अन्न,वस्त्र आणि निवारा या मानवाच्या
मूलभूत गरजा आहेत. त्यातील वस्त्र ही गरज म्हणून महत्त्वाची.कापसापासून धागा आणि त्यापासून कापड व तयार कपडे असा देशाच्या सहकार क्षेत्रातील
पहिला पथदर्शी प्रकल्प देण्याची किमया पाच जिल्ह्यातल्या भूमिपूत्रांची. अशा या वस्त्रोद्योग निर्मितीच्या क्षेत्रातही जिल्ह्याने देशपातळीवरही आपली
नाममुद्रा ठसठशीतपणे कोरली आहे.यात सांगली जिल्हासुद्धा आघाडीवर
आहे. वस्त्रोद्योगाची परंपरा तशी शंभर वर्षाहून अधिक वर्षांची
आहे. विटा आणि सांगली ही नगरे त्याकाळात वस्त्रोद्योग निर्मितीची
जननी म्हणायला हवी.
एकोणीसाव्या शतकाच्या
सुरुवातीला कोष्टी समाजबांधव आपला परंपरागत विणकामाचा व्यवसाय करीत होते. 1950 पर्यंतच्या 50 वर्षाच्या काळात डवरी मागावर लुगडी या प्रकारच्या साड्यांचे उत्पादन घेतले
जायचे. त्यानंतर हातमागाची निर्मिती होऊन मानवी कौशल्याला चालना
देणारी गती या व्यवसायाला आली. हात व पायाने चालवल्या जाणार्या या मागावर लुगडी,रंगीत साड्यांचे उत्पादन घेतले जात
होते. विटाबरोबरच सांगलीचे राजे पटवर्धन यांनी उद्योगरत्न ही
उपाधी देऊन गौरविलेल्या दादासाहेब वेलणकर यांनी 1914 च्या सुमारास
सांगलीच्या गजानन मळ्यात 18 मागांचा कारखाना सुरू करून सांगलीच्या
औद्योगिक विकासाच्या स्वप्नांची पहाट फुलवली होती. त्यांनीही
आपल्या खडतर परिश्रमातून साड्यांच्या उत्पादनाला सुरुवात केली होती. त्यांनी आपल्या बुद्धीकौशल्याने लुगडी या ग्रामीण कापडाचा बाज बदलून त्याला
साडीचे रुप दिले. त्यांची ही संकल्पना त्याकाळच्या बाजारात चांगलीच
रुजली. याचदरम्यान हातमागामध्ये क्रांती घडून विजेवर चालणार्या यंत्रमागाच्या निर्मितीचे तंत्र विकसित झाले. त्यावर
ताबडतोब उद्योगधुरीण असणार्या दादासाहेबांनी यंत्रमागावरील आपली
उत्पादने घेण्यास सुरुवात केली. त्याच समकाळात 1960 च्या सुमारास विट्यात चार-पाच जणांनी एकत्र येऊन पहिला
यंत्रमाग आणून तेथील व्यवसायातही क्रांती घडवली होती.
देशात कोठेही यंत्रमागावर
पातळे निर्माण होत नसताना इथे सांगलीत दादासाहेब वेलणकरांनी व विट्यात तेथील श्रमिकांनी
आकर्षक रंगातील पातळे विणण्यास सुरुवात केली होती. हा व्यवसाय भरभराटीला येण्याचे दिवस असतानाच अचानक केंद्र शासनाने
1974 च्या सुमारास यंत्रमागावर साडी विणण्यास बंदी घालून हा व्यवसाय
आणि त्यावर अवलंबून असणार्या भूमिपूत्रांना देशोधडीला लावण्याचा
कटू निर्णय घेतला. केंद्राच्या या निर्णयाने हातमाग व यंत्रमागावरील
हा व्यवसायच ठप्प बनून गेला होता.
