अलीकडे समाजात महिलांवरील अत्याचाराच्या, क्रौर्याच्या घटना वाढत आहेत. याचे महत्त्वाचे कारण लोकांमध्ये सहनशीलता उरलेली नाही.सहिष्णुता बुडाली आहे. लोकांना राग
पटकन येत आहे, भावना तातडीने अनावर होतात आणि रागाचे रूपांतर
हिंसेत होत आहे. राग माणसाला गिळंकृत करतं,पण याची कल्पना असूनही माणसे सहन करून घ्यायला तयारी नाहीत. वडिलधार्यांचे ऐकत नाहीत. सामोपचाराच्या
गोष्टी ही मंडळी विसरली आहेत.त्यामुळे समाज सध्या भलतीकडेच भरकटत
चालला आहे. याकडे वेळीच लक्ष पुरवले नाहीत तर समाजात असंतोष पसरल्याशिवाय
राहणार नाही. कोण कोणाचे ऐकणार नाही आणि कोण कुणाला सांगायला
जाणार नाही. सगळीकडे अराजकता माजल्याशिवाय राहणार नाही.
आजच्या पिढीला सगळे झटपट हवे
आहे. पैसा,नोकरी,छोकरी सगळे एका फटक्यात हवे आहे. ही मानसिकता युवा पिढीची
आहे. मात्र मोठी माणसेही बिघडली आहेत. राजकारणी
तर तरुणांना बहकवून आपली तुंबडी, स्वार्थ साधून घेत आहेत.
मनात आणले ते मिळवण्यासाठी खून, मारामार्या या गोष्टी
आता कॉमन झाल्या आहेत. कुठल्याही थराला जाण्याची तयारी घातक ठरणार
आहे. हवी ती गोष्ट कोणत्याही परिस्थितीत मिळावी असा अट्टाहास
कोणाकोणाला माती चारेल, सांगता येत नाही. हवस त्यासाठी प्रसंगी हिंसेचा मार्ग अवलंबवायला लावतो.
विविध कारणांनी समाजात निर्माण होत
असलेली अशांतताही याला कारणीभूत आहे. पूर्वी पुरूषांची पुरूषांशी,
स्त्रियांची स्त्रियांशी स्पर्धा असे. आता सगळेच
स्पर्धेत उतरले आहेत. एकमेकांप्रती प्रेमाचा ओलावा कमी होत आहे.
मानव म्हणून तुटलेपण येत आहे. पूर्वीही अत्याचाराच्या,
हिंसाचाराच्या घटना होत होत्या. परंतु त्याला मर्यादा
होत्या. आता कधी कोठे, कोणत्या स्वरूपाचा
हिंसाचार घडून येईल, सांगता येत नाही अशी परिस्थिती आहे.
अशा वेळी अहिंसेचे मूल्य लक्षात घेतले जाणे गरजेचे आहे. परंतु इथेही समाज मूल्यात्मकदृष्ट्या कमी पडतोय असे दिसते. हल्ली स्त्री-पुरूष असा भेद राहिलेला नाही असे म्हटले
जाते. परंतु प्रत्यक्षात स्त्रीला वेगळी वागणूक दिली जाते.
स्त्रीने काही वेडीवाकडी गोष्ट केली तर ती भयंकर ठरते परंतु तीच गोष्ट
पुरूषांनी केली तर फार तीव्र प्रतिक्रिया उमटत नाहीत. परंतु दोघेही
माणसेच आहेत. माणसातील काही दोष स्त्रीमध्येही असणार आहेत,
हे गृहित धरले जात नाही. अशा परिस्थितीत स्त्री-पुरूषांमध्ये खर्या अर्थाने मैत्रभाव रूजण्याची आवश्यकता
आहे.
आज कुटुंबात तरूण-तरूणींमध्ये पुरेसा संवाद होताना दिसत नाही.
त्यामुळे मला काही तरी सांगायचेय, ही उर्मी कायम
राहते आणि ती कधी तरी तीव्र स्वरूपात किंवा हिंसक पध्दतीने समोर येण्याची शक्यता असते.
माझ्या मनात येईल ते करणार, हा विचार दृढ होतो.
हे पाहता आपल्यातील विवेकाचा भाग हरवत चाललाय का, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. कुटुंबातील मुलांचे वर्तन ठीक नसेल तर त्यासाठी त्या कुटुंबातील स्त्रीलाच
जबाबदार धरले जाते. या व्यवस्थेने जसे स्त्रीला घडवले आहे तसेच
पुरूषालाही घडवले आहे. परंतु फक्त स्त्रीनेच बदलावे असा आग्रह
धरला जातो. झी टीव्हीवर काहे दिया परदेस या नावाची रोज मालिका
लागत आहे, यातही हीच विचारधारा दाखवली गेल्याने गौरीचा झालेला
कोंडमारा आपल्याला टिपता येतो.
वास्तविक, पुरूषांनी स्वत:ला बदलणेही
तितकेच महत्त्वाचे ठरते.पूर्वी पुरूषाने नोकरी व्यवसाय करायचा
आणि स्त्रीने घरकाम सांभाळायचे अशी पध्दत होती. त्यावेळी पुरूषाने
घरातील कामे करणे प्रशस्त मानले जात नव्हते. परिणामी,
पुरुषांना अमूक कामे करा, असे सांगण्याचा प्रश्नच येत नव्हता. आता एखाद्या पुरूषाला स्वयंपाक येत नसेल
किंवा काही पदार्थ बनवता येत नसतील तर त्याबद्दल स्त्रियांकडून आश्चर्य व्यक्त केले जाते. सध्याचा जमाना बाजारीकरणाचा आहे.
त्यात हिंसाचाराच्या घटना वाढीस लागल्या आहेत. अशा परिस्थितीत स्त्री मुक्ती चळवळीची नितांत गरज आहे. या चळवळीत पुरूषवर्गाचा सहभागही महत्त्वाचा ठरणार आहे. त्यातून समतेच्या दिशेने वाटचाल सुरू होईल. परंतु आज
चळवळीत निस्वार्थी भावनेने, खूप तळमळीने कार्य करणारे कार्यकर्ते
मिळणे अवघड झाले आहे. शिवाय बदलत्या जमान्यात चळवळीचे स्वरूपही
बदलले आहे. आता फेसबुक, व्हॉटस अप तसेच
सोशल मिडियाच्या माध्यमातून अवघ्या काही मिनिटात एखाद्या घटनेवरील प्रतिक्रिया प्राप्त
होतात. एखाद्या घटनेच्या निषेधार्थ लोक उत्स्फूर्तपणे रस्त्यावर
उतरतात.आपल्या हक्कांसाठी, अधिकारांसाठी
लढणे यातून सामाजिक बदलाचीच प्रक्रिया पार पडत आहे. या प्रक्रियेत
सर्व समाजाचा सहभाग हवा आहे.
No comments:
Post a Comment