कोणत्याही निवडणुका असोत, त्या जाहीर
झाल्या की, गुडघ्याला बाशिंग बांधून घेतलेल्या मंडळींची धावपळ
सुरू होते. ही धावपळ करणार्या प्रत्येकाचा
हट्ट असतो की, पक्षाने त्यालाच तिकिट द्यावे. कारण तिकिट मागणार्यांमध्ये तोच सर्वात लायक आहे, शिवाय आपणच निवडून येऊ शकतो अशी खात्री
तो छातीवर हात ठेवून व्यक्त करीत असतो. पण पक्षाला फक्त एकाच
जागेसाठी तिकिट द्यायचे असते व पक्षश्रेष्ठी पक्षाचा विचार करुनच तिकिट देतात यावर
त्याचा विश्वास नसतो. त्यामुळेच आपल्या
उमेदवार निश्चित करण्याच्या पध्दतीला बंडखोरीची कीड लागली आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत
समिती पंचवार्षिक निवडणुकीतील विविध पक्षांच्या तिकिटवाटपाकडे
लक्ष दिले तर जणू बंडखोरांचा पोळाच फुटला आहे असे वाटते. उमेदवारी
अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या तारखेला काही बंडोबा थंडोबा होतील अशी आशा त्यांच्या
नेत्यांना नक्कीच वाटत असेल,मात्र बंडखोरांना काय वाटत असेल,ते त्यांचे त्यांनाच ठाऊक!
खरे
तर पक्षाने दोनदा तिकिट दिल्यानंतर कुणीही उमेदवारी मागायलाच नको.
पक्ष संघटनेसाठी जे आवश्यक आहेत त्यांना तिसर्यांदाच काय, चौथ्यांदाही तिकिट दिले जाऊ शकते.
पण दोन दोन वेळा तिकिट मिळवून व निवडून येऊनही तिसर्यांदा जे कार्यकर्ते पुन्हा तिकिट मागतात, ते मुळीही
सर्मथनीय नाही. तिकिट मागणेच जिथे सर्मथनीय नाही तिथे बंडखोरी
करणे तर पक्षद्रोहच ठरतो. त्यामुळे तीनदा उमेदवारी मिळवून व निवडून
येऊनही सत्ता भोगणार्यांनी तिकिटासाठी बंडखोरी करणे चुकीचेच
ठरते.
कोणत्याही
पक्षाने एकदा दोनदा तिकीट दिल्यानंतर तिसर्यांदा इतरानांही
संधी दिली पाहिजे व त्यांच्यासाठी जुन्या लोकांनी त्याग करण्याची तयारी ठेवली पाहिजे.
किंबहुना जुन्यांनी इतर पात्र कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यासाठी स्वत:च पुढाकार घेतला पाहिजे. पण असा समंजसपणा दिसून येत नसल्याने
बंडखोरी होते व ती सर्वच राजकीय पक्षांसाठी डोकेदुखी ठरत असते. परंतु प्रेम, युद्ध व राजकारणात सर्वच क्षम्य असल्याने
सत्तेच्या लालसेपोटी बंडोबा आपले बंडाचे निशान फडकवत असतात. मतदारांनी
त्यांना मुळीही थारा देऊ नये.
राजकारणात
एकाला संधी देताना अनेकांच्या संधी हिरावल्या जातात हे खरेच.
त्यात अनेक पात्र व्यक्तींना बाजुला सारणेही शक्य आहे. पण बंडोबा ही बाब लक्षातच घेत नाहीत. कारण केवळ स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी ते बंडाचे निशाण फडकवत असतात. जनतेच्या सेवेशी त्यांना काहीही देणेघेणे नसते. अशा बंडोबांना
जनतेनेच नाकारण्याची गरज आहे. स्वहितासाठी पक्षद्रोह करीत दुसर्या पक्षांची दारे ठोठावणार्या तसेच अपक्ष लढत पक्षाच्या
अधिकृत उमेदवाराला पाडण्यासाठी खटाटोप करणार्या स्वार्थी व्यक्तींना
मतदारांनी संधी न देता राजकारणाचेही शुद्धीकरण घडवून आणण्याची गरज आहे. राजकारणाचा प्रवाह थांबविण्याचा प्रयत्न करणार्यांना
मतदारांनीच धडा शिकविला तर ’आयाराम-गयाराम’
हा प्रकार थांबण्यास मदत होणार आहे. कर्तबगार व्यक्तीस
पक्षच उमेदवारी देत असतो. परंतु कसलीही विकासकामे किंवा कामगिरी
न करता केवळ खुर्ची उबवण्याचे काम करीत असलेल्यांनाच पक्ष पुन्हा उमेदवारी देण्याचे
टाळत असेल तर त्यांनी बोंबाबोंब करण्याचे काय कारण आहे? त्यामुळे
बंडखोरी मग ती कोणत्याही पक्षात असो त्याज्यच समजली पाहिजे.
No comments:
Post a Comment