Sunday, February 12, 2017

अ‍ॅक्टिव असो वा पॅसिव धूम्रपान डेंजरच!

  डिसेंबर 2011 मध्ये 55 वय वर्षाच्या आणि पेशाने शिक्षिका असलेल्या मालतीबाईंनी सतत येणार्या खोकल्याविषयी आपल्या कौटुंबिक डॉक्टरांकडे सल्ला घेतला. त्यांनाही त्यांचा खोकला का कमी येत नाही, असा प्रश्न होताच, कारण त्यांनी अनेक औषधे दिली होती, परंतु गुण काही येत नव्हता. शेवटी त्यांनीही मग छातीचा एक्स-रे काढण्याचा सल्ला दिला. जो रिपोर्ट आला, तो मात्र सगळ्यांनाच मोठा धक्का देऊन गेला. मालतीबाईंना फुफ्फुसांचा कॅन्सर झाला होता. ''मी आयुष्यात कधी सिगरेटीला हात लावला नाही'', असं त्या स्फुट स्फुट रडून वारंवार सांगत होत्या. परंतु, त्यांचे पती विद्याधर आपल्या 35 वर्षाच्या वैवाहिक जीवनात रोज दीड- दोन  पाकिट सिगरेटस फस्त करायचे.  वास्तव असं की, मालतीबाईंच्या शरीरात या वैवाहिक जीवन कालावधीत पॅसिव स्मोकरच्या  रुपाने  मोठ्या प्रमाणात धूर जात होता. डाग्नोसिसनंतर कालांतराने मालतीबाईंच्या फुफ्फुसाचा बराचसा भाग काढून टाकण्यात आला होता. पण मालतीबाईंचे कॅन्सर विशेषतज्ज्ञ म्हणून असलेले डॉक्टर हेही खात्रीने सांगू शकत नव्हते, की मालतीबाईंना कॅन्सर कशामुळे झाला तो. मात्र विज्ञानाच्या अलिकडच्या सेंकड हँड स्मोकबाबतीत आलेल्या नव्या संशोधनांतर आपण  नक्कीच तंबाकूच्या पॅसिव स्मोकिंगमुळे मालतीबाईंना कॅन्सर झाला, असे ठामपणाने म्हणू शकतो.   पॅसिव स्मोकिंग अथवा सेकंड हँड स्मोकचा अर्थ आहे, धूम्रपान करणार्या माणसाच्या व्यक्तीचा धूर जवळ बसणार्या अथवा सोबत प्रवास करणार्या माणसाच्या शरीरात प्रवेश करणे.मात्र सानिध्यात असलेला तो माणूस  स्वत: धूम्रपान करत नाही.