त्यानंतर 80 च्या दशकात जगातील सर्वात मोठा
रोजगार देण्याची वस्त्रोद्योगातील क्षमता ओळखून तत्कालीन शासनाने या उद्योगाच्या वाढीसाठी
प्रयत्न सुरू केले. त्यावेळच्या निर्णयानुसार ओपन एंड स्पिनींग
मिल या तत्त्वावरच्या सुतगिरण्यांना मंजुरी देण्याचे धोरण राबवून या व्यवसायाला उर्जितावस्थेत
आणण्याचे प्रयत्न सुरु झाले. सहकार क्षेत्रातील समकालीन धुरिणांनी
या निर्णयाचा फायदा घेत आपापल्या कार्यक्षेत्रात सहकारी तत्त्वावर भागभांडवल उभारत
आणि शासनाची मदत मिळवत सुतगिरण्यांच्या उभारणीस सुरुवात केली. त्यामध्ये वसंतदादा पाटील,राजारामबापू पाटील,
संपतराव माने या सहकारातील जाणत्या नेत्यांनी भूमिपूत्रांच्या हाताला
काम देण्यासाठी या उद्योगांची गुढी उभारली.मात्र परिसरातील कापूस
पिकाची कमतरता,बाहेरील कापसाचे दर आणि उत्पादित सुताची बाजारातील
किंमत याचा ताळमेळ बसत नसल्याने या उद्योगाचा वारू डळमळीत झाल्याची परिस्थिती होती.
तशाही परिस्थितीत या सुतगिरण्या धडधडत होत्या.
त्यानंतरच्या काळात
गेल्या दहा वर्षांपासून केंद्र सरकारने देशाचेच नवीन वस्त्रोद्योग धोरण जाहीर करून 25 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध
करून देण्याची घोषणा केली. त्यानंतर पुन्हा एकदा या व्यवसायाने
कात टाकायला सुरुवात केली. जागतिक बाजारपेठेतील स्पर्धा सुरू
झाल्यानंतर एका बाजूला इटली,जपान,चीन,थेन,दक्षिण-उत्तर कोरिया हे देश
वस्त्रोद्योगाच्या प्रगतीवर पुढे येऊ लागले. त्या तुलनेत आपल्याकडे
प्रचंड मनुष्यबख,कापसासारख्या कच्च्या मालाची मोठी क्षमता आदी
बाबी असूनही आधुनिकतेअभावी भारत देश मागे पडत होता. मात्र नव्या
वस्त्रोद्योग धोरणानंतर आता भारतानेही वस्त्रोद्योगातील आपला दबदबा जगाच्या बाजारपेठेत
निर्माण केला आहे.
जिल्ह्यात राजारामबापू
वस्त्रोद्योग संकुल व त्यातील 6 विविध मूल्यवर्धित प्रकल्प,दीनदयाळ मागासवर्गीय सहकारी
सुतगिरणी(इस्लामपूर),सागरेश्वर सुतगिरणी(कडेगाव),महालक्ष्मी
मागासवर्गीय सुतगिरणी,स्वामी रामानंद भारती सहकारी सुतगिरणी(तासगाव),शेतकरी विणकरी सहकारी सुतगिरणी,जय महाराष्ट्र मागासवर्गिय सहकारी सुतगिरणी (इस्लामपूर)
या उत्पादनाखालील सुतगिरण्या आज कार्यक्षमतेने सुरू आहेत.
वस्त्रोद्योग क्षेत्रातील
क्रांतिकारी बदलांची नोंद घेत ग्रामविकासमंत्री जयंत पाटील व दिलीपतात्या पाटील यांनी
केवळ कापसापासून सूत उत्पादनापर्यंत न थांबण्याचा धाडसी निर्णय घेतला. उद्योगाला पूरक असणार्या मूल्यवर्धित प्रकल्पांची सुरुवात करण्याचा यशस्वी प्रयत्न केला.
कापसापासून धागा,धाग्यापासून कापड आणि त्या कापडावर
विविध प्रक्रिया करून तयार कपडे बनवण्याचा देशाच्या सहकार क्षेत्राला पथदर्शी ठरणारा
प्रकल्प इथल्या ओसाड माळरानावर फुलवण्याची किमया केली. राजारामबापूंचे
स्वप्न डोळ्यांसमोर ठेऊन त्यांनी घालून दिलेल्या आदर्शांची क्षणा-क्षणाला आठवण ठेवत इथल्या भूमिपूत्रांचा विकास हाच ध्यास मानून वस्त्रोद्योगातील
हे ऐश्वर्य उभे केले आहे. शेतकरी विणकरी
व जय महाराष्ट्र या दोन सुतगिरण्यांसह जयंत टेक्सटाईल,इंद्रप्रस्थ
नीटिंग व गारमेंट,प्रतिबिंब प्रोसेसिंग,प्रेरणा यार्न डाईंग,परिवर्तन गारमेंट व सत्यसाई फॅब्रिक्स
अशा 8 प्रकल्पांची उभारणी करताना 400 कोटीहून
अधिक रुपयांची गुंतवणूक केली आहे.
