सांगली जिल्ह्याला
लोकांसाठी धडपडणार्या आणि आपले कर्तृत्व सिद्ध करणार्या नेत्यांची मोठी
परंपरा आहे. जिल्ह्याच्या राजकारणात संघर्ष करून विलासराव जगताप,
सुरेश खाडे, शिवाजीराव नाईक, अनिल बाबर, खासदार संजयकाका पाटील ही मंडळी पुढे आली आहेत. आजच्या घडीला सांगली जिल्ह्याची धुरा या मंडळींकडे आली आहे. मात्र त्यांना अजूनही संघर्षच करावा लागणार आहे. आपले
कर्तृत्व त्यांनी सिद्ध केले असले तरी काम करण्याची संधी मिळणे आवश्यक आहे.
मंत्रीपद यासाठी जिल्ह्याला आवश्यक आहे. यातूनच
त्यांच्या कामाचा ठसा उठून दिसणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी जिल्हा परिषद ताब्यात घ्या,तुम्हाला मंत्रीपदाची
संधी देतो, असे वचन दिले होते. नुकत्याच
झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजपने दैदिप्यमान
कामगिरी करत सत्ता हासिल केली आहे. या यशात या सगळ्या मंडळींचा
मोठा हातभार लागला आहे.त्यामुळे मंत्रिपदाची माळ कुणाच्या आणि
किती जणांच्या गळ्यात पडणार, हे आता पाहावे लागणार आहे.
जनतेची सुख-दु:खे जाणणार्या राजकीय नेत्यांची सांगली जिल्ह्यास परंपरा आहे. महाराष्ट्राचे
चार वेळा मुख्यमंत्रीपद भूषविणारे वसंतदादा पाटील,पूर्वभागाच्या
प्रश्नांसाठी सातत्याने अग्रेसर असलेले बॅ. जी.डी.पाटील,दुष्काळग्रस्त भागासाठी झटणारे राजारामबापू पाटील आणि सहकाराच्या क्षेत्रात
ठसा उमटवणारे गुलाबराव पाटील व विष्णूअण्णा पाटील असे नेतृत्व सांगली जिल्ह्याला लाभले.हे सर्व नेते कष्टातून पुढे आलेले होते. गरिबांची दु:खे त्यांना माहित होती.जिल्ह्याच्या विकासासाठी नेमके
काय करायला हवे,हे त्यांना माहित होते. अनेक मंत्रीपदे सहजगत्या सांभाळणारे शिवाजीराव देशमुख आणि माजी ग्रामीण विकासमंत्री
अण्णासाहेब डांगे यांनीही दादा आणि बापूंचीच परंपरा सांभाळली. अलिकडेचे नेते डॉ.पतंगराव कदम,जयंतराव
पाटील, अजितराव घोरपडे, (कै.) आर. आर. पाटील,शिवाजीराव नाईक यांनाही मंत्रीपदे मिळाली.त्यांनीही आपापल्या
कारकीर्दीत स्वत:चा वेगळा ठसा उमटवला.
सांगलीनजिकच्या
पद्माळे या छोट्याशा गावातून वसंतदादा पाटील यांचे नेतृत्व पुढे आले. तासगाव तालुका काँग्रेस समितीचे
सचिव म्हणून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. आमदार,
प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष,पाटबंधारेमंत्री आणि
मुख्यमंत्री अशा यशाच्या
एकेक पायर्या चढत गेलेल्या दादांसमोर गरीब व कष्टाळू शेतकरी
होता. त्यांना कोरडवाहू शेतकर्यांची दु:खे माहित होती. कारण त्यांनी ते जीवन जवळून अनुभवले होते.
त्यामुळेच कोरडवाहू शेतकर्यांना बारमाही पाण्याच्या
सोयी उपलब्ध करून देण्यावर त्यांनी सतत भर दिला.
