Thursday, February 23, 2017

एक्झाम फोबिया मुलांसाठी घातक


     दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा आता फक्त काही दिवसांवरच येऊन आहेत.ज्यांना गुणवत्तेत यायचं आहे,त्यांनी अगोदरच्या इयत्तेपासूनच अभ्यास सुरू केलाय.तर ज्यांना फक्त पास होऊन पुढच्या वर्गात जायचं आहे,त्यांनी प्रीलिमच्या काही दिवस आधी अभ्यासाला सुरुवात केली आहे. पण परीक्षेच्या आधीचे हे काही दिवस या सगळ्यांसाठी महत्त्वाचे आहेत. शैक्षणिक जीवनातील सर्वात महत्त्वाच्या मानल्या जाणार्या या परीक्षांना बसलेल्या विद्यार्थ्यांची आणि पालकांचीही घालमेल सुरू आहे. जसजशी परीक्षेची तारीख जवळ येत आहे,तसतसे सगळ्यांचं टेन्शन वाढतच चाललं आहे.
     दहावी-बारावीच्या परीक्षांना गेल्या काही वर्षात आपल्याकडे अवास्तव महत्त्व प्राप्त झालं आहे. दहावीच्या परीक्षेनंतर चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा यासाठी,तर बारावीच्या परीक्षेनंतर (आता सीईटी,नीटनंतर) ज्या क्षेत्रात आपल्याला करिअर करायचे आहे,त्यासाठीच्या पदवी शाखेत आणि तेही त्यासाठी प्रसिद्ध असलेल्या कॉलेजमध्येच प्रवेश मिळावा,यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जीवघेणी स्पर्धा सुरू झाली आहे. त्यामुळे जीवनात तर यशस्वी व्हायचं असेल तर परीक्षांमध्ये अधिकाधिक गुणांनी उत्तीर्ण होणं आवश्यक आहे, असा अलिखित नियमच तयार झाला आहे. शिक्षण व्यवस्थेतल्या या गुणवादाचा विद्यार्थ्यांवर अतिशय विपरित परीणाम होत आहे. विद्यार्थ्यांच्या मानगुटीवर बसलेल्या परीक्षेच्या या दडपणाने त्यांची झोपच उडवली आहे.

     फेब्रुवारी-मार्च म्हणजे परीक्षांचे दिवस. भीतीचे दिवस. विद्यार्थ्यांच्या मनातल्या या परीक्षेच्या भीतीला मानसशास्त्रीय परिभाषेत एक्झाम फोबिया म्हणतात. वर्षभर नियमित अभ्यास केलेला विद्यार्थी असो किंवा परीक्षेच्या काही दिवस आधी मार्गदर्शिका किंवा क्लासच्या नोट्स पाठ करणारा विद्यार्थी असो, प्रत्येकाला कमी- अधिक प्रमाणात परीक्षेची भीती वाटत असतेच. पण जेव्हा ही भीती विद्यार्थ्यांचे संपूर्ण मनच व्यापून टाकते, तेव्हा त्याचा परीक्षेतल्या परफॉर्मन्सवर अत्यंत विपरित परिणाम होऊ शकतो.
     प्रीक्षेच्या भीतीचा हा बागुलबुवा म्हणजेच एक्झाम फोबिया. एक्झाम फोबियामुळे काही विद्यार्थ्यांना परीक्षेच्यावेळी उत्तरं आठवत नाहीत.काही जणांना अर्धवट उत्तरं आठवतात. त्यांच्या मनात गोंधळाची स्थिती निर्माण होते. काहीजण तर पूर्ण ब्लँक होऊन जातात. काहींचे हात-पाय थरथरतात. पोटं दुखतं,उलट्या होतात. ताप येतो. अभ्यास झालेला असतानाही या गोष्टींमुळे परेक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या परफॉर्मन्सवर प्रतिकूल परिणाम होतो.
     आजकालच्या सुशिक्षित कुटुंबातील मुला-मुलींना अभ्यासासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी सहज मिळतात. पालक हजारो रुपये फी भरून चांगल्या क्लासमध्ये आपल्या मुलांसाठी  प्रवेश घेतात. गाईड्स,नोट्सपासून मुलांसाठी सर्वकाही उपलब्ध असतं. अनेकांना अभ्यासासाठी स्वतंत्र खोली असते. ज्यांची घरं लहान आहेत, ते आपल्या भागातल्या स्टडी रुममध्ये  जाऊन अभ्यास करतात. वर्षभर शाळेतले शिक्षक, क्लासचे शिक्षक यांचे मार्गदर्शन मिळालेले असतानाही मग विद्यार्थ्यांना परीक्षेची भीती का वाटावी? एक्झाम फोबिया का व्हावा?
     पालकांनी अनेक गोष्टी उपलब्ध करून दिल्या असल्या तरी बहुतांश विद्यार्थी वर्षभर अभ्यासात चालढकल करतात. शेवटी परीक्षेला 15-20 दिवस राहिलेले असतात,तेव्हा त्यांना अभ्यासाचं प्रचंड दडपण येतं. वर्षभरचा अभ्यास शेवटच्या काही दिवसांमध्ये करणं त्यांना अशक्य वाटू लागतं. या उलट,जे विद्यार्थी वर्षभर नियमित अभ्यास करतात,त्यांना आपण चांगले गुण मिळवू का? आपल्याला मॅक्झिमम मार्क्स मिळतील की नाही?याची चिंता सतावत असते. आई-वडिलांनी आपल्या शिक्षणासाठी पैसे खर्च केलेत, शिक्षकांनी आओपल्यावर विश्वास टाकलाय,या सग़ळ्या गोष्टींचे आपण चीज करू शकू का? याचं दडपण अशा विद्यार्थ्यांवर येतं. याशिवाय काही पालक आपल्या मुलांची क्षमता लक्षात न घेताच त्यांची तुलना हुशार मुलांची करतात. मुलांवर दवाब टाकतात. यामुळे मुलांचा आत्मविश्वास कमी होतो. परीक्षेत माझ्याकडून काही चूक तर होणार नाही ना? मी अपयशी तर ठरणार नाही ना? याचं मुलांवर खूप दडपण येतं आणि त्यांना एक्झाम फोबिया होतो. काही जणांच्या केसेसमध्ये अॅन्झायटीची तीव्रता एवढी वाढते की, त्यांना आपलं आयुष्यच संपवावंस वाटू लागतं.
परीक्षेच्या भीतीमुळे विद्यार्थ्यांना आपल्या मनातली ही घालमेल नीट समजत नाही. अनेकदा पालकांशी त्यांचा योग्य संवाद होत नसतो. त्यामुळे मानसिक आजार असलेला एक्झाम फोबिया विद्यार्थ्यांच्या शरीरावरही परिणाम करू लागतो.परीक्षेच्या काळात हमखास होणारी सर्दी,डोकेदुखी,पोटदुखी या भीतीमुळेच होते. अशक्तपणा वाटू लागतो. काही करण्याची इच्छाच राहत नाही. परीक्षेच्या अॅन्झायटीमुळे काही जणांची भूक अत्यंत कमी होते. तर काही जणांची भूक खूप वाढते. काहींची झोपच उडते तर काहींना सतत झोप येते. मन आणि शरीर पोखरून टाकणार्या या एक्झाम फोबियाचा विद्यार्थ्यांच्या परीक्षेतल्या परफॉर्मन्सवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे ही गोष्ट लाइटली घेणं योग्य नाही. यावर उपाय शोधून मुलाला नॉर्मलवर आणणं महत्त्वाचं आहे. यासाठी सुसंवाद घडणं महत्त्वाचं आहे. तज्ज्ञांनाही हेच वाटते. विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांशी, शिक्षकांशी,सहकारी मुलांशी ज्या ज्या वेळेला शक्य होईल,त्या त्या वेळेला संवाद साधला पाहिजे. मनातल्या भावना,भीती व्यक्त न केल्याने दडपण वाढत जातं. एकटं राहिल्याने तर तणाव आणखीनच वाढतो. शारीरिक किंवा मानसिक असा कुठलाही त्रास होत असेल तर ताबडतोब डॉक्टरांचे मार्गदर्शन घेतलं पाहिजे. दुसर्या बाजूला परीक्षेच्या शेवटच्या दिवसांमध्ये टाइम मॅनेजमेंट करून त्यांचं कसोसीने पालन केलं पाहिजे. जी मुलं वेळेचं नीट नियोजन करतात आणि इतरांशी संवाद साधतात.ती परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरं जातात.
   