राजारामबापूच्या
इथल्या स्पिनींग विभागात लक्ष्मी रिटर,सिगर,मुरा टेक्स,स्पास्ला
फ्रॉस्ट, विव्हिंग विभागात सोमेट,वायोटेक्स
इटली,वानली चायना, गारमेंटमध्ये मत्सुया
जपान,डाईंगमध्ये थेन मेड,ज्युकी,सिल्वरसन,कनसाई अशा अत्याधुनिक परदेशी बनावटीच्या यंत्रसामग्रीच्या
साहाय्याने घेतलेली उत्पादने आज जगाच्या बाजारपेठेत नावाजली गेली आहेत.देश-परदेशातील नामवंत कंपन्यांच्या शोरुममध्ये इथले कापड
तेवढ्याच दिमाखाने आणि विश्वासाने ग्राहकांच्या अंगावर परिमल
दरवळाप्रमाणे सुखाच्या धाग्यात गुंफत आहे.
जयंत व दिलीप पाटील
या बंधुतुल्य जोडीने वस्त्रोद्योगातील हा चमत्कार साकारल्यावर, त्यांच्या प्रयत्नांना इथल्या भूमिपूत्रांनी
तितक्याच सशक्त हातांनी आधार दिला आहे.महिला,मुले,युवती अशा प्रत्येक घटकाला इथे सामावून घेताना त्यांच्या
जीवनातही सुखाचे धागे विणले आहेत. आज या वस्त्रोद्योग संकुलात
दोन हजाराहून अधिक भूमिपूत्र उज्ज्वल भविष्याची स्वप्ने रंगवत रममाण झाले आहेत.
इथेच माजी मंत्री अण्णासाहेब डांगे या कष्ट,कौशल्य
आणि बुद्धीमत्तेचा त्रिवेणी संगम साधलेल्या ज्येष्ठ नेत्यांनी दीनदयाळ मागासवर्गीय
सहकारी सुतगिरणीच्या माध्यमातून वाघवाडी परिसराच्या डोंगरात वस्त्रोयोगाचे जाळे विणले
आहे. युती शासनाच्या काळात मंजुरी,इमारत,यंत्रसामग्री
उभारणी ते उत्पादन असा प्रवास अल्पकाळात करून सुरू झालेली महाराष्ट्रातील एकमेव सुतगिरणी
हा बहुमानही पटकावला. सध्या 36 हजार चात्यांच्या
पूर्ण क्षमतेने हा प्रकल्प सुरू आहे. या ठिकाणी हजाराहून अधिक
भूमिपूत्र सुखनैवपणे आपल्या जीवनाची वाटचाल करीत आहे. कार्यकारी
संचालक अॅड. चिमणभाऊ डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली
ही सुतगिरणी अनेक उपक्रम राबवण्यात अग्रेसर राहिली आहे. अध्यक्ष,उपाध्यक्षांना मानधन देणारी बहुधा ही एकमेव सुतगिरणी असावी.
माजी गृहमंत्री
आर. आर.पाटील
यांनी मुहूर्तमेढ रोवलेल्या तासगावच्या रामानंद भारती सुतगिरणीनेही अत्याधुनिकतेची
कास धरत प्रगतीकडे वाटचाल ठेवली आहे. माजी मंत्री पतंगराव कदम,
आमदार मोहनराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सागरेश्वर सहकारी सुतगिरणीच्या माध्यमातून भूमिपूत्रांना काम मिळाले आहे. कडेपूरच्या महालक्ष्मी मागासवर्गिय सुतगिरणीच्या माध्यमातून माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या
मार्गदर्शनाखाली परिसरातील विकासासाठी प्रयत्नशील आहेत.खानापूर
तालुका सुतगिरणी, शिराळा तालुका सुतगिरणी सांगलीच्या वैभवात भर
टाकत आहेत. जिल्ह्यात या वस्त्रोद्योग क्षेत्रात आमूलाग्र क्रांती
घडवून इथल्या श्रमिकांच्या व भूमिपूत्रांच्या जीवनात सुखाचे धागे विणणारी उद्यमशील
वृत्ती आणि प्रयत्नाम्मुळे सांगली जिल्ह्याच्या प्रगतीत उद्याच्या उज्ज्वल भविष्याची
पहाट दडल्याचे पाहायला मिळते.
No comments:
Post a Comment