Saturday, February 18, 2017

(बालकथा) डासांचं रक्तदान शिबीर


     एकदा नंदनवनातल्या डासांनी रक्तदान शिबीर भरविण्याची योजना आखली. जंगलातल्या मंडळींनी ही योजना ऐकली तेव्हा त्यांना ती फार म्हणजे फारच आवडली. यानिमित्ताने गरज पडलेल्या जंगलातल्या प्राण्यांचा जीव वाचवायला मदत होईल, असेच सगळ्यांना वाटले. सगळेच प्राणी आनंदानं रक्तादान करायला तयार झाले.
     जंगलाचा राजा शेरसिंह याला शिबिराचा प्रमुख पाहुणा  बनवण्यात आले. शिबिराच्या उदघाटनासाठी सगळ्यात अगोदर रक्तदान करण्याच्या हेतूने त्याचेच नाव आधी पुकारण्यात आले.सगळ्यांनी जोरदार डाळ्या वाजवून त्याचं स्वागत केलं.एका उंच खडकावर त्याला झोपवण्यात आलं. मग रक्त शोषणासाठी एक डझनभर पण चतुर डास पुढे सरसावले. त्यांनी आपले टोकदार सोंड राजाच्या सर्वांवर कचाकच खुपसले.
     पण थोड्याच वेळात शेरसिंहची हालत फार केविलवाणी झाली. ज्या ठिकाणी डास चिकटले होते , त्या त्या ठिकाणी जबरदस्त खाज सुटली. थोडा वेळ ते कसं तरी त्यानं सहन केलं.पण प्राण कंठाशी आला तेव्हा त्याने काही तरी कारण सांगून तेथून पळ काढला.

     शेरसिंहनंतर गेंडा रक्तदान करायला पुढे आला. डास रक्त शोषणासाठी आपली सोंडे त्याच्या अंगात खुपसणार तोच सगळे डास वेदनेने जोरजोरात किंचाळायला लागले, विव्हळायला लागले. गेंड्याच्या चिलखती कातड्याला भिडून डास पुरते घायाळ झाले. काही डासांची सोंडे मोडून पडली. शेवटी गेंड्याला रक्तदान करण्यावाचून माघारी परतावं लागलं.बिचार्या गेंड्याला रक्तदान करण्याची संधीच मिळाली नाही.
     गेंड्यानंतर कासवाचा नंबर आला. यावेळेला डास सावध होते. ते कासवाच्या हाता-पायाला आणि मऊ मुलायम अशा अंगाला जाऊन चिकटले. तो कण्हायला लागला. त्याला असं वाटत होतं की, कुणी तरी आपल्या कोमल शरीरावर धगधगते निखारे ठेवले आहेत. थोडा वेळ  त्याने वेदना सहन केल्या, पण वेदना हाताबाहेर गेल्यावर त्याने आपले सर्वांग पोठात खेचून घेतले. तिथे जमलेल्या प्राण्यांना अचानक हसू फुटले. डास बिचारे वरमले
      अस्वलाचा नंबर आला,तेव्हा तर डासांची मोठी पंचायत झाली. त्याच्या घनदाट केसांमध्ये डास हरवूनच बसले. त्यांना बाहेर पडायला मार्गच मिळेना.काहींचा श्वास गुदमरुन गेला. कसे तरी करून त्यांनी आपली सुटका करुन घेतली आणि अस्वलाला निरोप दिला.
     अस्वलानंतर हत्ती आला. त्याला पाहून डासांना फार आनंद झाला. त्याला पाहून डासांना फारच आनंद झाला. ते त्याच्या अंगावर जिथे मिळेल तेथे जाऊन पटापट चिकटले.काही डास घोंगावत- घोंगावत कानाभोवती गिरक्या घेऊ लागले. पण त्यांच्या आवाजाने कासावीस झालेल्या हत्तीने आपल्या सुपासारख्या कानाने पटकन एक फटकारा मारला.डासांना वाटलं मोठं वादळचं आलं. गिरक्या घेत घेत ते दूरवर जाऊन आदळले. काही जखमी झाले. भ्यालेल्या डासांनी हत्तीला परतावून लावले. हत्तीला फार वाईट वाटले. पण डासांनी त्याचा बळेबळेच निरोप घेतला.
     बराच वेळ एक खोडकर बेडूक किनार्यावर बसून सगळं काही पाहत होता. मोठे आणि ताजे टवटवीत डास पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटत होते. आता त्याची पाळी आली. तो गपचिप जाऊन खडकावर अडवा झाला.डासांनी त्याचे रक्त शोषायला सुरवात केली. बेडकाने हळूच दोन डास मिटकावले. पण एका डासाने त्याचे कतृत्व पाहिले. त्याने हळूच बेडकाच्या पोटाचा चावा घेतला. त्याला गुदगुल्या व्हायला लागल्या. त्याला हसू फुटले. तोंड उघडताच डास बाहेर पळाले. बेडूक वरमला.त्याने थेट तलावात उडी घेतली. खूप उशिरापर्यंत रक्तदान शिबीर चाललं. प्राणी अडचणी आल्या तरी रक्तदान करत होते.

   दुसर्यादिवशी नंदनवनात शुकशुकाट होता. कोणीच घराबाहेर पडले नव्हते.रक्तदान केल्यामुळे प्राणी आपल्या घराबाहेर पडले नव्हते. घरीच विव्हळत पडले होते. शेरशिंह आपल्या गुहेत अंगावर सात- आठ रजया लपेटून पडला होता. त्याला भयंकर ताप भरला होता. त्याच्यात मलेरियाची लक्षणे दिसत होती. कासवाचे हात-पाय सुजले होते. त्याला हात-पाय बाहेर काढता येत नव्हते.कबुतराचे अंग खाजवण्याच्या नादात सारे पंख झडून गेले होते. हत्तीने अंगाला सुटलेली खाज शमविशण्यासाठी अंग घासून घासून चार-पाच झाडे पाडली होती.
     इतक्यात एक कावळा शेरसिंहकडे आला आणि म्हणाला, महाराज,वनातले डास गायब आहेत. रक्तदानाच्या बाटल्यादेखील रिकाम्या पडल्या आहेत. आपण केलेली मेहनत बेकार गेली. मला वाटतं रक्ताची कोणी तरी चोरी केली असावी.

     शेरसिंहाने प्रधानाला खातरजमा करायला सांगितले. खरेच डास गायब झाले होते. काय प्रकार घडला कुणालाच कळत नव्हते.प्राण्यांनी डासांची शोधा-शोध केली. पण डास असतील तर सापडतील ना! ते तर पोट भरल्यामुळे गर्द झाडींमध्ये जाऊन  गाढ झोपी गेले होते. आता त्यांना काही दिवस अन्नाची गरज नव्हती.

No comments:

Post a Comment