Monday, February 27, 2017

शेततळ्यामुळे जलसमृध्दी


      अनियमित पर्जन्यमानावर मात करण्यासाठी शेततळे फायद्याचे ठरले आहे. पिकांना योग्य वेळी पाणी देण्याबरोबरच मत्स्य व्यवसायासारखा जोड व्यवसायही करुन आपल्या उत्पन्नात भर घालता आली आहे. कृषि विभागाच्या वतीने शेतकर्‍यांना वरदान ठरणारे शेततळे करण्यासाठी योजना कार्यान्वित असून याचा संपूर्ण खर्च शासन करते. परभणी जिल्हयात अनियमित पर्जन्यमान असल्यामुळे पाण्याअभावी अनेक भागातील पिके वाळून जातात. यावर मात करण्यासाठी ज्या शेतकर्‍यांनी शेततळे घेतले त्यांच्या शेतीतून मोठय़ा प्रमाणावर उत्पन्न निघाले आहे.  शेततळ्याचे दोन प्रकार असून राष्ट्रीय फलोत्पादन योजनेअंतर्गत शेतकर्‍यांना संयुक्तरित्या तसेच राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत वैयक्तिक स्वरुपावर शेततळे घेता येतात. महाराष्ट्र शासनाने जलयुक्त शिवार हे अभिनव अभियान सुरू केले आहे. त्या अंतर्गत मागेल त्याला शेततळे ही योजना अमलात आणली आहे. या शेततळ्यामुळे जलसमृध्दीस मदत होणार आहे.

     सर्वसाधारणपणे ३० मीटर रुंद, ३० मीटर लांब व ३ मीटर खोलीचे शेततळे घेण्यात येते. यासाठी शासनाच्या वतीने ८२ हजार २६० रुपयांचे अनुदान देण्यात येते. प्रारंभी शेतकर्‍यांनी स्वत:च्या खर्चातून हे शेततळे पूर्ण करावयाचे आहे. शेततळे पूर्ण झाल्यानंतर कृषि विभागाच्या वतीने पाहणी करुन अनुदान धनादेशाद्वारे देण्यात येते. लहान शेतकर्‍यांनी संयुक्तरित्या या शेततळ्याचा लाभ घेतल्यास त्यांच्या जीवनात खर्‍या अर्थाने क्रांती घडेल. शासनाच्या पाणलोट क्षेत्र विकास योजनेखाली जलसंधारणाच्या विविध उपायांचा अवलंब केला जातो. यामध्ये नालाबांध, सिमेंट बांध, पाझरतलाव, कोल्हापुरी पध्दतीचे बंधारे यांचा समावेश आहे. या कामांमुळे त्या परिसरातीलच शेतकर्यांना लाभ मिळत असे. मात्र शेततळ्यामुळे शेतकर्यांना वैयक्तिक लाभ घेता येतो. राज्यातील बर्याचशा कोरडवाहू जमिनी काळ्या मातीच्या आहेत. पडणार्या पावसाचे पाणी हे मोठ्या प्रमाणात जमिनीवरुन वाहते. हे पाणी अडवून, साठवून आणि नंतर गरजेच्या वेळी वापरणे हे शेततळ्याच्या माध्यमातून शक्य आहे.
     शेत जमिनीतून वाहात जाणारे पाणी अडचणीच्या वेळी पिकास उपलब्ध होण्याच्या दृष्टीने खोदलेल्या तळ्यास शेततळे म्हणतात. शेतात तळे करुन भुपृष्ठावरुन वाहात जाणारे पाणी त्यात साठवून त्याचा उपयोग जलसिंचनासाठी करता येऊ शकतो. पावसाच्या अनियमितपणामुळे जेव्हा पावसाअभावी पिकास ताण पडतो अशा वेळी तळ्यात साठविलेल्या पाण्यामधून एखादे-दुसरे पाणी पिकास देता आल्यास पीक हमखास येते.
     शेतात उपलब्ध असलेल्या खोलगट भागात योग्य आकाराचे शेततळे करता येते. शेततळ्याची जागा निवडतांना पाण्याच्या प्रवाहाच्या मार्गावर निवडू नये कारण अशी जागा निवडल्यास तळी गाळाने लवकर भरतात. त्यामुळे शेततळी प्रवाहाच्या बाजूला थोड्या अंतरावर खोदावीत. शेततळी दोन प्रकारची असतात. एक म्हणजे खोदून खड्डा तयार करणे व दुसरे म्हणजे नाल्यात आडवा बांध टाकून पाणी अडवून तयार केलेला तलाव. शेततळ्याचे आकारमान पावसाच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. शेततळ्यातील पाण्याचा पाझर कमी करण्यासाठी शेततळ्यास अस्तरीकरण करणे गरजेचे आहे. पाणी देताना ते केव्हा व कसे द्यावे तसेच किती प्रमाणात द्यावे याही गोष्टीचा विचार करावा, त्यामुळे जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली येईल

     शेततळ्याचे पाणी शक्यतो नगदी पिके तसेच फळबागांसाठी वापरावे यामुळे निश्चित उत्पादन मिळून आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरु शकते. शेततळ्यामुळे शेतकर्यांना स्वत:च्या शेतात पाणीसाठा निर्माण करणे, शेतात पाणी मुरवणे व पिकांस संरक्षित पाणी देणे शक्य होते. संयुक्त शेततळे घेण्यासाठी ८ ते १० शेतकरी एकत्र आल्यास जमिनीची वरची बाजू लक्षात घेऊन त्या ठिकाणी ४४ मीटर रुंद, ४४ मीटर लांब आणि ५.२ मीटर उंची असलेले शेततळे सामुहिकरित्या घेण्यात येते. शेततळ्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होत असल्याने जलसमृध्दीच्या दिशेने नेणार्या शेततळ्याचा मार्ग निवडणे योग्य ठरेल. या योजनेचा लाभ शेतकर्यांनी जास्तीत जास्त घ्यायला हवा. तरच जलयुक्त शिवार योजनेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शेततळ्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणारी आहे.  जीवनदायिनी शेततळ्याचा लाभ घेऊन शेतकर्‍यांनी आर्थिकदृष्टय़ा सक्षम होण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे.



No comments:

Post a Comment