Monday, March 13, 2017

काश्मिरी हाऊसबोटींचं आकर्षण

     हाऊसबोट म्हणजे सरोवरातील तरंगत्या अलिशान बोटी. पाण्यावरचं राहतं घर. किंवा तरंगणारं हॉटेल. यात राहून पर्यटक हाऊसबोटीची हौस पुरवून घेतात. श्रीनगर शहराच्या मधोमध दल लेक नावाचे सरोवर आहे. इथे पर्यटक गर्दी करतात. चहूबाजूंनी पर्वतांनी वेढलेल्या दल सरोवराचा विस्तार 35 चौरस किलोमीटर पसरला आहे. त्याच्या एका बाजूला शंकराचार्य मंदिर तर दुसर्या बाजूला हरि पर्वत आहे. सरोवराच्या एका बाजूने हजरतबलकडे जाता येते. दुसर्या काठाने समांतर गेल्यास श्रीनगरची शान असलेल्या चश्मेशाही, निशात आणि शालिमार गार्डन्सचा नजारा पाहायला मिळतो.
     काश्मीर पाहाण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. काहींना हाऊसबोटीचाही आनंद घ्यायचा असतो. असे पर्यटक संधी मिळाली की, काश्मीर टूर काढतात आणि उराशी बाळगलेले स्वप्न साकार करतात. प्रत्येकाने काश्मीर पाहावा, असाच तो आहे.भारताचं नंदनवन त्याला उगाच म्हटलेलं नाही.

     अशा काश्मीरातील हाऊसबोटचा प्रवास अगदी सुखद असतो. या शिकार्यात राहण्याची मज्जाच काही और असते. दल लेकमधल्या हाऊसबोटी एका जागी नांगर टाकून उभ्या असतात. त्यांच्याभोवती पाण्यातच लाकडी खांब रोवलेले असतात. ही बोट चालवण्याचं इंजिन नसतं. किनार्यापासून बोटीपर्यंत छोट्या होडीतून जायचं.
     हाऊसबोटीचा इतिहास फार मोठा नाही. शे-दीडशे वर्षांचा त्याला इतिहास आहे. त्याकाळी इंग्रजांनी काश्मीरमध्ये भूखंड मागितला.वखारीसाठी जागा मागायची आणि मग राज्यच काबीज करायचं ही इंग्रजांची सार्वत्रिक कावेबाजी होती. काश्मीरच्या राजाने जमीन देण्यास नकार दिल्यावर त्यांनी दल सरोवरात पडाव टाकायचं ठरवलं. पाण्यावर त्यांची तरंगती वस्ती उभी राहिली.त्याच त्या हाऊसबोटी. तलावात राहण्यासाठी इंग्रजांनी सव्वाशे फुटांच्या मोठ्या सुशोभीत बोटी बनवून घेतल्या. लाकडी फर्निचरने सजलेल्या या बोटी तरंगत्या आलिशान महालासारख्या असायच्या. आजही तशाच आहेत. काश्मीर परिसरात जवळपास दीड हजारच्या आसपास अशा हाऊसबोटी आहेत. त्यातल्या बर्याच ब्रिटिश आमदानीतील आहेत.दल लेक,नगीन लेक,चिनार बाग आणि झेलम नदी आदी ठिकाणी या बोटी आढळून येतात.
     सत्तर-ऐंशी वर्षांपूर्वीच्या लाकडी बोटी पाणी पचवून टिकवण्याचं कारण म्हणजे त्यांच्या बांधणीचं विशिष्ट लाकूड. एकट्या दल सरोवरात सातशे हाऊसबोटी आहेत. हाऊसबोटीसाठी पाइन (देवदार) वृक्षांचे लाकूड वापरलं जातं.त्यातही सीडर पाइन प्रकारच्या देवदारचं लाकूड अतिशय उत्तम असतं. हे लाकूड पाण्यात शंभर वर्षे ठेवलंतरी कुजत नाही. चार-पाच शेल्फ कंटेंड खोल्या,डायनिंग कम बार आणि विशाल दिवाणखाना मिळून बोटीचा आकार 140 फूट लांब असतो. त्यासाठी तळाशी सलग 80 फुटांचं भक्कम लाकूड बसवावं लागतं. सीडर पाइनच्या झाडापासून ते मिळू शकतं.
   
 देवदार वृक्षांच्या फळ्यांपासून हाऊसबोटी उभारल्या जातात.त्यातलं फर्निचर मात्र आक्रोडच्या लाकडाचं असतं. बारीक नक्षीकाम करणार्यात काश्मिरी कारागीर वाकबगार आहेत. त्यामुळे हाऊसबोटीत सुंदर नक्षीकामाने नटलेलं फर्निचर नजरेला सुखावतं. या फर्निचरला साजेसे उंची गालिचे पडदे आणि कलात्मक वस्तू हाऊसबोटीत असतातच. पण दिवाणखान्यातून बाहेर पडताच.छोटासा बगीचाही असतो. तिथे गार्डन खुर्चीवर बसून कावा (काश्मिरी चहा) पिण्याची मौज अवर्णणीय असते. कोवळ्या सूर्यप्रकाशाची लज्जत चाखायची तर बेडरुमवर असलेल्या सनडेकवर जायचं. हाऊसबोटीत फ्रिज,टीव्ही,लायब्ररी या सर्व गोष्टी उपलब्ध असतात. म्हणूनच हाऊसबोटीला प्लोटिंग पॅलेस आणि श्रीनगरला भारताचे व्हेनिस म्हटले जाते. इटलीच्या व्हेनिस शहरात सर्वत्र कालवे आहेत.तिथला सर्व व्यवहार बोटीद्वाराच चालतो.

दल लेकमधल्या काही हाऊसबोटींमध्ये दुकानंही आहेत. या बोटी ए.बी.सी. आणि डी अशा दर्जाच्या हाऊसबोटी असतात. खिशाला परवडेल,त्या बोटीत राहावं. डिलक्स बोटी दल आणि नगीन सरोवरात जास्त आहेत. उन्हाळ्यात या बोटीचं एका दिवसाचं कमीतकमी भाडं 4000 हजार ते पाच हजार पर्यंत जातं. कमीतकमी भाडे 500 ते हजार रुपये असतं. या खर्चात दोघांसाठी चहा-नाश्ता आणि दोन वेळचं जेवण मिळतं. बोटीत अगदी घरगुती वातावरण असतं.तिथल्याच स्वयंपाक घरात आवडीचं शाकाहारी, मांसाहारी जेवण बनवलं जातं. त्यातही काश्मिरी जेवणाचा अस्वाद चाखणं अधिक महत्त्वाचं असतं. परदेशी पर्यटकही काश्मिरी जेवण पसंद करतात
     या हाऊसबोटीची नावंदेखील आपल्याला आकर्षून घेतात.मिस इंडिया,ज्वेल ऑफ इंडिया, क्राऊन ऑफ इंडिया वगैरे...! एक हाऊसबोट बनवायला साधारण पन्नास ते 60 लाख रुपये खर्च येतो. मात्र अलिकडच्या काही वर्षात नवीन बोट काही तयार झाली हेही तितकंच खरं आहे.मात्र पर्यटकांना त्याच्याशी काही देणे-घेणे नाही. त्यांना काश्मीरात येऊन स्वर्गीय आनंद लुटायचा असतो. तेच त्यांचं स्वप्न असतं

No comments:

Post a Comment