Tuesday, March 14, 2017

पारधी समाजाच्या नगरसेविका: राजश्री काळे

     पारधी समाज म्हणजे उपेक्षित समाज.गुन्हेगारी पार्श्‍वभूमी या समाजाला आहे. रात्री- अपरात्री त्यांच्या तांड्यावर पोलिसांच्या धाडी या ठरलेल्या.धंगा-धोपा,मारहाण या गोष्टी पारधीतांड्यांना सवयीच्या झालेल्या. अशा वातावरणात राजश्री काळे वाढलेल्या. आज या समाजाच्या पुण्याच्या पहिल्या नगरसेविका म्हणून त्यांचा सन्मान होतो आहे. पुण्यातल्या एका महाविद्यालयामध्ये शिपाई म्हणून काम करताना त्यांनी आपल्या समाजाला शिक्षणाचे महत्त्व समजून सांगतानाच अन्यायाविरोधात लढा द्यायला शिकल्या. त्यातूनच आज नगरसेविका झाल्या असल्या तरी त्यांचे जीवन संघर्षमयच आहे. नववीतून शिक्षण सोडावं लागलेल्या राजश्री काळे यांना दोन मुलीच झाल्या म्हणून नवर्‍यानेही टाकलं. पण त्यातूनच त्यांना मनाजोगे काम करायची संधी मिळाली. 

     राजश्री काळे या सोलापूर जिल्ह्यातील यमगरवाडी पारधीतांड्यातल्या. पारधी समाज तसा महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन राज्यात आढळून येतो. हा समाज चोर्‍या-मार्‍यांमुळे तसा बदनाम झालेला.पोलिस आणि या समाजाचा यामुळे नेहमीच खटका उडे. पारधीतांड्यात सदा पोलिसांचा वावर. अशा वातावरणातच राजश्री काळे वाढल्या. या समाजाचा तसा शिक्षणावर विश्‍वास नाही. त्यामुळे तांड्यावरच्या पोरांना शाळेची सवय नाही. मात्र सामाजिक कार्यकर्ते यमाजी प्रभुणे यांनी तांड्यावर शाळा सुरू केली.या शाळेतच त्या नववीपर्यंत शिकल्या. नंतर वडिलांनी त्यांची शाळा सोडवली. त्यांना शिकायची इच्छा असूनही पुढे शिकता आले नाही. शाळा सुटली तरी त्यांनी शाळेचा संबंध तोडला नाही. रात्र शाळेत त्या शिकवायला जाऊ लागल्या.समाजातील मुलांना शिकवू लागल्या.  समाजातील लोक त्यांना बोल लावू लागले. वडिलांनाही ते लोक बोलू लागले. एक दिवस वडिलांनीही त्यांना शाळा शिकवण्याचे काम बंद करायला सांगितले. तेव्हा त्या उसळून म्हणाल्या, माझी शाळा बंद केली ती केली. आता मला मनासारखं कामही करू देत नाही का?  शेवटी वडिलांनी संमती दिली.पंधरा वर्ष वयाच्या असतानाच त्या समाजसेवेत उतरल्या.
     लग्न झाल्यवर त्या पुण्याला आल्या. पण दोन्ही मुलीच झाल्या म्हणून नवरा त्यांना सोडून निघून गेला. मात्र यामुळे त्यांना त्यांच्या मनासारखं काम करण्याची संधी मिळाली. नशिबाने त्यांना गरवारे महाविद्यालयात शिपायाची नोकरी मिळाली. त्यांच्या जीवनाला आर्थिक स्थैर्य मिळाले. आता त्या नोकरीही करू लागल्या,मुलींचा सांभाळही करू लागल्या आणि वेळ मिळेल तेव्हा समाजसेवाही करू लागल्या. त्यांच्या समाजसेवेची कल्पना महाविद्यालयाच्या प्राचार्यांना होती. मात्र त्यांनी राजश्री यांना काही म्हटले नाही. पारधी समाजात एखादी महिला नोकरी करतेय,हेच मोठे अप्रूप होते. त्यामुळे या समाजातील लोक त्यांच्या समस्या घेऊन त्यांच्याकडे येऊ लागले. या लोकांना त्यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्याचे काम सुरू केले. या कालावधीत त्यांनी समाजाच्या प्रश्‍नांसाठी दोन मोर्चे काढले. एक मोर्चा हा महापालिकेवर काढला तर दुसरा आमदरांच्या निवासावर! दत्तवाडी परिसरात असलेल्या पदपथावरील अतिक्रमण कारवाईमध्ये पारधी समाजाच्या बांधवांना हटविल्याबद्दल त्यांनी महापालिकेवर मोर्चा काढला होता. शिवाजीनगरचे आमदार विजय काळे यांच्या निवासस्थानावरही त्यांनी मोर्चा काढला होता. पण त्यांच्या प्रोत्साहनामुळेच त्या राजकारणात आल्या आणि लोकप्रतिनिधी बनल्या. पुणे विद्यापीठ-वाकडेवाडी या प्रभाग क्रमांक 7 मधून भाजपच्या तिकिटावर त्या निवडून आल्या. 
     आता त्यांना या माध्यमातून समाजासाठी खूप काही करायचं आहे. अजूनही हा समाज चोर,दरोडेखोर आणि मारामार्‍या करणारा म्हणूच परिचित आहे. अजूनही अस्पृश्यतेचे जिणे या समाजातील लोकांच्या वाट्याला आले आहे. शिवाय या समाजातील महिलांवर अजूनही अन्याय, अत्याचार होत आहे. त्यांना आपल्या हक्क आणि अधिकाराची जाणिव नाही. त्यांनी आपल्या जीवनात संघर्ष करावा आणि आपल्या पायावर त्यांनी उभे राहावे, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. या समाजातील महिलांना मानसन्मान मिळवून देण्यासाठी त्यांचा संघर्ष जारी राहणार आहे, हे त्यांच्या मुलाखतीतून जाणवतं.

No comments:

Post a Comment