दादांनी विनाअनुदानित
अभियांत्रिकी महाविद्यालयांची संकल्पना प्रत्यक्षात आणून सामान्य शेतकर्यांच्या मुलांना उच्च शिक्षणाची
संधी उपलब्ध करून दिली. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी दुष्काळग्रस्त
पूर्व भागातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने
ताकारी आणि म्हैसाळ पाणी योजनांना चालना दिली.गुलाबराव पाटील
यांनी सहकारी क्षेत्राला तत्त्वज्ञान दिले.सहकारी बँकिंगच्या
माध्यमातून त्यांनी जिल्ह्यातील फळबागायतीला चालना दिली. सहकार
प्रशिक्षणासारख्या सोयी कार्यकर्त्यांना कायमस्वरुपी उपलब्ध करून दिल्या.
राजारामबापू पाटील
यांच्याकडेही गरिबांचे नेते म्हणूनच पाहिले जाते. त्यांनीही मंत्रिपदे सांभाळताना सामान्य जनतेच्या हिताचे अनेक
निर्णय राबवले.दुष्काळग्रस्त अशा पूर्व भागातील लोकांचे संघटन
त्यांनी सर्वप्रथम केले. परिणामी पाण्याच्या प्रश्नाबाबत जागृती झाली. ताकारी व म्हैसाळ योजनांना त्यामुळे
मूर्त स्वरुप आले.
आमदार विलासराव
देशमुख हे वसंतदादांचे अनुयायी. शिराळा मतदारसंघातून राजकारणात प्रवेश करताना त्यांनीही खूप संघर्ष करावा लागला
होता. दादांचा त्यांच्यावर विश्वास होता.
स्वता:च्या मंत्रिमंडळातच गृहराज्यमंत्री म्हणून
दादांनी श्री.देशमुख यांच्यावर जबाबदारी सोपवली.त्यानंतर पाटबंधारे, माहिती,विधीमंडळ
कामकाज अशी अनेक मंत्रिपदे त्यांनी सांभाळली. प्रदेश काँग्रेसचे
अध्यक्ष म्हणून ते काम करीत होते,तेव्हा त्यांचे नाव नेतृत्वाच्या
स्पर्धेत घेतले जात होते. विधीमंडळात सरकारची बाजू अतिशय प्रभावी;पण संयमाने मांडणारे मंत्री म्हणून त्यांचा लौकिक होता.
युतीच्या काळात
श्री. डांगे यांनी ग्रामीण विकास आणि
पाणीपुरवठा खाते गतीने चालवले.साडेचार वर्षात अनेक पाणीयोजना
त्यांनी आखल्या आणि प्रत्यक्षात आणल्या.मंत्री म्हणून संपूर्ण
प्रशासनावर वचक कसा ठेवायचा, याचे प्रशिक्षणच त्यांच्याकडून घ्यावे,
असा त्यांचा दरारा होता.युतीच्या काळात ताकारी
व म्हैसाळ या जुन्या योजनांना गती आली आणि टेंभूसारख्या नव्या योजनेची मुहूर्तमेढ रोवली
गेली.त्या मागे श्री. डांगे यांचीच दूरदृष्टी
होती. सध्याच्या घडीला ते राजकारणात सक्रीय नसले तरी त्यांच्या
मार्गदर्शनाखाली सुतगिरण्यासारख्या संस्था उत्तमप्रकारे चालवल्या जात आहेत.
युतीच्या काळात
मंत्रीपद भूषविलेले आमदार शिवाजीराव देशमुख यांनीही आपल्या कामाचा ठसा उमटला आहे. याअगोदर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष
असतानाही त्यांनी सांगली जिल्हा परिषदेचा डंका पार दिल्लीपर्यंत वाजवला.सत्ता नसली की, प्रवाहातून काही प्रमाणात मागे खेचले
जातात, तसे नाईक यांचे झाले होते,पण आता
पुन्हा त्यांना चांगली संधी प्राप्त झाली आहे. मंत्रीपदाच्या
रेसमधले नाईक नक्कीच आपल्या कामाचा ठसा उमठवतील.