पॅसिव स्मोकिंगचा धोका
     धूम्रपान करणे सोडल्यास आणि त्याच्यावर योग्य ते उपचार केल्यास धूम्रपानाने होणारे मृत्यू रोखता येऊ शकतात. मात्र अलिकडच्या काळात झालेल्या  संशोधनांमुळे प्रत्यक्ष धूम्रपान करणार्यापेक्षा त्याचा धूर घेणार्याला त्याचा अधिक धोका आहे, सिद्ध झाले आहे. कारण उपचार करताना सुरुवातीला त्याच्यावर उपचार कोणत्या प्रकारे करावे, हे डॉक्टरांनाही कळत नाही. आठ देशातल्या 24 रिसर्च प्रोजेक्टांची समिक्षा केल्यानंतर अमेरिकेतल्या एनवॉयरमेंटल प्रोटेक्शन एजन्सीने सेंकड हँड स्मोकिंगला ' ग्रुप ए कार्सिनिजिन ' घोषित केले आहे. यात  एक असा पदार्थ आहे, ज्याच्यामुळे माणसाला निश्चित स्वरुपात कॅन्सर होतो. ईपीएच्या रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, पर्यावरणातल्या  तंबाकूच्या धुरामुळे (ईटीएस- एनवॉयरमेंटल तंबाकू स्मोकदरवर्षी हजारो गैरस्मोकरदेखील फुफ्फुसाच्या आजाराने मृत्यूमुखी पडतात. यात मुलांची संख्या अधिक आहे. अलिकडच्या संशोधनानुसार ईटीएसचा संबंध हृदयरोगसरवायकल कॅन्सर आणि सायनस कॅन्सरशीही  आहे.
     एखादी  धूम्रपान न करणारी व्यक्ती पर्यावरणात पसरलेल्या सिगरेटच्या धुराची शिकार झाल्यास  त्या  व्यक्तीच्या शरीरात श्वासाद्वारे  पोहचलेला निकोटीन कोटीनाइनमध्ये बदलतो. या रसायनाचे मोजमाप आपल्याला रक्त आणि लघवीच्या तपासणीने करता येऊ शकते. या तपासणीमुळे आपल्याला जाणवो अथवा न जाणवो, पण सगळ्याप्रकारच्या तंबाकूचा धूर आपण आपल्या श्वासावाटे आपल्या शरीरात घेत असतो, हे समजते. एका पाहणीनुसार   धूम्रपान न करणार्या 663 लोकांच्या  लघवीमध्ये कोटीनाईन आढळून आलं  आहेवातावरणातल्या या तंबाकूच्या धुरामुळे होणारा धोका  सिगरेट कंपन्या या आतापर्यंत नाकारत होत्या. पण या वैज्ञानिक  साक्षीपुराव्यामुळे सिगरेट कंपन्यांचेही याकडे लक्ष वेधले गेले आहे. आता या कंपन्या  धूम्रपान करणार्या व्यक्तीला असा आग्रह धरायला लावताहेत की,   त्याच्या  शेजारी असणार्या लोकांना 'सिगरेट ओढण्याबाबत आपली काही हरकत नाही ना?'  विचारा. मग सिगरेट ओढा. धुराचा त्रास इतरांना अधिक होतो, हे जाणून  आपल्या भारताबरोबरच अनेक देशांमध्ये सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान ओढण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. अर्थात या  प्रतिबंधाची काटेकोरपणाने अंमलबाजवणी होत नाही, हा भाग अलहिदा असला तरी अनेक देशांनी पॅसिव स्मोकिंग या धूम्रपानाचा प्रकाराला  मोठ्या गांभिर्याने घेतले आहे.
मुलांसाठी जीवघेणा
     वातावरणातल्या तंबाकूच्या धुरापासून वृद्ध मंडळींना तर स्वत:चा बचाव करता येत नाहीच, परंतु मुलांसाठीदेखील तो जवळजवळ अशक्य झाला आहे. भारतातल्या 90 टक्के घरांमध्ये कमीत कमी एक स्मोकर आहेच. तो दिवसभर हवेत तंबाकूचा धूर सोडत असतो. त्याच घरात पाच वर्षांपेक्षा कमी वर्षांची मुलंही असतात. या वयातल्या मुलांमध्ये अविकसित रेसपिरेटरी सिस्टम किंवा प्रतिकारक  क्षमता फारच कमी असते. त्यांच्यामध्ये  अशा  प्रकारच्या विषारी धुरापासून स्वत:चा बचाव करण्याची क्षमता कोठून येणारत्यामुळेच स्मोकरांची मुलं आपल्या जीवनाच्या पहिल्या वर्षीच ब्रोंकाइटिस निमोनियाला सामोरे जातात. ही समस्या सिगरेट न पिणार्या व्यक्तीच्या मुलांमध्ये नसते.स्मोकरांच्या मुलांमध्ये कानांचे आजार, खोकला, दमा आदीच्याही तक्रारी असतात. पर्यावरणातल्या तंबाकूच्या धुर्यामुळे होणारे दुष्परिणाम केवळ लहान वयापर्यंत मर्यादित नसतात तर त्याची किंमत पुढेदेखील चुकती करावी लागते. ' येल विद्यापीठाच्या स्कूल ऑफ मेडिसीन'  अभ्यासानुसार स्मोकरांच्या घरात वाढणार्या मुलांना पुढे वयस्क काळात फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याची शक्यता  नो स्मोकरच्या घरातल्या मुलापेक्षा  दुप्पट असते, असे म्हटले आहे.   आणि घरात एकापेक्षा अधिक स्मोकर असेलतर मग आणखी काही बोलायची सोयच नाही. ब्रिटिश मेडिकल रिसर्च क़ोन्सिलद्वारे केलेल्या अभ्यासानुसार 11 ते 16 वयोगटातली मुलं वर्षात 150 सिगरेटींएवढा धूर आपल्या शरीरात ओढून घेत असतात.
