Sunday, February 12, 2017

(लघुकथा) वडिलांचा फोटो


प्रा. डॉ. शिवाजीरावांचं शहरात नाव होतं. कलेक्टर स्वत: कधी मधी यायचे, त्यांच्या निवासस्थानी.पार्टीबिर्टी व्हायची. प्राध्यापकांचे वडील शेतकरी होते, जवळच्या गावात.गावात एकटेच राहात. प्राध्यापकांकडे कधी कधी येत-जात.एक दिवस कलेक्टर, प्राचार्य आणि परिचित लोक प्राध्यापकांच्या बंगल्यात पार्टीला आले. त्यांनी आपल्या शेतकरी वडिलांची ओळख गावातला शेतकरी अशी करून दिली. शहरात उपचाराला आला आहे, असेही सांगून टाकले.

नशिबाचा खेळ, आणखी काय? वडील आजारी पडले. उपचारात हलगर्जीपणा झाला. आणि शेवटी स्वर्गवाशी झाले.
प्रश्न वडिलांच्या जमिनीचा होता.शिवाजीराव त्यांचा एकुलता एक मुलगा. बहिणींना त्यांचा हक्क द्यायला त्यांनी  नकार दिला. जमिनीवर मालकी हक्क मिळवण्यासाठी त्यांनी खालच्या पातळीवर प्रयत्न केले. तलाठी, तहसीलदार यांच्या कार्यालयाचे उंबरठे झिझवले. पण काही देण्या-घेण्याच्या गोष्टी झाल्या नाहीत, त्यामुळे जमीन काही त्यांच्या मालकीची झाली नाही.
ते एक दिवस थेट कलेक्टरसाहेबांकडे गेले. आणि आपली व्यथा मांडली.''वडिलांचे जाणे-येणे होते का?''कलेक्टरांनी विचारले.
शिवाजीराव चपापले. कसं सांगू? त्यादिवशी गावातला शेतकरी म्हणून ज्यांची ओळख करून दिली, तेच आपले वडील आहेत.
कलेक्टरसाहेबांनी वडिलांचा फोटो आणि आवश्यक ती कागदपत्रं घेऊन यायला सांगितलं. आयएएस अधिकारी पक्के कावेबाज आणि सूक्ष्म दृष्टीचे असतात. फोटो पाहून जिल्हाधिकारी किंचित हसले. म्हणाले,''तुमच्या बंगल्यात आलेल्या या शेतकर्याची तब्यैत आता कशी आहे?'' प्राध्यापकांसाठी हा डोस पुरेसा होता.
कलेक्टर साहेबांनी तहसीलदारांना हवे ते आदेश फोनवरून दिले. प्राध्यापकांना म्हणाले,''अशाप्रकारचे केसेस येत असतात आमच्याकडे... तुमचं काम झालं की सांगा मला.'' पुढे म्हणाले,'' यावेळी पार्टी गावातल्या शेतातच होऊ दे. तेवढाच चेंज...''
जमिनीचा मालक बनल्यावर प्रा. शिवाजीरावांनी ऑफिसरांसाठी गावातल्या शेतात पार्टी दिली. पण शेतकरी वडिलांचा फोटो मात्र  एका पतर्याच्या पेटीतच राहिला.


No comments:

Post a Comment