नव्या पिढीतील
डॉ.पतंगराव कदम यांचा शैक्षणिक आणि
सहकार क्षेत्रातला प्रवास थक्क करणारा आहे. कडेगाव तालुक्यातील
सोनसळ या छोट्याशा गावातून श्री. कदम यांचे नेतृत्व पुढे आले.शिक्षणाची कोणतीही परंपरा नसलेला आणि एका लहानशा खेड्यातील एखादा जिद्दी तरुण
केवढी भव्य स्वप्ने पाहतो व ती प्रत्यक्षात आणतो, हे पतंगरावांनी
त्यांच्या कर्तृत्वाने सिद्ध केले आहे.
पुण्यासारख्या
विद्यानगरीत जाऊन डॉ.कदम यांनी सदाशिव पेठेतील एका छोट्याशा खोलीत भारती विद्यापीठाची स्थापना केली.
त्यावेळी विशीतील तरुणाच्या या साहसाकदे काहीशा उपहासानेच पाहिले गेले;मात्र हातात घेतलेले काम अर्धवट सोडायचे नाही, अशी त्यांची
जिद्द. त्यामुळे भारती विद्यापीठाने यशाची एकेक शिखरे सर केली.दिल्लीतही या विद्यापीठाने स्वत:चा ठसा उमटवला.
आता विदेशातही जाण्याचे स्वप्न फारसे दूर नाही. शिक्षणक्षेत्रातच डॉ.कदम थांबले नाहीत.त्यांनी सहकार आणि राजकारणातही स्वत:चा ठसा उमटवला.
पाटबंधारे, शिक्षण,उद्योग
आणि वनमंत्री म्हणून त्यांची धडाकेबाज कामगिरी लक्षात राहणारी आहे. मुख्यमंत्रीपदाची त्यांना सातत्याने हुलकावणी मिळत राहिली. सध्या तरी ही त्यांची महत्त्वाकांक्षा पूर्ण होण्यासारखी नाही. मात्र त्यांना त्याची सल वाटत नाही. त्यांच्यावर कुठली
कामगिरी सोपवा,ती ते मोठ्या नेटाने पुढे नेणार आणि आपला त्यात
ठसा उमटवणार, असा स्वभाव आहे.
अंजनी या तासगाव
तालुक्यातील छोट्याशा गावातून राज्यस्तरावरच्या राजकारणात पोहचलेले आर. आर. आबा पाटील
यांचा प्रवासदेखील थक्क करणारा आहे.कुठलाही राजकीय वारसा नसताना
स्वत:च्या कर्तृत्वावर त्यांनी ग्रामविकासमंत्री,उपमुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारली. ग्रामीण जीवनाशी
नाळ जोडली असल्याने त्यांच्या अनेक योजना यशस्वी झाल्या. जिल्हा
परिषदेचा सदस्य,लक्षवेधी आमदार, कल्पक ग्रामविकासमंत्री
आणि उपमुख्यमंत्री अशा यशाच्या एकेक पायर्या त्यांनी पादाक्रांत
केल्या.मात्र त्यांचे स्वत:च्या आरोग्याकडे
होत असलेले दुर्लक्ष त्यांच्याच जीववार उठले. आज त्यांची महाराष्ट्राला
गरज होती, मात्र आता ते नाहीत, याची खंत
सार्यांनाच आहे.दादा घराण्याचा वारसा लाभलेले
आणि काही काळ मंत्रीपद भूषवलेले मदन पाटील यांचीही ऐन उमेदीतील एक्झिट चटका लावणारी
आहे.त्यांचा कार्यकर्त्यांचा गोतावळा मोठा होता. सांगली महापालिका क्षेत्रात त्यांचे काम जाणवण्यासारखे होते. सांगली जिल्ह्यातले दोन मोठे मोहरे ऐन तारुण्यात गळाले,यात जिल्ह्याचे नक्कीच मोठे नुकसान झाले.