धुरातल्या रसायनांचा समावेश
     तंबाकूचा धूर वास्तविक ऐरोसोलसारख्या कीटकनाशक स्प्रे किंवा रूम  डिओडोरायजरसारखा आहे. यात अदृश्य पदार्थ हवेत मिसळतात. या घातक मिश्रणात जवळपास 4000 रासायनिक घटक असतात. शास्त्रज्ञांच्या मतानुसार यातल्या फक्त 47 घटकांचीच माहिती उपलब्ध होऊ शकली आहे. आणि या घटकांमुळेच  कॅन्सर होतो. धूम्रपान न करणारे दोन वेगवेगळ्या जातीचा धूर आपल्या शरीरात घेत असतात. पहिला जो धूर आहे, तो धूम्रपान करणार्या माणसाच्या फुफ्फुसातून आलेला असतो. आणि दुसरा धूर जो असतो, तो प्रत्यक्ष सिगरेट जळताना निघालेला असतो. बहुतांश शास्त्रज्ञ जळत्या सिगरेटचा धूर अधिक हानिकारक असतो, असे सांगतात. कारण दुसर्या व्यक्तिच्या फुफ्फुसातून आलेला धूर फिल्टर होऊन बाहेर आलेला असतो. शिवाय फुफ्फुसातून बाहेर आलेला धूर हा एका सिगरेटमागे साधारण दहा वेळा आलेला असतो. तर प्रत्यक्ष जळत असलेल्या सिगरेटमधून निघणारा धूर पाच ते दहा मिनिटांपर्यंत सतत निघत राहतो. हा धूर सिगरेट संपे अथवा विझवेपर्यंत निघत असतो. जर व्यक्ती घरात सिगरेट ओढत असेल तर घरातही हा धूर उशिरापर्यंत (किमान तासभररेंगाळत असतो. यातल्या विषारी कार्बन मोनोऑक्साईडमुळे जीव गुदमरायला होते. हायड्रोजन सायनाईड हे आणखी एक सिगरेटमधून निघणारे विषारी रसायन मृत्यूदंड देताना वापरतात. फॉर्मल्डीहाइड आणि निकोटीन तर घातक कीटकनाशक आहेत. त्यामुळेच बहुदा हार्वर्ड विद्यापीठाने एका अभ्यासानुसार एसबेस्ट, आर्सिनिक आणि रेडियोएक्टिविटीपेक्षा तंबाकूतून निघणारा धूर अधिक घातक असल्याचे म्हटले आहे.
प्रयत्न निष्फळ
      सरकारने  धूम्रपान प्रतिबंधासाठी  अनेक कायदे केले आहेत. यासाठी दूरचित्रवाणी मालिकांमध्ये किंवा चित्रपटांमधल्या धूम्रपान करणार्या दृश्यांवर बंदी आणण्याचा प्रयत्न केला, पण चित्रपट उद्योगाने त्याला कडाडून विरोध केला. आता असे दृश्य जर मालिकेत अथवा चित्रपटात दाखवायचे असेल तर त्यावेळेला वैधानिक इशारा देणारी वाक्ये खाली टाकली जातात. शिवाय देशपातळीवर सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास प्रतिबंध आहेच, परंतु त्याचीही अंमलबजावणी परिणामकारकपणे होताना दिसत नाही.भारतात जागतिक आरोग्य संघटनेच्या मतानुसार 120 मिलियन स्मोकर आहेत. म्हणजे जगातल्या 12 टक्के स्मोकर एकट्या भारतात आहेत. 2009 पर्यंत भारतात दरवर्षी जवळपास 9 लाख लोकांचा मृत्यू धूम्रपानामुळे होत असतो.
स्वत:पासून करायला  हवी सुरुवात
     आता प्रश्न असा पडतो की आपले घर आणि आपल्या कुटुंबाची  याच्यापासून कशी सुटका करायची?   धूम्रपानविरोधी अभियान आपल्याला आपल्या घरापासूनच चालवायला हवे. तरच यातून आपली सुटका होणार आहे. जनजाग़ृती करण्यासाठी आपण स्वत: पुढे आले पाहिजे. काही पुढे येत आहेत. त्यात आपलाही सहभाग असायला हवा. या अभियानाशी जोडलेली माणसं आता आपल्या घरावर पाट्या लिहू लागले  आहेत.' या, एका धूररहित घरात आपले स्वागत आहे.' आणि जर आपण बस किंवा रेल्वेने प्रवास करत असाल तर सिगरेट ओढणार्या आपल्या सहकारी प्रवाशाला आवश्य सांगा, की ' माफ करा, पण या सिगरेटच्या धुरामुळे मी आजारी पडू शकतो.शिवाय सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास प्रतिबंध आहे.'इतके सांगितल्यावर बहुतेक स्मोकर सिगरेट विझवतात.शिवाय यामुळे सिगरेट न ओढणार्या इतरांनादेखील  बोलण्याचे धैर्य येईल. आणि जर एवढे सांगूनही ती व्यक्ती सिगरेट ओढण्याचे थांबत नसेल तर पोलिसांत रिपोर्ट करण्यास कचरू नका. पोलिस आपली जबाबदारी पूर्ण करत नसतील तर आपल्या त्याचीदेखील तक्रार करता येते.                              



No comments:

Post a Comment