Thursday, March 2, 2017

सांगलीतले चांदोली धरण


     चांदोली धरण हे सांगली जिल्ह्याचे एक वैभव आहे. या परिसरातील भाग सुजलाम आणि सुफलाम करण्यात या धरणाचा मोठा वाटा आहे. आता हे धरण आणि परिसर पर्यटन स्थळ म्हणून विकसित झाले आहे आहे, याचा आर्थिक लाभही मिळू लागला आहे. सांगली जिल्ह्यातील ज्येष्ठ राजकर्त्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी भकास माळरानाचे नंदनवन करण्यासाठी चांदोली (वारणा) धरणाचा पाया रचला. या धरणामुळे शिराळा, वाळवा, शाहूवाडी तालुक्यातीलच नव्हे तर सांगली जिल्ह्याच्या अर्थकारणालाच गती मिळाली.

     सांगली जिल्ह्याला असमतोल भौगोलिक क्षेत्र लाभले आहे. कृष्णाकाठ परिसर,वारणा परिसर हिरवागार, नयनरम्य असा आहे, मात्र जिल्ह्याचा पूर्व भाग दुष्काळाच्या झळा सोसतो आहे. असे असले तरी जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीकोनातून प्रयत्न झाला नाही, असे नाही. मात्र पूर्व भागाला म्हणावा, असा निधी प्राप्त झाला नाही, विकासात्मक धोरण दृढतेने राबवले गेले नाही,हेही नाकारून चालत नाही. 1983 साली जिल्ह्यातील एकूण पिकाखाली क्षेत्र सहा लाख 35 हजार 798 हेक्टर होते. त्यापैकी 17 टक्के जमीन ओलिताखाली होती. केवळ आठ टक्के दुबार पिके घेतली जात होती. जिल्ह्यातील एकूण पिकाखाली क्षेत्रांपैकी 63 टक्के क्षेत्रात तृणधान्य पिके,13 टक्के क्षेत्रात कडधान्ये व 8 टक्के क्षेत्रात गळिताची पिके घेण्यात येतात. सिंचनाखाली एकूण निव्वळ क्षेत्रापैकी 63 टक्के क्षेत्र विहिरीद्वारे ओलिताखाली आणले जाते.
शेतीपुढील पाण्याचा गंभीर प्रश्न लक्षात घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील,राजारामबापू पाटील, शिराळ्याचे फत्तेसिंगराव नाईक,विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख आदी नेत्यांनी चांदोली धरण उभारून पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी पहिला प्रयत्न केला.या धरणामुळे शिराळा,शाहूवाडी,वाळवा तालुक्यातील वारणा नदी काठच्या उजाड माळरानावर हिरवीगार शेती फुलली. हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आल्यामुळे बळीराजा सुखावला.
     शिराळा तालुक्याच्या पश्चिम टोकावर सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये चांदोली येथे वारणा धरण आहे. राज्यातील मातीचे सर्वात मोठे धरण म्हणून ओळखले जाते. धरणाची पाणी साठवण क्षमता 34 टीएमसी आहे. पाटण तालुक्यातील पाथरपुंज येथे उगम पावलेली वारणा व प्रचितगडाच्या पायथ्याशी उगम पावलेली रामनदी या नद्या या धरणातील पाणीसाठ्याचे मुख्य स्त्रोत आहेत. चांदोली गावच्या हद्दीत असल्याने चांदोली, तर वारणा नदीवर असल्याने वारणा धरण म्हणून राज्यात ओळखले जाते.धरणातील पाणीसाठ्याला वसंतनगर असे नाव आहे.
     धरणाची पाणीपातळी प्रकल्प अहवालानुसार 52.96 टीएमसी,केंद्रीय जलआयोगाच्या मते 45.29 टीएमसी आहे.मात्र पाण्याचा प्रत्यक्ष वापर 37.66 आहे. यापैकी धरणात 27.52 टीएमसी वापरासाठी व 6.77 टीएमसी पाण्याचा अचल साठा आहे. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील 1 लाख 13 हजार 782 हेक्टर क्षेत्र सिंचनाचा उद्देश धरणाच्या बांधकामामागे आगे. धरणाच्या डाव्या पायथ्याशी असलेल्या वीजनिर्मिती केंद्रात वीज तयार करण्यासाठी वापरलेले पाणीही पुन्हा सिंचनासाठी वापरले जाते. वीजगृहात 1998-99 पासून आठ मेगावॅट क्षमतेची दोन जनित्रे कार्यान्वित आहेत. 15 मे 2002 ला हा प्रकल्प राज्य विद्युत मंडळाकडे हस्तांतरित करण्यात आला.



No comments:

Post a Comment