ग्रामविकासमंत्री, अर्थमंत्री अशी महत्त्वाची राज्य
शासनाची खाती सांभाळलेल्या जयंत पाटील यांना राजारामबापू पाटील यांचा राजकीय वारसा
लाभला आहे.मात्र त्यांनी स्वत:चेही चौफेर
कर्तृत्व सिद्ध केले आहे. ते अभियंते आहेत.उच्चविद्याविभूषित असले तरी त्यांना शेतकर्यांच्या बांधावरचे
प्रश्न माहीत आहेत. कारण त्यांनी त्यांचा
जवळून अभ्यास केला आहे. राजारामबापू यांच्या निधनानंतर साखर कारखान्याचे
अध्यक्ष म्हणून जयंत पाटील राजकारण आणि सामाजिक क्षेत्रात आले. कारखाना,दूध संघ, सुतगिरण्या,बँक, अभियांतिकी महाविद्यालय अशा विविध क्षेत्रात त्यांची
कामगिरी उत्तमप्रकारे सुरू आहे.प्रत्येक संस्था उत्त्मरित्या
चालवण्यावर त्यांनी कटाक्ष ठेवला आहे.
कवठेमहांकाळ तालुक्यातले
अजितराव घोरपडे यांनाही मंत्रिपदाच्या कारकीर्दीत चांगली कामगिरी आहे. आर. आर.
पाटील यांच्यामुळे त्यांना अलिकडच्या काही काळात चार पावले मागे सरायला
लागले होते. मात्र त्यांची ग्रामीण भागातील पकड मजबूत आहे.
महांकाली साखर कारखान्याचे अध्यक्ष विजय सगरे यांचीही कामगिरी वाखाणण्यासारखी
होती. दुष्काळी टापूत कारखाना असतानाही त्यांनी तो उत्तमप्रकारे
चालवला होता.यांचेही ऐन उमेदीतील निधन चटका लावणारे आहे.
सांगली जिल्ह्याला सातत्याने मंत्रीपदे
मिळाली आहेत. यापूर्वीच्या युतीच्या काळातदेखील जिल्ह्याला मंत्रिपदे
मिळाली होती. त्या संधीचे सोनेदेखील केले गेले. मात्र याखेपेच्या युतीच्या काळात सांगली जिल्ह्याला मंत्रिपदाची हुलकावणी मिळाली
आहे. कर्तृत्व असूनही संधी न मिळाल्याने त्याचे सोने करता येईना,
अशी आज परिस्थिती आहे.मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेत
बहुमोल कामगिरी करत भाजप आमदारांनी पक्षाला मोठी उभारी दिली आहे. सांगली जिल्ह्याच्या इतिहासात भाजपला कधीही जिल्हा परिषदेत पाय ठेवता आला नव्हता,
मात्र यंदा प्रथमच ही संधी मिळाली आहे. शिवाय निम्म्यापेक्षा
जास्त पंचायत समितीवरदेखील भाजपचा झेंडा फडकला आहे. यानिमित्ताने
जिल्ह्याच्या राजकारणात नव्या दमाच्या तरुणांना संधी मिळाली आहे. राजकीय समिकरणेही बदलली आहेत. त्यामुळे संधीचे सोने कोण
कसा करतो आणि आपले कर्तृत्व सिद्ध करतो, हे आता पाहावे लागणार
आहे.
सांगली जिल्ह्याचे
अनेक प्रश्न मार्गी लागण्याचे
बाकी आहेत.वीज,पाणी आणि रस्ते या मूलभूत
गरजा अजूनही पेंडिंग आहेत. जिल्ह्यातला निम्मा भाग दुष्काळी आहे.
तिथे रोजगार उपलब्ध नाही. स्थलांतराचा प्रश्न मोठा आहे. कृष्णाकाठच्या शेतकर्यांच्या समस्याही वेगळ्या आहेत. सांगली,मिरजसह तालुक्यातल्या ठिकाणच्या शहरांचेही प्रश्न प्रलंबित
आहेत.जिल्ह्यातल्या पूर्वभागात मोठे उद्योगधंदे नाहीत.
या भागात रेल्वेची आवश्यकता आहे. गेल्या साठ-पासष्ट वर्षात या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत.सांगली,जत आदी ठिकाणच्या विभाजनाचा प्रश्नही प्रलंबित आहे.या प्रश्नांची सोडवनूक होण्याची गरज आहे.राज्य सरकारच्या माध्यमातून हे प्रश्न तडीस नेण्याची
गरज आहे.
No comments:
Post a Comment