 परीक्षेची ही भीती त्यांच्या पालकांनाही सतावते. त्यामुळे परीक्षा जवळ आली की, पालक थेट महिनाभराची सुट्टी घेऊन पाल्याच्या मागे अभ्यासासाठी लागतात. पण पालक आणि पाल्य यांच्यात असलेल्या जनरेशन गॅपमुळे त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये तफावत असते. बरेचदा त्यांचे विचार परस्परविरोधीही असतातअनेकदा पालक त्यांनी त्यांच्या काळात ज्या पद्धतीने अभ्यास केला होता, त्या पद्धतीनेच आपल्या पाल्याने अभ्यास करावा, असा चुकीचा आग्रह धरतात.पूर्वी पहाटे लवकर उठून अभ्यास करायची पद्धत होती. आताच्या बदललेल्या लाइफ स्टाइलमुळे विद्यार्थ्यांना रात्रीचे जागून अभ्यास करणं आवडतं. अभ्यासाच्या पद्धतीही आता पूर्णपणे बदलल्या आहेत. त्यामुळे पालकांनी पाल्याने पहाटे उठावे आणि अभ्यास करावा, असा आग्रह धरू नये. त्याच्यावर गुणांची सक्ती करू नये. एवढे गुण मिळालेच पाहिजेत, असा आग्रह धरू नये. उलट त्याला तुला किती गुण मिळतात, ते आम्हाला मान्य आहेत. मात्र परीक्षेचे टेन्शन घेऊ नकोस, असे सांगितले पाहिजे. मुलांमध्ये सकारात्मक भाव निर्माण करून त्याच्यात मोकळेपणा येऊ द्यावा. त्याच्याशी सतत बोलत राहा. अडचणी विचारत चला. त्याला विरुंगळ्यासाठी वेळ द्या. याचा चांगला फायदा होईल.

     दहावी-बारावीच्या परीक्षांच्या भीतीचा हा बागुलबुवा काल्पनिक आहे खरा, पण त्याचे परिणाम भीषण आहेत. पण पालकांनी आपल्या पाल्याशी योग्य संवाद साधला आणि विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जाण्याचे धैर्य अंगी बाळगले तर हा एक्झाम फोबिया कुठच्या कुठे पळून जाईल. आणि मग यश आपलेच आहे.(विविध लेख आणि मुलाखतींवर आधारित)

No comments:

Post a Comment