Monday, March 13, 2017

विनायक हेगानाची 'शिवार संसद'

     गेल्या वर्षभरात म्हणजे 2016 मध्ये तब्बल 3 हजार 52 शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत. गेल्या 20 वर्षांच्या काळात तर हे आकडे लाखाच्या घरात गेले आहेत. पण या आत्महत्या रोखण्यासाठी अद्याप ठोस अशी उपाययोजना होताना दिसत नाही. त्यामुळे शेतकर्यांची आत्महत्या हा महाराष्ट्राचा एक गहन प्रश्न होऊन बसला आहे. गरिबी, नापिकी, कर्जबाजारीपणा अशी अनेक कारणं यामागे आहेत. शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी प्रयत्न होत नाहीत, असे नाहीत,पण हे प्रयत्न अपुरे पडत आहेत, हेच यातून सुचित होत आहे. मात्र शेतकरी आत्महत्या रोखणे आवश्यक आहे. आत्महत्येने प्रश्न सुटत नाहीत.उलट आत्महत्या करणार्या शेतकर्याचे कुटुंब रस्त्यावर येते.त्यामुळे शेतकर्याला प्रबोधनाची गरज आहे. आर्थिक मदतीची गरज आहे,त्याच्या कुटुंबाला रोजगाराची गरज आहे आणि  हेच काम विनायक हेगाणा नावाचा तरुण करण्याचा प्रयत्न करतो आहे. नुसतेच प्रबोधन करत नाही, तर शेतकर्यांना अर्थसहाय्य मिळवून देण्याचीही त्याची धडपड सुरू आहे.

 अवघ्या एकवीस वर्षाचा तरुण अन्नदात्याची हलाखीची परिस्थिती पाहवत नसल्यामुळे  शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठीशिवार संसदहा उपक्रम सुरू केला. या माध्यमातून तो शेतकर्यांचं प्रबोधन करतोय, आत्महत्या करण्यापासून परावृत्त करतोय. त्या थांबवण्यासाठी तो प्रयत्नशील आहे.
 विनायक याने कोल्हापुरातील सरकारी शाळेतून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. तो शेतकरी कुटुंबात जन्माला आला असल्यामुळे त्याला पण लहानपणापासून शेतीची आवड आहे. शिक्षण घेत असतांना सुट्ट्यांमध्ये वेळ मिळेल तेव्हा तो वडिलांना शेतीच्या कामात मदत करायचा.त्यामुळे त्याला शेतकर्यांचे दु:ख अगदी जवळून पाहता आलेकृषी हा विषय घेऊन बी.एस्सी केलं असलं तरी विनायकने याच कार्यासाठी स्वत:ला वाहून घेतलंय. शेतकरी आत्महत्या पूर्णपणे थांबवण्याच्या उद्देशाने तो झटतोय. शेतकरी आत्महत्या या प्रश्नावर नाही तर या प्रश्नांवरच्या उत्तरावर काम करायचं असल्याचं विनायक सांगतो. साधारण दीड वर्षांच्या काळात विनायक आणि त्याच्या सहकार्यांनी 11 शेतकर्यांना आत्महत्यांपासून परावृत्त केलंय. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातले 3000 तरुण शिवार संसदशी जोडले गेलेत. हे सगळे तरुण शेतकरी कुटुंबातले आहेत. या उपक्रमाबाबत आणि शेतकर्यांच्या आत्महत्यांबाबत विनायक तळमळीने बोलतो. तो शेतकरी कुटुंबातला असल्याने शेतीविषयी त्याच्या मनात मानाचं स्थान राहिलंय. तो सांगतो शेतीचा अभ्यास करताना अनेक गोष्टी समोर आल्या. शेतकर्यांच्या आत्महत्यांचा विषय मनात होताच. यामुळे मी खूप अस्वस्थ झालो. मग मी संपूर्ण महाराष्ट्र पालथा घातला. 18 ते 30 वयोगटातल्या तरुणांचं सहकार्य मला मिळालं. आत्महत्या झालेल्या गावांमध्ये जाऊन शेतकर्यांशी संवाद साधला. तुम्ही मायबाप आणि आम्ही तुमची लेकरं आहोत, अशी साद त्यांना घातली. आत्महत्या करण्याची शक्यता असणार्या शेतकर्यांवर जास्त लक्ष केंद्रित केलं.
     विनायक आपल्या संस्थेच्या माध्यमातून शेतकर्यांच्या आत्महत्येविषयी अनेकांशी संवाद साधत राहिला, यातून त्याला काही मुद्द्यांचा उलगडा झाला. राज्यात या आधीपण दुष्काळ व पुर यायचा पण त्यावेळेस शेतकरी आत्महत्या करीत नव्हते पण आज परिस्थिती बदलली आहे. पूर्वी लोकांमध्ये एकी असल्यामुळे ते आपल्या अडचणी एकमेकांना सांगून त्यावर तोडगा शोधून काढायचे. यामुळे त्यांच्या अडचणी आपापसात बसून विचारविनिमयाने सुटत असे. आजच्या परिस्थितीत शेतकरी बंधू एकमेकांशी स्पर्धा करू लागला आहे, त्यामुळे त्यांच्यातील एकोपा कमी झाला आहे. ओल्या व कोरड्या दुष्काळामुळे त्यांची पिके संकटात येतात व शेतकर्यांवर बँक आणि सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी दबाव वाढू लागतो. प्रसंगी घरच्यांचा पाठींबाही कमी पडू लागतो. या सगळ्या परिस्थितीत शेतकरी स्वतःला एकटा समजतो आणि निराशेपोटी तो आत्महत्येचे पाऊल उचलतो. विनायक यांना वाटते की आपण शेतकर्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदतीऐवजी रोजगार मिळवून देण्याची सोय केली पाहिजे. कारण शेतकर्यांना आर्थिक मदत करण्यासाठी आमच्याकडे पैसा नाही पण आम्ही त्यांची संवादाच्या माध्यमातून मदत करतो. आमची टीम गावात फिरून शेतकर्यांच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन सरपंच व ग्रामपंचायतीमध्ये त्यांच्या रोजगाराची याचना करतो.

      विनायक आणि त्याची टीम शेतकर्यांना सांगते की, आम्ही तुमच्या मुलांप्रमाणेच आहोत, कोणतेही आई-वडिल मुलांना एकटे टाकत नाही. आम्ही त्यांना समजावतो की आत्महत्या कुठल्याही अडचणीवरचा उपाय नाही पण अडचणींचा सामना करूनच त्यावर मात केली पाहिजे. आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासोबतच भावनिक आणि मानसिक आधार दिला जातो, असं विनायक सांगतो. लघुपट, गोष्टी, कथा या माध्यमातून शेतकर्यांचं प्रबोधन करण्यावर विनायक आणि त्याच्या सहकार्यांचा भर आहे. अनेक शेतकरी मुलांकडे पाहून जगत असतात. त्यामुळे त्यांच्या मुलांना दत्तक घेऊन शिक्षणाकडे वळवण्याचाशिवार संसदचा प्रयत्न असेल. यासाठी उस्मानाबाद परिसरातली 157 मुलं दत्तक घ्यायचा त्यांचा विचार आहे. शेतकरी आत्महत्या हा विषय वाटतो तितका सोपा नाही. तो चटकन सुटणार नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्या पूर्णपणे थांबवण्यासाठी काम केल्यानंतर शेतकर्यांच्या उन्नतीसाठी उपक्रम राबवणार असल्याचं विनायकचं म्हणणं आहे. म्हणूनच त्याची हीशिवार संसदपथदर्शक ठरतेय.

No comments:

Post a Comment