Monday, February 6, 2017

शेतकर्‍यांच्या मदतीसाठी भुंगरूचा अविष्कार


     अहमदाबाद येथील एक उद्योगपती बिप्लब केतन पॉल यांनी भुंगरू प्रकल्पाद्वारा 14 हजार शेतकर्यांची 40 हजाराहून अधिक एकर जमीन हिरवीगार करून टाकली आहे.उजाड जमिनीचे रुपांतर पिकाऊ जमिनीत केले आहे. बिप्लब एक उद्योजक आहेत,पण समाजसेवकही आहेत. सतरा-आठरा वर्षांपासून ते या मोहिमेला लागले आहेत. भुंगरू तंत्रज्ञानाद्वारा त्यांनी जलसंधारणाच्या दिशेने मोठं काम केलं आहे.
सुरुवातीला हे भुंगरू तंत्रज्ञान घेऊन ते शेतकर्यांमध्ये गेले तेव्हा लोकांनी त्यांना अक्षरश: वेढ्यात काढले. ते हे मानायला तयारच नव्हते की, जमिनीला ड्रील मारून पाण्याचे संधारण केले जाऊ शकते.पण आज देशभरातल्या हजारो शेतकर्यांना या तंत्रज्ञानाचा फायदा झाला आहे.ज्या क्षेत्रात सिंचनाद्वारा पाणी मिळवणं एक स्वप्न होतं,तिथे भुंगरू तंत्रज्ञान वरदान ठरलं आहे.या तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी हवी ती पिकं घेऊ लागला आहे.त्यामुळे त्यांच्या आयुष्याला मोठी कलाटणी मिळाली आहे.आर्थिक उन्नती झाली आहे.


     बिप्लब केतन पॉल यांचे पश्चिम बंगालमधील हुगली शहरातल्या एका साधारण मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये पालनपोषण झाले. त्यांच्या आई म्हणत की, असे काही करून दाखव की, ज्याच्याने समाजाचे भले व्हावे.बंगालमध्ये राहिल्याने त्यांनी पूर अगदी जवळून अनुभवला होता.पाहिला होता. त्यांनी पाहिलं होतं की, पुरामुळे सर्वाधिक नुकसान गरिबांचेच होते.कारण पुरामुळे त्यांच्या जमिनीपासून घरापर्यंत सगळं काही उद्वस्त होते.त्यांना अशा शेतकर्यांना मदत करावं वाटायचं की, जे आपले पोट भरण्यासाठी कठीण मेहनत घेतात. सुरुवातीचे शिक्षण घेतल्यानंतर 1994 मध्ये ते एन्वायरमेंट एज्युकेशनशी संबंधित कोर्ससाठी गुजरातला आले.त्यावेळेला गुजरातमधल्या काही प्रदेशात दुष्काळ पडला होता. 2001 मध्ये प्रलयकारी भुंकपानंतर तर गुजरातची परिस्थिती आणखीनच बिकट बनली होती. दुष्काळ,पूर आणि भूकंप अशी नैसर्गिक संकटे त्यांनी जवळून पाहिली होती.त्यामुळे ते समजून चुकले की, पर्यावरणाशी ताळमेळ राखूनच प्रगतीचे मार्ग शोधावे लागतील.त्यामुळे त्यांनी अशा तंत्रज्ञानाचा अविष्कार केला की, ज्याच्याने फक्त दुष्काळाशीच सामना करता येणार नाही तर पुराचा प्रभावदेखील कमी केला जाऊ शकतो.या तंत्रज्ञानाद्वारा पावसाचे पाणी पाईपाच्या सहाय्याने जमिनीच्या आत साठवता येते आणि नंतर त्या पाण्याचा शेतीसाठी उपयोग करता येतो. या तंत्रज्ञानाचे नाव आहे भुंगरू. पाईपाला स्थानिक भाषेत भुंगरू म्हणतात. भुंगरू तंत्रज्ञानासाठी सर्वात प्रथम जमिनीचे निरीक्षण केले जाते. नंतर त्या परिसरातील पाण्याची गुणवत्ता कशी आहे,हे तपासले जाते.पावसाच्या पाण्याचा प्रवाह कोणत्या दिशेने आहे आणि जमिनीत पावसाचे पाणी किती काळ साठून राहू शकते, याचाही अंदाज घेतला जातो. शिवाय याचीही माहिती करून घेतली जाते की, त्या क्षेत्रातील शेतकरी कोणकोणती पिके घेतात आणि त्यांना शेतीसाठी किती पाण्याची आवश्यकता आहे. यानंतर जमिनीला ड्रील मारून त्यात पाईप सोडली जाते. फिल्टर केलेले पावसाचे पाणी पाईपाच्या सहाय्याने साठवले जाते.पावसाचे पाणी जमा झाल्यानंतर त्याचा सिंचनासाठी उपयोग केला जातो. भुंगरूचे 17 प्रकार आहेत. जमिनीच्या प्रकारानुसार भुंगरूची किंमतही वेगवेगळी आहे.      भुंगरूच्या सहाय्याने 10 लाख लीटरपासून ते 10 कोटी लीटरपर्यंत पाण्याची साठवण केली जाऊ शकते. 2000 मध्ये गुजरातमधील पाटण जिल्ह्यातून या तंत्रज्ञानाच्या वापराला सुरूवात झाली. या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने एका गावातील वीस शेतकरी आपली तीस एकर जमीन कित्येक वर्षांपर्यंत सिंचनाखाली आणू शकतात.गुजरात आणि महाराष्ट्र राज्यातील सुमारे एक लाखापेक्षा अधिक शेतकर्यांनी या तंत्रज्ञानाचा लाभ घेतला आहे. कमीत कमी नऊ ते तेरा लाख रुपये आणि जास्तीतजास्त 32 लाख रुपये खर्चात भुंगरू प्रोजेक्ट राबवता येऊ शकतो. भुंगरूची उपयोगिता लक्षात घेऊन आता सरकारदेखील मदतीसाठी पुढे आले आहे. गरीब शेतकर्यांकडून याचा पैसा घेतला जात नाही. छोट्या शेतकर्यांना कमीतकमी पैशांत भुंगरू प्रकल्प बसवून दिला जातो. 

No comments:

Post a Comment