळे चिडवायचे.तो खचून जायचा, पण अशा अडचणीच्या वेळी आई त्याच्यासोबत राहिली आणि त्याला धीर देत राहिली.
     2000 साली शेखरने एका क्रिकेट स्पर्धेत केवळ 46 चेंडूत 136 धावा काढून सगळ्यांनाच आश्चर्यात टाकले. साहजिकच त्याला कर्नाटक संघात प्रवेश मिळाला. यानंतर मात्र सगळे मार्ग त्याच्यासाठी खुले झाले.  2012 मध्ये टी-20 विश्वचषक स्पर्धेत शेखर भारताच्या ब्लाइंड सघाचा कर्णधार बनला. आणि त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धा जिंकली. भारत आणि पाकिस्तानचा ब्लाइंड सामनादेखील नेहमीच्या सामन्यासारखा रोमांचकारी होतो. क्रिकेटने शेखरचे आयुष्यच बदलून टाकले. अंध क्रिकेटमुळेच त्याला पद्मश्री पुरस्काराचा सन्मान मिळाला आहेयामुळेच त्याला क्रिकेटमध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली.
     बीसीसीआयकडून नेत्रहीन क्रिकेटसाठी त्याला मोठी आशा आहे. ब्लाइंड क्रिकेटला भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने मान्यता देण्याची गरज आहे. या संघाने दोन वेळा विश्वचषक पटकावला आहे. मुलेदेखील चांगला खेळ दाखवत आहेत. ब्लाइंड क्रिकेटपटूंसाठीदेखील अन्य क्रिकेटपटूंसारख्या सुविधा मिळण्याची आवश्यकता आहे.सध्या शेखर एका गैरसरकारी संघटनेशी जोडला गेला आहे. यासाठी त्याला महिन्याकाठी 20 हजार रुपये मिळतात. शेखरला एका नोकरीची आवश्यकता आहे. भारतीय क्रिकेट संघाला जितकं डो़क्यावर घेतलं जातं,तितकं महिला क्रिकेट,नेत्रहिन आणि अपंग क्रिकेटकडे लक्ष दिलं जात नाही. नव्हे याकडे साधे ढुंकूनही पाहिले जात नाही.

पद्मश्री पुरस्कारासाठी निवड झालेल्या एखाद्या व्यक्तीला नोकरीची कशी काय आवश्यकता असते, असे वाटत असले तरी ते सत्य आहे. शेखरच्याबाबतीत असेच काहीसे घडले आहे. भारतीय क्रिकेटचा कर्णधार विराट कोहलीसोबतच त्याचाही पद्मश्री पुरस्काराने गौरव केला जाणार आहे. आज जरी शेखर नोकरीच्या प्रतीक्षेत असला तरी उद्याच्या नेत्रहीन क्रिकेटसाठी त्याची काही तरी करण्याची इच्छा आहे. ब्लाइंड क्रिकेटपटूंचा शोध आणि त्यांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे काम करण्याचा त्याचा मनोदय आहे.

No comments:

Post a Comment